अमेरिकेच्या NSAच्या भारत दौऱ्यात चिनी धरणांवर चर्चा होणार

0
अमेरिकेच्या

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन  5  आणि 6 जानेवारीला नवी दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी चीनच्या धरण बांधणीच्या प्रभावाबद्दल ते भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित असल्याचे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा भारत दौरा हा नवीन वर्षातील दुसरा उच्चस्तरीय दौरा आहे.

आशिया आणि त्यापलीकडे चीनच्या वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करणारा देश म्हणून वॉशिंग्टन आणि त्याचे पाश्चिमात्य सहकारी बऱ्याच काळापासून भारताकडे पाहत आले आहेत.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुलिव्हनच्या भेटीपूर्वी सांगितले की, “आम्ही इंडो-पॅसिफिकमधील अनेक ठिकाणी निश्चितपणे पाहिले आहे की मेकोंग प्रदेशासह चीनने तयार केलेल्या वरच्या भागातील धरणांमुळे पर्यावरणीय नुकसान होऊ शकते. याशिवाय खाली असणाऱ्या देशांच्या हवामानावरही परिणाम होऊ शकतो.”

या दौऱ्यात वॉशिंग्टन नवी दिल्लीला वाटणाऱ्या चिंतांबाबतही चर्चा करेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

भारतात वाहत येणाऱ्या यारलुंग झांग्बो (ब्रह्मपुत्रा) नदीवर तिबेटमध्ये जलविद्युत धरण बांधण्याच्या चीनच्या योजनेबद्दल वाटणारी चिंता बीजिंगजवळ व्यक्त केल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.

चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तिबेटमधील जलविद्युत प्रकल्पांचा पर्यावरणावर किंवा खालच्या पाण्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार नाही. दरवर्षी अंदाजे 300 अब्ज किलोवॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या धरणाच्या बांधकामाला गेल्याच महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे.

या दौऱ्यादरम्यान नागरी आण्विक सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, लष्करी परवाना आणि चिनी आर्थिक अतिसामर्थ्य यासारखे विषय चर्चेला येतील अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे  अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले.

यावेळी अमेरिकन अधिकारी दलाई लामा यांना भेटणार नसल्याचा खुलासाही अमेरिकेच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये अलिकडच्या काही वर्षांमध्ये जवळचे संबंध प्रस्थापित झाले असले तरी अनेक मुद्द्यांवर अधूनमधून मतभेदही बघायला मिळतात.

यामध्ये भारतातील अल्पसंख्याकांवरील अत्याचार, मॉस्कोच्या युक्रेनवरील आक्रमणादरम्यान रशियाशी असलेले भारताचे संबंध आणि अमेरिका तसेच कॅनडाच्या भूमीवर शीख फुटीरतावाद्यांच्या हत्येचे कथित कट यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)  


Spread the love
Previous articleIndia Protests Creation Of New Chinese ‘Counties’ In Ladakh Region
Next articleवॉशिंग्टन डीसीमधील गोळीबारात पाचजण जखमी, नव्या वर्षातील हा 7वा हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here