चंद्रावरील नमुने गोळा करून संशोधनासाठी पृथ्वीवर आणण्यासाठी चीनची चांद्र तपासणी मोहीम सुरू झाली आहे. चीनने या मोहिमेला मिशन चांग ई-6 असे नाव दिले आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या(सीएनएसए) मते, चांग ई-6 मोहीम चंद्राच्या दूरवरच्या भागातून नमुने गोळा करेल. त्यानंतर हे नमुने विश्लेषणासाठी पृथ्वीवर परत आणले जातील.
या चंद्र मोहिमेद्वारे चीन पाकिस्तानलाही चंद्रावर पोहोचण्यासाठी मदत करत आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने सांगितलं आहे की, चांग ई-6 मिशनद्वारे पाकिस्तानचा क्यूबसॅट हा अतिशय सूक्ष्म उपग्रह चंद्रावर नेण्यात येत आहे. या उपग्रहामध्ये 2 कॅमेरे आहेत, जे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेतील.
लाँग मार्च 5 रॉकेट वापरून हेनान बेटावरील वेनचांग स्पेस साइटवरून चंद्र मोहीम 3 मे रोजी प्रक्षेपित करण्यात आली. ग्लोबल टाइम्सच्या मते, चंद्राच्या अंधाऱ्या बाजूला जाऊन तिथल्या मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर पाठवणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.
सीएनएसएच्या मते, स्वयंचलित नमुना संकलन, उड्डाण आणि चंद्रावर दूरस्थ चढाई यासारख्या प्रमुख तंत्रज्ञानातील प्रगती साध्य करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे.
चांग-6 मोहिमेचे लँडर आणि ऑर्बिटर फ्रान्स, इटली आणि युरोपियन स्पेस एजन्सीची वैज्ञानिक उपकरणे आणि पाकिस्तानी पेलोड घेऊन गेले आहेत.
यापूर्वी, चीनने चंद्रावर मानवरहित मोहीम सुरू केली होती, ज्यात चंद्रावर रोव्हर उतरवणे समाविष्ट होते. याशिवाय चीनने मंगळावरही एक रोव्हर पाठवले आहे. 2030 पर्यंत चंद्रावर मानव उतरण्याची योजना देखील चीनने जाहीर केली आहे.
आतापर्यंत चंद्रावर गेलेल्या सर्व 10 मोहिमा आपल्याला दृश्यमान असलेल्या भागात पोहोचल्या होत्या. चंद्राच्या अंधाऱ्या भागात जाऊन तिथले नमुने गोळा करणे हे चीनच्या या मोहिमेचे लक्ष्य आहे. चीनचे हे मिशन यशस्वी झाल्यास असे करणारा तो पहिला देश ठरेल. चांगई-6 दक्षिण ध्रुव-एटकेन बेसवर उतरेल. हा चंद्राच्या तीन सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रमुख भूभागांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचे वैज्ञानिक मूल्य खूप जास्त आहे.
चीनने 2004 मध्ये चंद्र मोहीम सुरू केली. 2007 पासून त्याने पाच रोबोटिक मोहिमा सुरू केल्या आहेत. चांगई-5 डिसेंबर 2020 रोजी चंद्रावर उतरले. या मोहिमेअंतर्गत 1731 ग्रॅम इतके चंद्रावरीर खडक आणि माती पृथ्वीवर आणली जाऊ शकते. हे एक मोठेच यश म्हणावे लागेल.
याआधी 2019 मध्ये चीनची चांगई-4 मोहीम ही पहिली मोहीम होती. चीन हा एकमेव देश आहे जो चंद्राच्या पलीकडे(अंधाऱ्या भागात) लँडर पाठवू शकला आहे. चांगई-4 मिशनचे युटू 2 नावाचे रोव्हर हे जगातील सर्वात जास्त काळ चालणारे चंद्र रोव्हर आहे. ते सुमारे 5 वर्षांपासून चंद्रावर अस्तित्वात आहे.
गेल्या वर्षी भारताने चांद्रयान-3 लँडर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले होते. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता.
या मोहिमेद्वारे पाकिस्तानही आता चंद्रावर पोहोचणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या या मोहिमेकडे दोन मित्र देशांमधील अंतराळ क्षेत्रात वाढणारे सहकार्य म्हणून पाहिलं जात आहे.
आराधना जोशी
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)