संपादकीय टिप्पणी
छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तिशाली आरमाराची उभारणी केली. यामागे त्यांची दूरदृष्टी कशी होती, याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. अनेक भारतीय राज्यकर्त्यांना सागरी मार्गावर ताबा असणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षातच आले नव्हते. मात्र महाराजांनी केवळ आरमारच उभारले नाही तर, आपल्या समुद्री क्षेत्राचे रक्षण आणि आपल्या हितसंबंधांचा विस्तार करण्यासाठी अनेक लढायाही लढले. म्हणूनच आपले नौदल, त्याचा विस्तार, आधुनिकीकरण आणि आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या नियोजनात महाराजांच्या दृष्टिकोनाचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील तारकर्ली समुद्रकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्गच्या पार्श्वभूमीवर 04 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त विविध प्रात्यक्षिके आणि कवायतींचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय नौदलाने पहिल्यांदाच घेतला. इतिहासातील महत्त्वाचे पण दुर्लक्षित पैलू योग्य पद्धतीने लोकांसमोर आणण्यासाठी आणि राष्ट्रीय वारशांची प्रतीके पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्गची निवड महत्त्वपूर्ण ठरली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात – गेल्या वर्षी – भारतीय नौदलाने आपला जुना ध्वज बदलून शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेचा समावेश असणारा नवा ध्वज स्वीकारला. सेंट जॉर्ज क्रॉस असलेला पूर्वीचा लाल रंगाचा ध्वज नौदलाचे खच्चीकरण करणारा होता, अशातला भाग नाही. खरंतर, भारतीय नौदलाने जगभरातील आपल्या सागरी किंवा राजनैतिक हितसंबंधांसाठी गेली अनेक दशके अभिमानाने जुना ध्वज फडकविला होता. याच जुन्या ध्वजाचा वापर 1971चे युद्ध जिंकताना तसेच बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी केला होता. मात्र 2 सप्टेंबर 2022 या दिवशी भारतीय बनावटीच्या INS विक्रांतच्या जलावतरण सोहोळ्यात नव्या ध्वजाचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या भावना पुरेशा बोलक्या होत्या. गेल्या हजार वर्षांतील कोणताही भारतीय नेता नव्हे तर, केवळ शिवाजी महाराजच भारतीय नौदल आणि राष्ट्र उभारणीसाठी उत्तम आदर्श ठरू शकतात.
हा नवा ध्वज आपल्या अस्सल देशी बंधामुळे जहाजांना आणि त्यांच्या चमूला, समुद्रात असो की किनाऱ्यावर, आपल्या समुद्रात असो की परदेशी, समुद्राच्या खाली असो किंवा वर, सतत प्रेरणा देईल, तसेच शिवरायांच्या महान वारशाची आणि त्यांनी आरमार तयार करण्याची केलेली कल्पना, त्याची उभारणी आणि त्याची काळजी घेताना आलेल्या आव्हानांवर कशी मात केली याची सतत आठवण करून देईल. म्हणूनच यंदाचा नौदल सप्ताह साजरा होत असताना, शिवरायांच्या सागरी उपक्रमातील काही ठळक मुद्दे लक्षात घेणे योग्य ठरेल.
शिवरायांना वारसाहक्काने जो भूभाग जहागीर म्हणून मिळाला होता, तो समुद्रापासून बऱ्याच लांब अंतरावर होता! त्यामुळे समुद्र आणि तिथल्या जीवनमानाशी अपरिचित असलेल्या व्यक्तीने आरमार उभारले, हे स्वराज्याच्या कल्पनेपेक्षाही अधिक प्रशंसनीय आहे! समुद्रकिनारा हा कोणालाही हवासा वाटणारा स्रोत आहे आणि शिवरायांना तलवारीच्या बळावर समुद्रात प्रवेश मिळवावा लागला. कल्याण, भिवंडी आणि पेण येथे तयार झालेल्या मराठा आरमाराच्या जहाजांना नदीच्या मार्गाने लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागायचा कारण वसई, घोडबंदर (ठाणे), कारंजा येथून समुद्रात प्रवेश करण्याचे मार्ग पोर्तुगीज किल्ल्यांमुळे धोक्यात आले होते. मात्र अशा प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे आरमारच्या स्थापनेपासून महाराज परावृत्त झाले नाहीत.
