चीनच्या गुप्तचर प्रमुखांनी मांडला, पंचवार्षिक सुरक्षेचा ठोस आराखडा

0
चीनच्या गुप्तचर

चीनच्या सर्वोच्च गुप्तचर अधिकाऱ्यांनी, पुढील पाच वर्षांसाठीचा एक व्यापक सुरक्षा आराखडा सादर केला आहे, ज्यामध्ये तैवानचे स्वातंत्र्य प्रतिबंध करणे, तंत्रज्ञान चोरी रोखणे, हेरगिरीविरोधी प्रयत्नांना तीव्र करणे आणि चीनचे परदेशातील हितसंबंध आणि व्यापार मार्गांचे संरक्षण अधिक वाढवणे, या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर दिला आहे.

पक्षाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘स्टडी टाइम्स’ या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका विस्तृत लेखात, राज्य सुरक्षा मंत्री चेन यिक्सिन यांनी म्हटले आहे की, ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’ ने स्वतःला एका आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित आणि राजकीयदृष्ट्या निष्ठावान गुप्तचर यंत्रणेत विकसित करणे आवश्यक आहे, जे त्यांच्या मते, वेगाने वाढणारे बाह्य आणि अंतर्गत धोके म्हणून वर्णन केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम असेल.

राष्ट्रीय सुरक्षेची ‘अभेद्य भिंत’ (Great Wall) उभारणे

‘राष्ट्रीय सुरक्षेची अभेद्य भिंत’ उभारण्याची गरज, या दृष्टिकोनातून चेन यांनी आपले मत मांडले. पक्ष आणि राज्याचे संरक्षण करणे हा चीनच्या आधुनिकीकरण उद्दिष्टांचा मूलभूत आधार बनला आहे, असे ते म्हणाले. त्यांनी आपल्या निर्देशांना अलीकडील चौथ्या पूर्णाधिकार बैठकीत घेतलेल्या निर्णयांशी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मार्गदर्शनाशी जोडले, आणि हा 2026–2030 या कालावधीतील चीनच्या सुरक्षा भूमिकेचा वैचारिक आधार असल्याचे सांगितले.

कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यावर बारकाईने लक्ष ठेवणारे चीनी तज्ज्ञ मनोज केवलरामानी म्हणतात की, “चेन यिक्सिन हे प्रभावीपणे ‘धोक्यांनी भरलेल्या जगाचे एक विदारक चित्र’ रेखाटत आहेत, जे मुख्यतः प्रमुख सत्तांमधील पद्धतशीर संघर्षामुळे तयार झाले आहे.” “चेन यांची मांडणी पक्षाच्या पूर्णाधिकार बैठकीनंतरच्या मूल्यांकनाशी अधिक जुळते: एकाधिकारशाहीतून बहुध्रुवीयतेकडे संक्रमण होत असले, तरी यातून भू-राजकीय अशांतता, आर्थिक विभाजन आणि तंत्रज्ञानाचे शस्त्रीकरण देखील निर्माण होत आहे. यामुळे, चीनने सर्वच क्षेत्रांमधील सुरक्षा मजबूत करण्याची भूमिका घेतली आहे,” असे ते नमूद करतात.

आणखीन एक सुप्रसिद्ध चीनी तज्ज्ञ जाबिन जेकब सूचित करतात की, “चेन यांचा लेख कुठलीही नवीन कल्पना मांडत नाही, परंतु पक्षाच्या धोरणात्मक विचारसरणीला स्पष्ट आणि प्रणालीबद्ध पद्धतीने एकत्र आणण्याच्या दृष्टीने त्याचे नक्कीच महत्व आहे.” एका प्रमुख पक्षीय प्रसार माध्यमातून हा लेख प्रकाशित होणे, त्याचे राजकीय वजन अधोरेखित करते आणि चीनच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दलची कुठलीही अस्पष्टता दूर करते, असे ते म्हणतात. जेकब यांच्या मते, बीजिंगच्या वाढत्या आक्रमकतेमुळे थेट प्रभावित झालेल्या देशांसाठी, हा दस्तऐवज (लेख) प्रतिसादांची आखणी किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी स्पष्टपणे आधार देतो. आता चीनच्या कृतींनी कोणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असेही ते म्हणतात.

