![Putin-Trump पुतीन](https://bharatshakti.in/wp-content/uploads/2025/02/Putin-Trump.jpg)
युक्रेनचा संघर्ष सोडवण्यासाठी चीनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शिखर परिषद व्हावी असा प्रस्ताव ठेवल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने गुरुवारी या प्रकरणाशी परिचित असलेल्या स्रोतांचा हवाला देत सांगितले.
बीजिंग आणि वॉशिंग्टनमधील लोकांच्या हवाल्याने वृत्तपत्राने म्हटले आहे की, चिनी अधिकाऱ्यांनी अलीकडच्या आठवड्यांमध्ये मध्यस्थांमार्फत ट्रम्प यांच्या चमूसोबत दोन्ही नेत्यांमध्ये शिखर परिषद आयोजित करण्याचा आणि अंतिम युद्धविरामानंतर शांतता राखण्याच्या प्रयत्नांना चालना देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
अर्थात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देण्याच्या रॉयटर्सच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.
शांतता प्रस्थापित व्हावी ही इच्छा
ट्रम्प म्हणाले की, पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी त्यांच्याशी स्वतंत्र दूरध्वनी संभाषणात शांततेची इच्छा व्यक्त केली होती आणि ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू करण्याचे आदेश दिले होते.
क्रेमलिनने म्हटले होते की पुतीन आणि ट्रम्प यांनी भेटण्याचे मान्य केले होते आणि पुतीन यांनी ट्रम्प यांना मॉस्कोला भेट देण्याचे आमंत्रण दिले होते. ट्रम्प म्हणाले की, त्यांची पहिली बैठक लवकरच सौदी अरेबियात होईल.
अद्याप शांतता चर्चा नाही
संघर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांपासून युक्रेन शांतता चर्चा झालेली नाही, जी आता त्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या जवळ आहे.
ट्रम्प यांच्या आधीचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कीव्हला कोट्यवधी डॉलर्सची लष्करी आणि इतर आवश्यक मदत दिली होती . रशियाच्या आक्रमणानंतर पुतीन यांच्याशी त्यांचा थेट कधीच संपर्क झाला नाही.
रशियाची अधिक प्रदेशाची मागणी
रशियाने युक्रेनच्या सुमारे एक-पंचमांश भाग व्यापला आहे आणि कीवकडे आणखी भूभाग देण्याची आणि कोणत्याही शांतता करारानुसार कायमस्वरूपी तटस्थ राहण्याची मागणी केली आहे.
युक्रेनने रशियाला ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून माघार घेण्याची मागणी केली आहे आणि मॉस्कोला पुन्हा हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी कीवला नाटोचे सदस्यत्व किंवा समतुल्य सुरक्षा हमी मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
चीनचा शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न
युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी रशियासोबतच्या घनिष्ट संबंधांचा वापर करण्यासाठी चीनला पाश्चिमात्य देशांकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे.
बीजिंगने म्हटले आहे की त्यांनी कधीच संघर्षातील पक्षांची बाजू घेतली नसली तरी ते सातत्याने त्यांच्या अटींवर शांतता चर्चेला प्रोत्साहन देत होते.
गेल्या वर्षीच्या शांतता योजनेत, चीनने ब्राझीलसोबत संयुक्तपणे “योग्य वेळी” आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेचा प्रस्ताव मांडला आणि युक्रेन तसेच रशिया या दोघांनाही समान सहभागासाठी आवाहन केले होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)