चीनच्या समजूतीला धक्का देत आपला उत्तराधिकारी चीनबाहेर जन्म घेईल असे तिबेटी बौद्ध धर्माचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी आपल्या नवीन पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे सहा दशकांहून अधिक काळापूर्वी तिबेटवरील नियंत्रणावरून चीनबरोबर झालेला वाद परत उफाळून आला आहे.
जगभरातील तिबेटी लोकांना 89 वर्षीय दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर त्यांची संस्था सुरू ठेवायची आहे, असे ते ‘व्हॉईस फॉर द व्हॉइसलेस’ मध्ये लिहितात, ज्याचे रॉयटर्सने परीक्षण केले आणि मंगळवारी त्याचे प्रकाशन केले जाणार आहे.
आध्यात्मिक नेत्यांची रांग आपल्यासोबत संपुष्टात येईल असे त्यांनी याआधी म्हटले होते.
त्यांच्या पुस्तकात दलाई लामा यांनी पहिल्यांदाच नमूद केले आहे की त्यांचा उत्तराधिकारी चीनबाहेरील “मुक्त जगात” जन्म घेईल. यापूर्वी तो तिबेटच्या बाहेर पुनर्जन्म घेऊ शकतो, बहुधा भारतात जिथे ते पळून आश्रयाला आले होते त्या ठिकाणी एवढेच फक्त त्यांनी म्हटले होते.
दलाई लामा लिहितात, “पुनर्जन्माचा उद्देश पूर्ववर्तीचे कार्य पुढे नेणे हा असल्याने, नवीन दलाई लामा मुक्त जगात जन्म घेतील जेणेकरून दलाई लामा यांचे पारंपरिक ध्येय-म्हणजे, सार्वत्रिक करुणेचा आवाज बनणे, तिबेटी बौद्ध धर्माचे आध्यात्मिक नेते आणि तिबेटी लोकांच्या आकांक्षांचे मूर्त स्वरूप असलेले तिबेटचे प्रतीक-सुरूच राहील.”
14 वे दलाई लामा तेनझिन ग्यात्सो हे माओ त्से तुंगच्या कम्युनिस्टांच्या राजवटीविरुद्ध अयशस्वी उठावानंतर 1959 मध्ये इतर हजारो तिबेटी लोकांसह वयाच्या 23 व्या वर्षी भारतात पळून आले.
तिबेटचा मुद्दा जिवंत ठेवल्याबद्दल 1989 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या दलाई लामा यांना चीनने ‘फुटीरतावादी’ म्हटले आहे.
दलाई लामा हे राजकीय निर्वासित आहेत ज्यांना “तिबेटी लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा अजिबात अधिकार नाही”, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मंगळवारी बीजिंग येथे नियमित पत्रकार परिषदेत या पुस्तकाबद्दल विचारले असता सांगितले.
बीजिंग आपण उत्तराधिकारी निवडू असा आग्रह धरत आहे, परंतु चीनने नियुक्त केलेल्या कोणत्याही उत्तराधिकाऱ्या मान्यता दिली जाणार नाही, असे दलाई लामा यांनी म्हटले आहे.
चिनी प्रवक्ते माओ निंग म्हणाले, “दलाई लामा यांची जिवंत बुद्धांची वंशावळ चीनच्या तिबेटमध्ये तयार झाली, विकसित झाली आणि त्यांची धार्मिक स्थिती आणि नाव देखील (चीनच्या) केंद्र सरकारद्वारे निश्चित केले गेले.”
“14 वे दलाई लामा स्वतः धार्मिक विधी आणि ऐतिहासिक परंपरांनुसार ओळखले गेले होते आणि त्यांना उत्तराधिकारी म्हणून मंजूरी देण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.”
चिनी कम्युनिस्ट राजवटीची दडपशाही
बीजिंगने गेल्याच महिन्यात म्हटले होते की, त्यांना आशा आहे की दलाई लामा “योग्य मार्गावर परत येतील.” तिबेट आणि तैवान हे चीनचे अविभाज्य भाग आहेत, ज्यांचे एकमेव कायदेशीर सरकार पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे आहे हे मान्य करणे यासारख्या अटींची पूर्तता केल्यास ते त्यांच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यास तयार आहेत. हा प्रस्ताव भारतातील निर्वासित तिबेटी संसदेने फेटाळला आहे.