नौदल भांडवलावर अवलंबून असते. त्यांची सुसज्जता आणि विस्तार राजकीय स्थिरता आणि आर्थिक परिस्थितीवर आधारित असतो. उदाहरणार्थ, अलिकडच्या काळात चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नौदलाची (सीसीपी नेव्ही) झालेली अभूतपूर्व वाढ, ज्यांचा उद्देश हिंद महासागर प्रदेशामध्ये (आयओआर) विविध ‘ठिकाणे आणि लष्करी तळ’ शोधणे तसेच जगभरातील विविध सागरी मालमत्ता गोळा करणे, हा आहे. गेल्या तीन दशकांमध्ये चीनने खर्चाच्या बाबतीत ठेवलेला ढिला हात आणि सापेक्ष भू-राजकीय स्थिरता यामुळे त्याच्या नौदल वाढीसाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
म्हणूनच ऐन तारुण्यात आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असताना, भू-राजकीय स्थैर्याचा अभाव असताना, आपल्या अस्तित्वासाठी जमिनीवर सतत लढा देत असताना आरमार बांधणीचा उपक्रम हाती घेण्याचे शिवरायांचे धाडस लक्षात घेण्यासारखे आहे. आज्ञापत्रात – शिवरायांची दूरदृष्टी आणि अनुभवातून तयार झालेला राज्यकारभार कलेवरील ग्रंथ – ‘ज्याच्याकडे आरमार तोच समुद्राचा मालक आहे’ अशी घोषणा आहे.
तुलनेने, पराक्रमी मुघलांकडे, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असूनही, तसेच शांततेबद्दल चर्चा करण्याची किंवा युद्ध पुकारण्याची ताकद असलेले एक सुस्थापित साम्राज्य असूनही, मोठ्या प्रमाणावर वित्तसंपत्ती असूनही, पुरेसे शक्तिशाली आरमार तयार करण्यासाठी असणाऱ्या दूरदृष्टीचा अभाव होता. त्यांचे सी लेन ऑफ कम्युनिकेशन (SLOC) जे व्यापारासाठी तसेच मक्काच्या तीर्थयात्रेसाठी महत्त्वपूर्ण होते, त्याबद्दल उदासीनता अधिक होती. 1613च्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी रहिमी हे त्यांचे सर्वात मोठे जहाज जप्त केल्याची धक्कादायक घटना घडूनही सागरी सुरक्षेबाबत मोगलांची उदासीनता कायम राहिली.
त्यानंतर औरंगजेबाच्या कारकीर्दीत मोचाहून सुरतला येणारे, रहिमीहूनही मोठे असणारे, 62 तोफांचे गंज – ए- सवाई या जहाजाचे हेन्री एव्हरीच्या नेतृत्वाखाली समुद्री चाच्यांनी अपहरण केले. अशा घटनांमुळे एक मजबूत सागरीशक्ती तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवं होतं, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं; कारण भारतासारख्या खंडप्राय देशावर अनभिषिक्त सत्ता स्थापन करण्याच्या वेडाने पछाडलेल्या औरंगजेबाने 90 टक्क्यांपेक्षा अधिक खजिना पायदळाच्या मोहिमांवर खर्च केला.
LAC/LOC वरील सध्याची परिस्थिती लक्षात घेता अशा सापळ्यात सापडणे भारताला परवडणारे नाही आणि त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी शिवरायांच्या विचाराचे पालन केले पाहिजे.
