फिलिपिन्सच्या नेतृत्वाखालील संयुक्त सागरी गस्त मोहिमेचा चीनकडून पाठपुरावा

0
संयुक्त सागरी गस्त

चीनच्या लष्कराने शनिवारी जाहीर केले की, “त्यांनी 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी, दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्सच्या नेतृत्वाखाली झालेल्या संयुक्त सागरी गस्त मोहिमेवर लक्ष ठेवले आणि त्याचा पाठपुरावा घेतला.”

शुक्रवारी, वॉशिंग्टन आणि मनिला यांनी नवीन संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर, या प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. या टास्क फोर्सचा मुख्य उद्देश दक्षिण चीन समुद्रासह विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवणे हा आहे. हा समुद्री मार्ग जगातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असून, दरवर्षी 3 ट्रिलियन डॉलर्सहून अधिक व्यापार या मार्गाने होतो.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या साउदर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते तियान जुनली, यांनी या गस्त मोहिमेचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, “ही कारवाई प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला गंभीर धक्का पोहोचवणारी आहे.” तियान यांनी फिलिपिन्सला “त्रासदायक घटक” म्हटले आणि अत्यंत सतर्क असल्याचे सांगत “राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि सागरी हितसंबंधांचे निर्णायकपणे रक्षण करण्याची” शपथ घेतली.

बीजिंगमधील फिलिपिन्स दूतावासाने या घटनेवर अद्यापकोणतीही  प्रतिक्रिया दिलेली नाही.

अहवालांनुसार, या गस्त मोहीमेमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स आणि अमेरिकेच्या नौदल दलांनी सहभाग घेतला होता. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दक्षिण चीन समुद्रात हा संयुक्त युद्धसराव पार पडला.

अमेरिकेच्या सातव्या ताफ्याच्या (7th Fleet) निवेदनानुसार, “स्वतंत्र आणि खुले इंडो-पॅसिफिक क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याबाबची सामूहिक बांधिलकी अधोरेखित करणे” हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.

चीन जवळजवळ संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगतो. त्यामुळे त्याचे दावे ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स आणि व्हिएतनाम यांसारख्या इतर देशांच्या हक्कांच्या क्षेत्रांना ओव्हरलॅप करतो. 2016 मध्ये, हॅग येथील आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने चीनच्या विस्तृत दाव्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अवैध ठरवले होते, पण आजपर्यंत चीनने तो निर्णय स्विकारलेला नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleहंगेरी: 2026 च्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी सुरू केला पेन्शन बोनस
Next articleRajnath Singh Calls for Collective Security to Keep Indo-Pacific Free from Coercion at ASEAN Defence Meet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here