चीनची ‘पीपल्स काँग्रेस’ केवळ ‘रबर स्टॅम्प’

0
‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’चे संग्रहित छायाचित्र.

निवडणूक प्रकिया सदोष: माजी सदस्यांचा दावा

दि. ०८ मार्च: चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) अधिपत्याखाली सुरु असलेले ‘नॅशनल पीपल्स कॉंग्रेस’ (एनपीसी) व ‘चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स’ (सीपीपीसीसी) चे अधिवेशन म्हणजे केवळ धूळफेक आहे. या दोन्ही समित्यांची निवड प्रक्रिया अतिशय सदोष असून, ती ‘सीसीपी’च्या निर्देशानुसारच राबविली जाते. या समित्यांना कसलीही स्वायत्तता नसल्यामुळे पीपल्स कॉंग्रेस केवळ ‘रबर स्टॅम्प’ आहे, असा दावा ‘नॅशनल पीपल्स कॉंग्रेस’मधील दोन माजी सदस्यांनी केला आहे.

‘एनपीसी’ व ‘सीपीपीसीसी’ या दोन्ही सभागृहांचे ‘टू सेशन्स’ म्हणून ओळखले जाणारे अधिवेशन सध्या चीनची राजधानी बीजिंग येथील ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’मध्ये सुरु आहे. या अधिवेशनाला या दोन्ही सभागृहातील तीन हजार सदस्य उपस्थित आहेत. हे सर्व सदस्य लोकशाही मार्गाने निवडून आले असून लोकशाही कशी राबवावी, याचे प्रशिक्षण या सदस्यांना ‘टू सेशन्स’मध्ये दिले जाते, दावा चीनकडून करण्यात येतो. त्यापार्श्वभूमीवर माजी सदस्यांचा हा गौप्यस्फोट महत्त्वाचा मानला जात आहे. ‘एनपीसी’ ही चीनची सर्वोच्च राजकीय निर्णय घेणारी सभा मानली जाते. प्रत्यक्षात मात्र चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या मर्जीनुसार व निर्देशानुसारच ‘एनपीसी’ निर्णय घेते. स्वतंत्र निर्णय घेण्याची तिची क्षमता नाही. ही सभागृह जगातील सर्वात मोठे कायदेमंडळ मानले जाते. चीनमधील ३५ प्रांतातून या सभागृहासाठी प्रतिनिधी निवडले जातात. या साठी निवडणूक होत असल्याचा दावा चीनकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र चिनी कम्युनिस्ट पक्षच पूर्ण निवडणूक प्रक्रिया नियंत्रित करतो. त्यामुळे हे प्रतिनिधी थेट लोकांकडून निवडले जात नाहीत. म्हणूनच, ही दोन्ही सभागृहे केवळ ‘रबर स्टॅम्प’ आहेत, असे ‘एनपीसी’चे माजी सदस्य हुआंग सोन्घाई यांनी सांगितले. ते २००७मध्ये ‘एनपीसी’चे सदस्य होते.

‘आमची निवडणूक प्रक्रिया एका अर्थाने बनावटच आहे. सदस्यांची निवड थेट लोकांतून न होता पक्षाच्या मर्जीनुसार होते. सदस्याला पक्षाच्या सरचिटणीसांना उत्तरदायी राहावे लागते व ते सांगतील त्यानुसार काम करावे लागते. या प्रक्रियेत चुकून काही स्वतंत्र विचाराचे लोक निवडले जातात, पण त्यांना काम करता येत नाही. एकूणच हे अतिशय निराशाजनक आहे,’असे सोन्घाई म्हणाले. चीनच्या पोयांग प्रांतातील जिआंगस्की येथून २००७मध्ये त्यांची एनपीसीवर निवड झाली होती. यावो लि फा यांनी १९९८मध्ये अपक्ष म्हणून एनपीसीची निवडणूक लढविली होती. हुबेई प्रांतातील क़्विआनजिआन शहरातून ते निवडून गेले होते. त्यांनीही एनपीसीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली. ‘आमच्याकडे अनेकदा निवडणुका होतात, मात्र त्यातून काय साध्य होते, याचा विचार केल्यास हाती एक मोठे शून्य येते. स्वतंत्र मताच्या लोकांसाठी चीनमध्ये दिवसेंदिवस अडचणीची परिस्थिती निर्माण होत आहे,’ असे ते म्हणाले.

‘मी २०११ व २०२१ अशी दोन वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मात्र, पक्षाची मान्यता नसेल तर तुमची निवडणूक बाद ठरविली जाऊ शकते,’ असे वेंग शियू झेंग या महिलेने सांगितले. चीनमध्ये लोकशाहीची वानवा असली तरीही सध्या जी काही प्रक्रिया उपलब्ध आहे; त्यात आम्ही सहभागी होणार आहोत व त्याच मार्गाने परिवर्तनासाठी प्रयत्न करणार आहोत असे, त्या म्हणाल्या.

विनय चाटी


Spread the love
Previous articleDIMDEX 24: Large Inventory Of Iranian Arms On Display
Next articleSea Defenders-2024: U.S – India Joint Exercise At Port Blair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here