नौदलासाठी असणारी अर्थसंकल्पीय तरतूद वर्षानुवर्षे मर्यादित राहिली आहे. कोकण किनारपट्टीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेकजण शिवरायांच्या काळाप्रमाणे आजही प्रयत्नशील असताना, उत्तर IORमध्ये दररोज सरासरी 100 परदेशी सैनिकांची वर्दळ दिसून येत आहे. यापैकी काही शक्ती निःसंशयपणे आपल्या शत्रू आहेत आणि असा धोका असताना आपल्या नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या गरजांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जंजिर्याचे सिद्दी आणि पोर्तुगीजांकडून सातत्याने लुटालूट आणि लुबाडणे सहन करणार्या किनारपट्टीच्या भागांची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने स्वराजचे आरमार तात्काळ वाढवण्याचा निर्णय महत्त्वाचा ठऱला. किनारी किल्ल्यांचा विकास, किनारपट्टी भागातील कार्यक्षेत्राबद्दल उत्तम जागरूकता आणि उत्कृष्ट गुप्तचर संघटना हे मराठ्यांच्या सैन्याचे विशेष गुण होते. शिवरायांची बसरूरपर्यंतची यशस्वी सागरी मोहीम, ज्यात त्यांनी प्रत्यक्ष सागरीप्रवास केला (ज्यावेळी समुद्र पर्यटन करणे धर्माच्या विरुद्ध होते किंवा तशा कल्पना मांडल्या जात होत्या, अशा काळात एका राजाने हे धाडस केले होते) आणि गुप्तचरांनी आणलेल्या माहितीनंतर सुरतेचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी भूदळाच्या बरोबरीने आरमाराची रवानगी तिथे करण्यात आली होती. अर्थात नंतर या मोहिमेत येऊ शकणारे अपयश टाळण्यासाठी ती मोहीम अर्ध्यातच गुंडाळण्यात आली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे अनेकदा धोरणात्मक तसेच क्रियात्मक पातळीवर भारताला मानहानीला सामोरे जावे लागले आहे. या दोनही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात परंपरिक आणि तत्सम धोके आहेत. 26/11सारखा सागरी दहशतवाद, चाचेगिरी, अंमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर स्थलांतर, शस्रास्रांची तस्करी, अशी कृत्ये भारताच्या सागरी क्षेत्रांमध्ये होत असल्यामुळे किनारपट्टी सुरक्षा यंत्रणेने पाळत ठेवणे, विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचे एकत्रीकरण करणे यासोबत आपल्या निष्णात गुप्तचर यंत्रणेची मदत घेणे आवश्यक आहे.
शिवरायांनी आपले सैन्यदल आणि आरमार कायमच सतर्क राहील, यावर भर दिला; कारण सगळे आलबेल असले तरी, ते क्षणिक किंवा फसवे असू शकते, याची खात्री त्यांना होती. आज, प्रचलित भू-राजकीय वास्तव आणि इतर देशांचे स्वारस्य असलेल्या सागरी क्षेत्रांची विशालता लक्षात घेता, आपल्या नौदलाने प्रदीर्घ काळासाठी कायम तत्पर असणे आवश्यक आहे. अशावेळी साधनसामग्रीची देखभाल, खराब हवामान आणि कमी मनोबल अशी कारणे देता येणार नाहीत.
शिवरायांनी भौगोलिक परिस्थितीचा उपयोग स्वराज्याच्या स्थापनेसाठी, तसेच नव्या आरमाराच्या पोषणासाठी आणि समुद्रातील विविध कामगिऱ्यांसाठी केला. अतिशय वेगवान अशा गलबते आणि गुरबन यांच्या तांड्यांचा केलेला कल्पक वापर, समुद्राच्या किल्ले किंवा किनारपट्टीवरून एकीकडे उखळी तोफांचा मारा करत उथळ पाण्यात माघारी फिरणे ही मराठ्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती. खरेतर, त्यावेळी मराठ्यांच्या शत्रूकडे असणाऱ्या शस्त्रास्त्रांची गुणवत्ता आणि प्रमाण कितीतरी अधिक पट होते. तरी, मराठे त्यांना धोबीपछाड देऊ शकले. अशा घटना वारंवार घडत होत्या. खांदेरीच्या लढाईच्या वेळी ईस्ट इंडिया कंपनी तसेच जंजिर्याचे सिद्दी हे मराठ्यांना बेटावरून हटवू शकले नाहीत, हे विशेष.
शिवरायांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी यांना काटशह देण्यासाठी गोवा, जंजिरा आणि मुंबई येथे अनुक्रमे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग आणि खांदेरी असे नवीन सागरी किल्ले बांधले. आज त्याच पद्धतीने, आपली अद्वितीय द्वीपकल्पीय भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, अंदमान – निकोबार आणि लक्षद्वीप बेटांच्या मिनिकॉय गटांमधील लष्करी पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. या बाबतीत बेकायदेशीर असलं तरी साऊथ चायना समुद्रात चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. आव्हानात्मक पायाभूत सुविधा आणि जहाजबांधणी प्रकल्पांच्या अंमलबजावणीची किंमत, गुणवत्ता आणि गती यासंदर्भातही आपल्याला शिवरायांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे लागेल.
शिवरायांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. विविध समाज आणि धर्मांतील वेगवेगळ्या स्तरांमधील योग्य व्यक्तींची पारख करून त्यांना स्वराज्याच्या हिताला प्राधान्य देण्यास प्रवृत्त करण्यात पारंगत म्हणून ते अतुलनीय आहेत. अशी असंख्य उदाहरणे आहेत परंतु सागरी क्षेत्राशी संबंधित जी उदाहरणे आहेत त्यांचा आपण परामर्श घेऊया.
इंग्रजांच्या ताब्यातील मुंबईच्या खांदेरी बेटावर जलदुर्ग बांधण्याची मोहीम पावसाळ्याच्या कठीण परिस्थितीत आणि ईस्ट इंडिया कंपनी तसंच सिद्दीकडून होणाऱ्या कडव्या विरोधानंतरही राबवली गेली होती. मराठा नौदलाचे सरसेनापती मायनाईक भंडारी आणि दौलत खान यांनी उत्कृष्ट नेतृत्व, रणनीती आणि कौशल्य दाखवून सर्व अडचणी असतानाही आव्हानात्मक कार्य पूर्ण केले, जसे छत्रपतींनी आयुष्यभर केले. 1675 मध्ये सिद्दींविरुद्धच्या मोहिमा टिपेला पोहोचलेल्या असताना लया पाटील आणि त्यांच्या चमूने बोटीतून शिड्या समुद्रात सोडून त्याद्वारे चढाई केली होती.
तोफखान्याचा प्रबळ सामना करत आजही उभ्या असणाऱ्या जंजिरा किल्ल्याच्या भिंती विशेष दलांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. 1664मध्ये सुरतेवर केलेल्या पहिल्या हल्ल्यातून जो ऐवज मिळाला तो शिवरायांनी त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी किंवा समाधानासाठी वापरला नाही – जे त्या काळातील राज्यकर्त्यांसाठी नेहमीचा परिपाठ होता – तर सिंधुदुर्गचा सागरी किल्ला बांधण्यासाठी वापरून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. त्यांच्या अनुपस्थितीत, मोगलांशी झालेला संघर्ष असो किंवा विश्वासघाताने आग्रा येथे बंदिवास आणि त्यानंतर त्यांची धाडसी सुटका असो, त्याचा परिणाम अर्थविषयक मदत निःसंशयपणे कमी मिळण्यात झाली, तरीही ‘स्वतःआधी स्वराज्य’ या कल्पनेने झपाटलेल्या सिंधुदुर्गचे शिल्पकार हिरोजी इंदलकर (ज्यांनी नंतर रायगडाचीही निर्मितीही केली) यांच्यासारख्यांनी देशभक्तीभावाने बांधकामाचे काम चालू ठेवले.
नौदल आणि भारत देश अमृतकालचा आनंद साजरा करत असताना, सर्व पातळ्यांवर नैतिक नेतृत्वाचे पैलू, गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय हितांना सर्वोच्च स्थान देण्यासाठी सर्वसामान्यांसमोर आदर्श तयार केले तर त्याचा परिणाम भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंनी मांडलेल्या ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ (नियतीशी करार) या प्रतिज्ञेच्या पूर्ततेवर होईल.
