‘जॉइंट स्वोर्ड-२०२४ए’: तैवानच्या नव्या अध्यक्षांना ‘समजाविण्यासाठी’ केला सराव
दि. २५ मे: तैवानचे नवे ‘विभाजनवादी’ अध्यक्ष लाई चिंग-ते यांना ‘समजाविण्यासाठी’ चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (पीएलए) तैवानच्या खाडीच्या परिसरात सुरू केलेली युद्धसरावाची शनिवारी सांगता झाली. ‘जॉइंट स्वोर्ड-२०२४ए’ या नावाने चिनी सैन्यदलाकडून सुरू करण्यात आलेल्या या सरावात चिनी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि युद्धनौकांनी सहभाग नोंदविला होता. या सरावादरम्यान चिनी लढाऊ विमानांद्वारे तैवानवर ‘सिम्युलेटर’च्या सहाय्याने बॉम्बहल्ला करण्यात आला, तसेच तैवानी नौदलाच्या युद्धनौका ताब्यात घेण्याचा सरावही केला गेला.
तैवानमधील सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आलेले लाई चिंग-ते हे तैवानी राष्ट्रवादी नेते मानले जातात. चीनचा तैवानवरील दावा त्यांनी या पूर्वीही सातत्याने फेटाळून लावला आहे. मंगळवारी लाई चिंग-ते यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी ‘तैवान खाडीच्या दोन्ही बाजूला वसलेले प्रदेश वेगळे आहेत. कोणीही गौण नाही,’ असे विधान केले होते. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने लाई चिंग-ते यांनी केलेले विधान विभाजनवादी असून, त्यांचे हे विधान तैवानच्या स्वातंत्र्याची घोषणा असून, त्याच्याकडून तैवान आणि चीन हे दोन स्वतंत्र देश असल्यासारखे विधान करण्यात येत आहे, असे म्हटले होते. त्यामुळे लाई चिंग-ते यांच्या सत्ताग्रहणानंतर तीनच दिवसांनी त्यांना धडा शिकविण्यासाठी चीनकडून हा युद्धसराव आयोजित करण्यात आला होता. चीनकडून तैवानला चीनचाच एक भाग मानले जाते आणि चीन व तैवानचे एकत्रीकरण हा गेली सात दशके चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अजेंड्यावरील विषय आहे. लाई यांनी चीन आणि तैवान संघर्षाबाबत सातत्याने चीनबरोबर चर्चेची भूमिका मंडळी होती. ‘तैवानच्या भवितव्याचा फैसला केवळ तैवानी नागरिकच करतील. इतर देशांना त्याचा हक्क नाही,’ असे सांगून लाई यांनी चीनचा तैवानवरील दावा फेटाळला होता. दरम्यान, तैवानच्या सरकारने चीनकडून करण्यात आलेल्या युद्धसरावाचा निषेध केला असून, चीनच्या दबावाखाली आम्ही झुकणार नाही, असे म्हटले आहे.
चिनी सैन्यदलांकडून आयोजित केलेल्या युद्धसरावाची सांगता झाली असून, पूर्वीच जाहीर केल्यानुसार गुरुवार आणि शुक्रवारी हा सराव करण्यात आला, अशी माहिती चीन सरकारच्या लष्करी वृत्तवाहिनीने दिली आहे. शुक्रवारी चिनी हवाईदलाच्या ४६ विमानांनी तैवानची खाडीतील मेडन लाईन ओलांडून युद्धसराव केला. मेडन लाईन ही चीन आणि तैवानमधील अनौपचारिक सीमा मानली जाते. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, चीनच्या ६२ विमाने आणि २७ युद्धनौकांनी या युद्धसरावात भाग घेतला होता. सुखोई-३०, अण्वस्त्रवाहू एच-६ बॉम्बरसारखी विमाने या सरावात वापरण्यात आली. ही विमाने तैवानच्या खाडीबरोबरच तैवान आणि फिलिपिन्सला वेगळे करणाऱ्या बाशी खाडीपर्यंत जात होती, असेही तैवानी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. त्यांनी चिनी हवाईदलाच्या जे-१६ आणि एच-६ विमानांचे व्हिडिओ चित्रीकरणही सादर केले. मात्र, ही विमाने नक्की कोणत्या भागात होती, याची माहिती त्यांनी दिली नाही. तैवानला धमकाविण्यासाठी गेली चार वर्षे चीनकडून सातत्याने अशा सरावाचे आयोजन करण्यात येत आहे. चिनी लष्कराचे मुखपत्र म्हणविल्या जाणाऱ्या ‘द पीपल्स लिबरेशन आर्मी डेली’ या वृत्तपत्राने लाई यांची परकी शक्तींचे दलाल अशा शब्दांत संभावना केली आहे. चीनचा विकास रोखण्यासाठी ते परकी शक्तींना साथ देत आहेत, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. ‘तैवानमधील विभाजनवाद्यांनी त्यांचा निर्णय घेऊन तैवानला चीनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तर ‘पीएलए’ चिनी सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करेल आणि त्यांना चिरडून टाकेल,’ असे या लेखात म्हटले आहे.
विनय चाटी
(रॉयटर्स)