ऑपरेशन सिंदूर : भारताच्या आरोपांवर चीनची प्रतिक्रिया

0
ऑपरेशन सिंदूर
चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग 
ऑपरेशन सिंदूर या भारतीय लष्कराने नुकत्याच संपवलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान बीजिंगने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याच्या एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांना चीनने सावधगिरीने प्रत्युत्तर दिले आहे. एका सौम्य निवेदनात, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की पाकिस्तानबरोबरचे त्याचे संरक्षण सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशासाठी नाही. याशिवाय प्रादेशिक स्थिरतेसाठी चीनच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 

सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या, “चीन आणि पाकिस्तान हे दीर्घकालीन पारंपरिक मैत्री असलेले जवळचे शेजारी आहेत. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आमचे सहकार्य कोणत्याही तिसऱ्या पक्षाला लक्ष्य करत नाही.”

भारतीय लष्कराचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंग यांनी गेल्या आठवड्यात एका सुरक्षा परिषदेत बोलताना म्हटले होते की, चीनने पाकिस्तानला केवळ ऑपरेशनमध्ये वापरल्या गेलेल्या 81 टक्के शस्त्रास्त्रांचा पुरवठाच केला नाही तर real time गुप्तचर माहिती देखील दिली. अप्रत्यक्षपणे भारताशी संवाद साधण्यासाठी पाकिस्तानचा “थेट प्रयोगशाळा” म्हणून वापर केला. पाकिस्तानने चीनची घेतलेली मदत म्हणजे ‘भाड्याने घेतलेला चाकू’ म्हणत त्यांनी चीनवर अप्रत्यक्ष संघर्षाला मदत केल्याचा  आरोप केला.

माओ निंग यांनी सांगितले की त्यांना भारतीय लष्कराच्या दाव्यांच्या तपशिलांची पूर्ण माहिती नाही, मात्र आम्ही भारत आणि पाकिस्तानमध्ये अलीकडे उद्भवलेल्या तणावावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत यावर त्यांनी भर दिला.

“भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही चीनसाठी महत्त्वाचे शेजारी आहेत,” त्या म्हणाल्या, “आम्हाला आशा आहे की ते चर्चेद्वारे विवाद सोडवू शकतील. या प्रक्रियेत चीन रचनात्मक भूमिका बजावण्यास तयार आहे.”

SCO बैठकीसाठी जयशंकर चीनला जाणार

या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर 14 आणि 15 जुलै रोजी तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी पुढील आठवड्यात चीनला भेट देणार आहेत. या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, या दौऱ्यात बहुपक्षीय कार्यक्रमाच्या आधी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील होऊ शकते.

पूर्व लडाखमध्ये 2020 मध्ये झालेल्या लष्करी संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना गंभीर फटका बसल्यानंतर जयशंकर यांचा हा पहिला चीन दौरा असेल.

जून 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्ष हा भारतीय आणि चिनी सैनिकांमधील दशकातील सर्वात प्राणघातक ठरला.‌ त्यानंतर प्रदीर्घ काळ चालणारी माघार प्रक्रिया सुरू झाली जी 2024 च्या उत्तरार्धात संपली.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी सीमाप्रश्नावर विशेष प्रतिनिधींच्या (एसआर) चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री यी हे देखील या महिन्याच्या अखेरीस भारतात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये बीजिंग येथे तर मे महिन्यात झालेल्या SCO सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान दोघांची भेट झाली होती.

धोरणात्मक स्पर्धेदरम्यान तणाव निवळण्याची चिन्हे

प्रदीर्घ तणाव असूनही, भारत आणि चीनने अलीकडच्या काही महिन्यांत राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. महामारी आणि सीमेवरील गतिरोधामुळे स्थगित करण्यात आलेली कैलाश मानसरोवर यात्रा गेल्या महिन्यात पुन्हा सुरू करण्यात आली. दोन्ही बाजूंनी एसआर यंत्रणा आणि उच्चस्तरीय संरक्षण तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या चर्चेसह प्रमुख राजनैतिक चर्चेचे मार्गही पुन्हा सुरू केले आहेत.

“भारत-चीन संबंध एका महत्त्वाच्या टप्प्यातून जात आहेत”, असे माओ निंग यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले. द्विपक्षीय संबंध स्थिर आणि सकारात्मक मार्गावर आणण्यासाठी आम्ही भारताबरोबर काम करण्यास तयार आहोत असेही त्या म्हणाल्या.

निरीक्षकांचे म्हणणे आहे की जयशंकर यांचा हा दौरा संबंध पुनर्प्रस्थापित करण्यासाठी तसेच या प्रदेशातील भू-राजकीय संघर्ष कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी म्हणून काम करू शकेल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleChina Reacts to India’s Accusation Over Operation Sindoor; Jaishankar to Visit Beijing Amid Strained Ties
Next articleभारतीय लष्करातील वरिष्ठ नेते कमांडर्स कॉन्फरन्ससाठी एकत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here