लेखाचा एक मोठा भाग, चेन यांच्या बिघडत चाललेल्या जागतिक वातावरणाच्या वर्णनाने व्यापला आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, जग सध्या एका ‘वादळी पट्ट्यात’प्रवेश करत आहे, ज्यामध्ये वाढती भू-राजकीय स्पर्धा, अमेरिकेचे कमी होत चाललेले वर्चस्व, ग्लोबल साउथच्या नेतृत्वाखालील बहुध्रुवीयतेचा विस्तार, तीव्र तंत्रज्ञान स्पर्धा आणि पुन्हा सक्रिय होत असलेली दहशतवादी चळवळ या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चीनच्या गुप्तचर, कायदेशीर आणि सुरक्षा प्रणालींचे सखोल एकीकरण आवश्यक आहे, असे त्यांनी लेखात नमूद केले आहे.

तैवान: सुरक्षा लढाईच्या केंद्रस्थानी

तैवानला मध्यवर्ती सुरक्षा प्राधान्य म्हणून लेखात सादर केले आहे. ‘दोन्ही राष्ट्रांचे एकीकरण’ हे चीनच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आवश्यक आहे, असे चेन यांनी नमूद केले आहे आहे. तसेच, ‘तैवानचे स्वातंत्र्य‘ संपुष्टात आणलेच पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला आहे. याशिवाय, परदेशी, विशेषत: अमेरिकेकडून होणारा हस्तक्षेप चीन सहन करणार नाही, अशी ताकीदही त्यांनी दिली आहे.

चेन यांनी या लेखातून, MSS च्या आगामी वर्षांतील कार्याचे मार्गदर्शन करण्यासाठी, ‘पाच विरोधी संघर्ष’ (Five Anti-Struggles) चौकटीची देखील ओळख करून दिली आहे. यामध्ये विध्वंसक कारवायांचा विरोध, विदेशी वर्चस्वाला विरोध, फुटीरतावादाचा सामना, दहशतवादाविरुद्ध लढा आणि हेरगिरीविरोधी कारवायांचा विस्तार करणे यांचा समावेश आहे.

आर्थिक आणि तंत्रज्ञान सुरक्षा अग्रभागी

आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षा या योजनेत महत्वपूर्ण ठरतात. चीनचा प्रगत तंत्रज्ञान वापर प्रतिबंधित करणे, पुरवठा साखळी विस्कळीत करणे आणि अन्य निर्बंधांद्वारे त्याचा विकास कमकुवत करण्याच्या प्रयत्नांबद्दल, चेन यांनी इशारा दिला आहे. महत्त्वाचे तंत्रज्ञान, धोरणात्मक संसाधने आणि औद्योगिक प्रणाली सुरक्षित करणे, हे राष्ट्रीय-सुरक्षेच्या मुख्य प्राधान्यांमध्ये असेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

चेन यांनी, चीनच्या परदेशातील विस्तारत असलेल्या उपस्थितीचे रक्षण करण्याची गरजही अधोरेखित केली आहे. यासाठी त्यांनी अग्रस्थानी तैनात गुप्तचर नेटवर्क, पूर्व-चेतावणी देणाऱ्या प्रणाली तसेच परदेशातील नागरिक, कंपन्या आणि बेल्ट अँड रोड पायाभूत सुविधांना सुरक्षित करण्यासाठी यंत्रणांची मागणी केली.

एक आधुनिक, AI-आधारित गुप्तचर राष्ट्र

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रिअल-टाईम पाळत प्लॅटफॉर्म्स आणि एकीकृत कमांड सिस्टीमद्वारे MSS चे आधुनिकीकरण करणे, हा या योजनेचा आणखी एक प्रमुख आधारस्तंभ आहे. चेन यांनी यावर जोर दिला आहे की, तांत्रिक सुधारणांना वैचारिक शिस्तीची जोड मिळायलाच हवी. यासाठी त्यांनी ‘प्रामाणिक, निष्कलंक आणि कठोर शिस्तीच्या’ सुरक्षा दलाची गरज अधोरेखित केली आहे.

हा लेख, स्टडी टाइम्समध्ये प्रकाशित होणे हे उच्च-स्तरीय राजकीय समर्थनाचे सूचक आहे आणि यातून हे स्पष्ट होते की, चीनच्या पुढील पंचवार्षिक योजनेत आर्थिक विचारांपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जाईल.

मूळ लेखिका- रेशम

+ posts
Previous articleपरदेशस्थ वारसदारांचे बांगलादेशी निवडणूक राजकारणावर वर्चस्व
Next articleIndia Stands by Sri Lanka: Army Becomes First Responder Under ‘Neighbourhood First’ Policy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here