तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा गुडघ्याच्या उपचारासाठी अमेरिकेला जाणार

0
तिबेटी
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 15 जून 2016 रोजी व्हाईट हाऊसच्या मॅपरूम प्रवेशद्वारावर परमपूज्य दलाई लामा यांचे स्वागत करताना (पीट सूझा यांनी व्हाईट हाऊससाठी काढलेले छायाचित्र; फाईल फोटो)

तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा या महिन्यात त्यांच्या गुडघ्यांवरील वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जाणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सोमवारी सांगितले.

88 वर्षीय लामा यांना गेल्या ऑक्टोबरमध्ये फ्लूची लागण झाल्यानंतर कोणताही प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु बरे झाल्यानंतर त्यांनी जानेवारीत पूर्व भारतातील सर्वात पवित्र बौद्ध स्थळांपैकी एक असलेल्या बोधगयाला भेट दिली.

“परमपूज्य दलाई लामा गुडघ्यांवरील वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत. तिथून परतल्यानंतर नियमित कार्यक्रमांना पुन्हा सुरूवात होईल,” असे त्याच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ते उत्तर भारतातील हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या धरमशाला या गावी कधी परततील याचा उल्लेख निवेदनात केलेला नाही. धरमशाला येथील हिरव्यागार टेकड्या आणि बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेल्या मंदिराच्या आवारातच त्यांचे वास्तव्य आहे.

तिबेटमधील चिनी राजवटीविरुद्ध अयशस्वी उठावानंतर दलाई लामा 1959 मध्ये भारताच्या आश्रयाला आले आणि तेव्हापासून चीन त्यांना धोकादायक फुटीरतावादी मानते. चिनी अधिकारी इतर देशांतील अधिकाऱ्यांसोबत दलाई लामा यांच्या होणाऱ्या कोणत्याही बैठकीला ढोंगीपणा मानतात.

नोबेल शांतता पुरस्कार विजेते असणाऱ्या दलाई लामा यांनी त्यांच्या दुर्गम, डोंगराळ प्रदेश असणाऱ्या मातृभूमीला भाषिक आणि सांस्कृतिक स्वायत्ततेसाठी जागतिक समर्थन मिळावे यासाठी अनेक दशके काम केले आहे.

अमेरिकेच्या मागील दौऱ्यांमध्ये अमेरिकी अध्यक्षांसह अनेक  अधिकाऱ्यांसोबत त्यांची भेट झाली होती. मात्र यावेळी जूनच्या दौऱ्यामध्ये अशा काही बैठका ठरवण्यात आल्या आहेत का याबाबत अमेरिकेने कोणतीही माहिती दिलेली नाही.

अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला सांगितले की, “दलाई लामांबरोबरच अमेरिकी अधिकारी आणि इतर आदरणीय धार्मिक व्यक्तींमध्ये याआधी प्रदीर्घ काळ बैठका पार पडल्या असल्या तरी आमच्याकडे सध्या दलाई लामांच्या या दौऱ्याबाबत भाष्य करण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून बायडेन यांनी अजूनही दलाई लामा यांची भेट घेतलेली नाही. 2020 मधील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीन दशकांत तिबेटी आध्यात्मिक नेत्याची भेट न घेणारे किंवा त्यांच्याशी न बोलणारे एकमेव अध्यक्ष असल्याबद्दल टीका करत ही कृती ‘अपमानास्पद’ असल्याचे म्हटले होते.

सध्या अमेरिका आणि चीन आपल्यातले ताणले गेलेले खडतर संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी दलाई लामा यांच्या अमेरिका भेटीमुळे चीनमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे.

द अटलांटिक मासिकाने म्हटले आहे की दलाई लामा यांचा अमेरिकेचा दौरा झाल्यानंतर या महिन्याच्या अखेरीस अमेरिकन संसदेच्या माजी अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या आध्यात्मिक नेत्याला भेटण्यासाठी धरमशालेला जाणार आहेत.

सभागृहाच्या तत्कालीन अध्यक्षा पेलोसी यांनी चीनचा विरोध डावलून तैवानला भेट दिल्यानंतर 2022 मध्ये चीन अमेरिका  संबंधांमध्ये बरीच उलथापालथ झाली.
पेलोसीचे प्रवक्ते इयान क्रेगर यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पेलोसीच्या “आगामी किंवा संभाव्य परदेशी प्रवासावर” भाष्य करण्यास नकार दिला.

चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू म्हणाले की, “दलाई लामा यांनी कोणत्याही देशात कोणत्याही क्षमतेने किंवा नावाने केलेल्या चीनविरोधी फुटीरतावादी कारवायांचा चीन ठाम विरोध करतो आणि कोणत्याही देशाच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या संपर्कासही विरोध करतो.”

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleA Summer Carnival in Dras: Celebrating Culture, Sports, and Unity
Next articleUnveiling Shivaji: The Forefather of Modern Guerrilla Warfare and Intelligence Strategies: Part II

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here