तीन वर्षांतील मंदावलेली आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे, विशेषतः तैवान आणि युक्रेन यांच्याबरोबर असणाऱ्या संबंधांमुळे, विविध आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याने, सातत्यपूर्ण विकास दर कायम ठेवत, या वर्षी आपला संरक्षण खर्च 7.2 टक्क्यांनी वाढवण्याची चीनची योजना आहे. संसदेत सादर होणाऱ्या सरकारी अहवालात बुधवारी जाहीर करण्यात आलेली ही वाढ गेल्या वर्षीच्या वाढीच्या दराशी जुळते आहे. ही वाढ या वर्षासाठी चीनच्या अंदाजे 5 टक्के आर्थिक वाढीच्या लक्ष्यापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे, हा आकडा गुंतागुंतीच्या भू-राजकीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लष्करी आधुनिकीकरणाच्या बीजिंगच्या महत्त्वाकांक्षांबाबतच्या अपेक्षा आणि सूचकता असे दोन्ही असल्याचे विश्लेषक मानतात.
एका दशकापेक्षा जास्त काळापासून शी जिनपिंग राष्ट्राध्यक्ष आणि कमांडर-इन-चीफ असल्यामुळे, संरक्षण अर्थसंकल्प 2013 मधील 720 अब्ज युआनवरून या वर्षी 1.78 ट्रिलियन युआन (245.65 बिलियन अमेरिकन डॉलर्स) पर्यंत वाढला आहे.
2035 पर्यंत चीनचे सैन्य नवीन क्षेपणास्त्रे, जहाजे, पाणबुड्या आणि टेहळणी तंत्रज्ञान विकसित करून संपूर्ण लष्करी आधुनिकीकरण पूर्ण करण्याचे शी यांचे उद्दिष्ट आहे.
या वर्षीच्या अहवालात लढाऊ सज्जता आणि वैज्ञानिक तसेच धोरणात्मक सुधारणांच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे, परंतु पीपल्स लिबरेशन आर्मीवर (पीएलए) परिणाम करणाऱ्या असंख्य भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांचा स्पष्ट संदर्भ असलेल्या ‘लष्कराच्या राजकीय आचरणात सुधारणा करत राहण्याची’ प्रतिज्ञा देखील करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांत हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये दोन माजी संरक्षणमंत्री आणि केंद्रीय लष्करी आयोगाच्या एका सदस्याचा समावेश आहे.
प्रादेशिक लष्करी अधिकारी अंदाजपत्रक आणि अहवालावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, काहींनी नमूद केले आहे की लढाऊ सज्जतेच्या संदर्भांचा अर्थ तैवानच्या आसपास आणि विस्तृत प्रदेशात सैन्याच्या आणखी तीव्र कवायती आणि तैनाती होईल.
चिनी नौदलाच्या जहाजांनी फेब्रुवारीमध्ये तस्मान समुद्रात अभूतपूर्व लाइव्ह-फायर ड्रील्स केली, ज्यामुळे व्यावसायिक विमानांचा मार्ग बदलावा लागला.
लंडनमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजने फेब्रुवारीमध्ये जगभरातील सैन्याच्या सर्वेक्षणात नमूद केले की चीनच्या व्यापक आर्थिक निर्बंधांमुळे, “कोणत्या क्षेत्रांना प्राधान्य द्यावे?” याबद्दल अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.”
अमेरिकेपाठोपाठ चीन हा जगातील दुसरा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश आहे, ज्याचे 2025 साठी प्रस्तावित लष्करी अंदाजपत्रक 850 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.
तैवानमधील सुरक्षा विश्लेषक वेन-टी सुंग म्हणाले की, नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या तुलनेत, काहीशी मवाळ, मध्यम तीव्रतेची भाषा आणि स्थिर संरक्षण अंदाजपत्रकासह आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यास बीजिंग उत्सुक आहे.
अटलांटिक कौन्सिलमधील अनिवासी सहकारी सुंग म्हणाले, “चीनला तुलनेने अधिक अनुमानित महासत्ता म्हणून स्वीकारणे इतरांसाठी शक्य तितके सोपे करण्याचा बीजिंग प्रयत्न करीत आहे.”
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)