शिवरायांनी अनेक पोर्तुगीज आणि इतर युरोपियन डिझायनर, जहाज चालकांना चांगला मोबदला देऊन जहाजबांधणीच्या कामासाठी नियुक्त केले. त्याच वेळी आपल्या माणसांना त्यांच्याकडून हे काम शिकून स्वदेशी जहाजबांधणी करण्याची जबाबदारी दिली. या क्षेत्रांमध्ये स्थानिक क्षमता कमी असल्याने आपल्या सैन्याने लढाया जिंकण्यसाठी शिवरायांनी उत्तम दर्जाच्या तोफा आणि शस्त्रास्त्रे (विशेषत: इंग्रज त्यांना कमी दर्जाच्या बंदुका विकत असले तरी) खरेदी करण्याचाच प्रयत्न केला. आत्मनिर्भर भारताच्या सुरू झालेल्या या प्रवासात, आपण लढाईच्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या आणि उपकरणांच्या आवश्यकतांकडे दुर्लक्ष करू नये. कालबद्ध विकासासाठी किंवा आयात केलेल्या उपकरणांचे, जबाबदारीने स्वदेशीकरण करण्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आपण वाजवी आयातीला परवानगी दिली पाहिजे, कारण आत्मनिर्भरतेचे परिणाम दिसून यायला काही काळ जाणार आहे.
शिवरायांना त्यांच्या श्रद्धेचा अभिमान होता, पण दुसऱ्यांचा त्यांनी कधीही तिरस्कार केला नाही. त्यांनी ख्रिश्चनांना आपली जहाजे बांधायला सांगितली, आरमारात सरनौबत वेंताजी सारंगी आणि दौलत खान यांचा समावेश केला तर, सिद्दी हिलाल हा मुस्लीम त्यांचा अंगरक्षक होता. शीख गुरू तेग बहादूरसिंग यांच्या फाशीमुळे शिवरायांना दुःख झाले आणि त्यांनी सम्राट औरंगजेबाला त्याच्या धार्मिक असहिष्णुतेच्या धोरणाबद्दल कठोर भाषेत पत्र लिहिले. स्त्रिया, पवित्र ग्रंथ आणि इतर धर्मांच्या प्रतीकांबद्दल त्यांना असणाऱ्या विलक्षण आदराचे, त्यांचे विरोधकही कौतुक करतात.
शेवटचा मुद्दा म्हणजे शिवरायांचे सागरी धोरण हे वास्तववादी आणि व्यावहारिक होते. युरोपियन लोकांकडे असलेले आराखडे आणि त्यामागचे हेतू हे केवळ व्यापारापुरते मर्यादित नाहीत हे जोखण्याइतकी हुशारी महाराजांकडे होती. म्हणूनच त्यांच्या फसव्या बोलण्याने ते कधी भारावून गेले नाहीत किंवा पन्हाळ्यावर आदिलशाही सैन्याला तोफखान्याची मदत पुरवण्यामागचा इंग्रजांचा दुटप्पीपणा कधीही विसरले नाहीत. युरोपियन कंपन्यांना किनार्यावर पाय ठेवू देऊ नये, असे आज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. आज, आपण इतरांसोबत आपले संबंध प्रस्थापित करत असताना, आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज असते, पण समोरच्याबद्दल योग्य माहिती असणेही आवश्यक आहे; कारण कोणीही कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात तर, केवळ हितसंबंधच कायमस्वरूपी असतात. आपले दोन कायमचे शत्रू आहेत जे आपल्याला सतत त्रास देण्यात धन्यता मानतात. त्यांच्याकडून आपल्या सुरक्षेबाबत अनेक उप-पारंपरिक आणि विविध प्रकारचे धोके निर्माण होत आहेत. एकीकडे, सागरी क्षेत्राचे सतत वाढणारे महत्त्व आणि दुसरीकडे, आपल्या लोकांच्या कल्याणासाठी, भारत आणि भारतीय नौदलापुढे शिवरायांचे उदाहरण म्हणजे अशांत पाण्यात प्रवास करण्यासाठी एक विश्वसनीय होकायंत्रच.
व्हाइस ॲडमिरल एम. एस. पवार (निवृत्त)
माजी नौदल उपप्रमुख
(अनुवाद : आराधना जोशी)