दलाई लामा आणि तिबेटी कार्याच्या समर्थकांमध्ये तिबेटी बौद्ध धर्माचे अनुयायी रिचर्ड गेरे आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या माजी अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांचाही समावेश आहे.
गेल्या वर्षी झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचे अनुयायी त्यांच्या आरोग्याबद्दल विशेष करून चिंतित आहेत. मात्र डिसेंबरमध्ये दलाई लामा यांनी रॉयटर्सला सांगितले की ते कदाचित 110 वर्षे जगतील.
दलाई लामा यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांना एका दशकापेक्षा जास्त काळापासून तिबेटी लोकांच्या विविध गटांकडून असंख्य याचिका प्राप्त झाल्या आहेत, ज्यात ज्येष्ठ भिक्षू तसेच तिबेटमध्ये आणि बाहेर राहणाऱ्या तिबेटी लोकांचा समावेश आहे, “दलाई लामा यांचा वंश चालू राहील याची खात्री करण्यासाठी सगळ्यांनी मला एकसमान विनंती केली आहे.”
तिबेटी परंपरेनुसार, ज्येष्ठ बौद्ध भिक्षूच्या आत्म्याचा त्यांच्या मृत्यूनंतर मुलाच्या शरीरात पुनर्जन्म होतो. सध्याचे दलाई लामा हे दोन वर्षांचे असताना त्यांच्या पूर्वजांचा पुनर्जन्म म्हणून ओळखले जात होते.
दलाई लामा यांचा चिनी नेत्यांशी सात दशकांहून अधिक काळ झालेल्या व्यवहाराचे वर्णन करणारे हे पुस्तक मंगळवारी अमेरिकेत विल्यम मोरो आणि ब्रिटनमध्ये हार्परनॉनफिक्शन यांनी प्रकाशित केले असून त्यानंतर भारत आणि इतर देशांमध्ये हार्परकॉलिन्सकडून प्रकाशित केले जाईल.
जुलैमध्ये आपल्या 90व्या वाढदिवसाच्या आसपास उत्तराधिकाऱ्याबद्दलचा तपशील आपण जाहीर करू, असे सांगणाऱ्या दलाई लामा यांनी लिहिले आहे की त्यांची मातृभूमी “दडपशाही करणाऱ्या कम्युनिस्ट चिनी राजवटीच्या विळख्यात” आहे आणि तिबेटी लोकांच्या स्वातंत्र्यासाठीची मोहीम “काहीही झाले”, तरी त्यांच्या मृत्यूनंतरही सुरू राहील.
तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी राजकीय कार्य सुरू ठेवण्यासाठी त्यांनी तिबेटी सरकार आणि त्यांच्याबरोबर भारतातील हिमालयीन शहर धरमशाला येथे असलेल्या निर्वासित संसदेवर विश्वास व्यक्त केला.
ते लिहितात, “तिबेटी लोकांना त्यांच्या मातृभूमीचे संरक्षक होण्याचा अधिकार अनिश्चित काळासाठी नाकारला जाऊ शकत नाही, तसेच त्यांच्या स्वातंत्र्याची आकांक्षा दडपशाहीद्वारे कायमची चिरडली जाऊ शकत नाही.” ते लिहितात, “इतिहासातून आपल्याला एक स्पष्ट धडा माहित आहेः जर तुम्ही लोकांना कायमचे दुःखी ठेवले तर तुमचा समाज स्थिर राहू शकत नाही.”
ते लिहितात, आताचे आपले वय पाहता, तिबेटला परत जाण्याच्या आपल्या आशा “अधिकाधिक धूसर” व्हायला लागल्या आहेत. मात्र, तिबेटी लोकांसाठी अजूनही आध्यात्मिक नेते म्हणून ते आदरणीय आहेत.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)