Bangladesh Jet Crash: अपघातातील मृतांचा आकडा 27 वर पोहोचला

0

सोमवारी, Bangladesh एअर फोर्सचे प्रशिक्षण विमान एका शाळा आणि महाविद्यालयाच्या आवारात कोसळले. या अपघातात लागलेल्या आगीमध्ये 25 मुलांसह किमान 27 जणांचा मृत्यू झाला आहे आणि जखमी झालेल्या 88 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मंगळवारी स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

F-7 BGI हे लढाऊ विमान, सोमवारी दुपारी (स्थानिक वेळेनुसार) 1:06 मिनिटींच्या सुमारास, कुर्मिटोला एअरबेस येथून नेहमीच्या प्रशिक्षण मोहिमेसाठी उड्डाण करत असताना, काही तांत्रिक बिघाडामुळे थोड्याच वेळात कोसळले. हे विमान चीनच्या चेंगदू J-7/F-7 मालिकेतील अंतिम आणि सर्वात प्रगत प्रकारातील विमान असून, बांगलादेशने 2011 मध्ये अशी 16 विमाने खरेदी केली होती, ज्यांचे वितरण 2013 मध्ये पूर्ण झाले.

मृतदेह बाहेर काढण्याचे काम

अपघाताच्या ठिकाणी तैनात असलेले रेस्क्यू कार्यकर्ते, आगीत जळून खाक झालेल्या इमारतीमधून मृतदेह आणि मलबा बाहेर काढण्याचे काम सातत्याने करत होते, ज्यावेळी मरण पावलेल्यांपैकी अनेकांचे कुटुंबीय घटनास्थळी हंबरडा फोडत होते.

आरोग्य सल्लागार प्रमुखांचे विशेष सहाय्यक- सय्यदूर रहमान यांनी सांगितले की, “मृतांमध्ये 25 विद्यार्थी, एक शिक्षक आणि विमानाचा वैमानिक यांचा समावेश आहे. तर, आगीत होरपळलेल्या 88 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.”

याप्रकरणी Bangladesh सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला असून, सर्व शासकीय इमारतींवरील ध्वज अर्ध्यापर्यंत उतरवण्यात येणार आहे, तसेच सर्व धर्मिक स्थळांवर विशेष प्रार्थना आयोजित करण्यात येणार आहेत.

दुर्घटनेचे हृदयद्रावक दृश्य

रॉयटर्स टीव्हीच्या दृश्यमाध्यमांनुसार, विमान इमारतीच्या एका बाजूस आदळले, त्यामुळे तेथील लोखंडी ग्रिल तुटले आणि भिंतीला मोठे भगदाड पडले. घटनास्थळी पोहचलेल्या फायर फायटर्सनी तात्काळ विमानाच्या उरलेल्या अवशेषांवर पाणी मारत आग आटोक्यात आणली.

घटनास्थळी लोकांच्या किंकाळ्यांचे आणि रडण्याचे आवाज ऐकू येत होते, तर इतरजण त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते.

“मी मुलांना घ्यायला शाळेच्या गेटजवळ गेलो होतो. तेव्हा अचानक मागून काहीतरी येऊन इमारतीवर आदळले आणि एक खूप मोठा स्फोट झाला. मागे वळून पाहिले, तेव्हा फक्त धूर आणि आगीचे लोट दिसले,” असे स्थानिक शिक्षक मसूद तारिक यांनी सांगितले.

युनूस यांनी दिली चौकशीची ग्वाही

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी पत्रकारांना सांगितले की, “या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल.”

“हवाई दल, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि इतरही लोकांना या दुर्घटनेत जे काही सोसले आहे, ते फार भीषण आहे, हे कधीही न भरुन निघणारे नुकसान “ असेही त्यांनी नमूद केले.

ही दुर्घटना अशावेळी घडली आहे, जेव्हा शेजारी देश भारतही दशकातील सर्वात मोठ्या विमान दुर्घटनेशी झुंज देतो आहे. मागील महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या आठवणी आजही ताज्या आहेत. एअर इंडियांचे विमान- बोईंग 787 उड्डाण घेतल्यावर काही क्षणातच नजीकच्या महाविद्यालयीन वसतिगृहावर कोसळले, ज्यामध्ये विमानातील 241 प्रवाशांचा आणि जमिनीवरील 19 जणांचा दुर्देवी अंत झाला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleExplainer | End of an Era: India Retires MiG-21, the ‘Workhorse’ That Defined IAF for 60 Years
Next articleलष्कराचे पहिले Apache Helicopter हिंडनमध्ये दाखल, लष्कराची मोठी भरारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here