एमआय-17 हेलिकॉप्टर्सच्या ईडब्ल्यू सूट्सचे कंत्राट बीईएलला

0

संरक्षण मंत्रालयाने बेंगळुरू इथल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीसोबत भारतीय हवाई दलासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटस व विमान आधुनिकीकरण साहित्य अधिग्रहीत करण्यासाठी  आणि पूरक साधनांसह  ते एमआय 17 व्ही 5 हेलिकॉप्टर्समध्ये बसविण्यासंदर्भात सुमारे 2,385.36 कोटी रुपयांचा करार केला आहे. (भारतीय-स्वदेशी संकल्पना, विकास व उत्पादन) खरेदी श्रेणी अंतर्गत करण्यात आलेल्या या करारावर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत 7 एप्रिल 2025 रोजी स्वाक्षरी करण्यात आली. मूळचे रशियन असलेले एमआय-17 व्ही 5 हे एक अष्टपैलू लष्करी वाहतूक हेलिकॉप्टर आहे जे कर्मचारी, उपकरणे आणि अंतर्गत माल किंवा कमी भार वाहून नेण्यास सक्षम आहे.

“या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटसमुळे प्रतिकूल वातावरणात हेलिकॉप्टर्सची काम करत टिकून राहण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल. यातील बहुतांश सुटे भाग व उप जोडण्यांची निर्मिती स्वदेशी उत्पादकांकडून केली जाणार आहे,”  असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.


डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टीम्स अँड इंटिग्रेटेड डिफेन्स कॉम्बॅट सिस्टीम्सने (सीएएसडीआयसी) स्वदेशी पद्धतीने रचना आणि विकास केलेला ईडब्ल्यू संच बीईएलद्वारे तयार केला जाईल. या प्रणालीमध्ये रडार वॉर्निंग रिसिव्हर (आरडब्ल्यूआर), मिसाईल अप्रोच वॉर्निंग सिस्टम (एमएडब्ल्यूएस) आणि काउंटर मेझर डिस्पेन्सिंग सिस्टम (सीएमडीएस) यांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश लढाऊ परिस्थितीत जगण्याची क्षमता सुधारण्यासाठी रडार आणि क्षेपणास्त्रांच्या धोक्यांचा शोध घेणे आणि त्यांचा प्रतिकार करणे हा आहे.

 

या प्रकल्पामुळे एमएसएमइसह भारतीय इलेक्ट्रॉनिक्स व संबंधित उद्योगांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन व चालना मिळेल.  एमआय 17 व्ही 5 साठी बनवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटस हे स्वदेशी क्षमता विकसित करण्याच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा असून मेक इन इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने देशाला आत्मनिर्भर बनवणारे आहे.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous article“समुद्र प्रदक्षिणा” मोहिमेला सुरुवात, सशस्त्र दलांमधील महिलांचा सहभाग
Next articleट्रम्प यांची 50 टक्के शुल्कवाढीची धमकी म्हणजे ‘ब्लॅकमेल’ : चीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here