तैवानच्या खाडीत चिनी पाणबुडीची उपस्थिती

0
China-Taiwan Conflict:
चिनी (जीन क्लास) बॅलेस्टिक मिसाईल पाणबुडीचे दक्षिण चीन समुद्रातील छायाचित्र (संग्रहित छायाचित्र. रॉयटर्स)

परिस्थितीचा अंदाज घेत असल्याची तैवानच्या संरक्षणमंत्रांची माहिती

दि. १८ जून: चीन आणि तैवानला वेगळे करणाऱ्या तैवानच्या अरुंद खाडीत पुन्हा एकदा चिनी पाणबुडी निदर्शनास आली आहे. मंगळवारी ही चिनी पाणबुडी तैवानच्या खाडीत तैवानी मच्छिमार बोटीनजीक समुद्राच्या पृष्ठभागावर आल्याचे ऑनलाईन छायाचित्रामुळे निदर्शनास आले. त्यावर. ‘तैवानच्या खाडीत चिनी पाणबुडीची उपस्थिती दर्शविणारे ऑनलाईन छायाचित्र उघडकीस आल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज आम्हाला आला असून, योग्य ती कारवाई सुरु आहे,’ अशी माहिती तैवानचे संरक्षणमंत्री वेलिंग्टन कु यांनी दिली. मात्र, या बाबत इतर तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

तैवान हा आपला भाग असल्याची चिनी राज्यकर्त्यांची समजूत आहे. तर, तैवान हा स्वतंत्र व सार्वोभौम देश असल्याची तैवानी जनतेचे म्हणणे आहे. त्यामुळे उभय देशान या विषयावरून सातत्याने संघर्ष सुरु असतो. तैवानवर आपला हक्क दर्शविण्यासाठी चीन तैवानच्या खाडीत सातत्याने आपल्या युद्धनौका आणि लढाऊ विमानेही पाठवीत असतो. त्यामुळे तैवानची खाडी हा सातत्याने संघर्षरत भाग बनला आहे. ताज्या घटनेत चिनी पाणबुडी तैवानच्या पश्चिम किनारपट्टीपासून २०० किमी अंतरावर एका तैवानी मच्छिमार बोटीच्या जवळ समुद्राच्या पृष्ठभागावर आल्याचे छायाचित्र तैवानी माध्यमांनी प्रकाशित केले. ही चिनी पाणबुडी जीन क्लासची असून, ती अणुइंधनावर आधारित बॅलेस्टिक मिसाईल पाणबुडी असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे तैवानी माध्यमांनी म्हटले आहे. त्यावर विचारले असता, ‘आम्हाला परिस्थितीचा अंदाज आला असून, त्या पाणबुडीवर आमचे लक्ष आहे,’ असे तैवानी संरक्षणमंत्री वेलिंग्टन कु यांनी सांगितले. मात्र, त्या पाणबुडीवर कसे लक्ष थावण्यात येत आहे अथवा इतर तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. या बाबत चीनच्या संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

तैवानच्या नैऋत्य किनारपट्टीवर समुद्र तुलनेने उथळ आहे. तर, तैवानच्या खाडीत नौकानयन आणि पाणबुडीसाठी आवश्यक खोली आहे. त्यामुळे या भागात छुपा हल्ला करण्यासाठी आदर्श परिस्थिती आहे. त्यामुळे तैवान, चीन, अमेरिकेसह जगभरातील नौदालांसाठी हा भाग ‘हॉट स्पॉट’ मानला जातो. बॅलेस्टिक मिसाईल पाणबुडीचा उपयोग जहाजांवर हल्ला करण्यासाठी नव्हे, तर क्षेपणास्त्रांच्या मदतीने जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी केला जातो, असे मत सामरिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तैवानच्या पी-३सी ओरीओन या पाणबुडीविरोधी विमानांमुळे तैवानला खाडीच्या दक्षिण भागापर्यंत अतिशय सहजपणे पोहोचता येते. ही विमाने तैवानने दक्षिण भागातील पिंगटुंग हवाईतळावर तैनात केली आहेत. चीनकडून लादण्यात येत असलेले अप्रत्यक्ष युद्ध  आणि या भागातील जैसे थे स्थिती एकतर्फी बदलण्यासाठी खाडीचे लचके तोडण्याचे सुरु असलेले प्रयत्न याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. या मुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, चौकस राहावे लागेल, असेही  कु म्हणाले. गेल्या २४ तासांत तैवानच्या परिसरात २० चिनी लढाऊ विमाने आणि सात जहाजे निदर्शनास आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

विनय चाटी

(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here