निर्णयक्षमता आणि राष्ट्रीय इच्छाशक्ती हेच भारताच्या भविष्याचा गाभा: डोवाल

0
डोवाल
'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026' या कार्यक्रमात संबोधित करताना, एनएसए अजित डोवाल

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026’च्या उद्घाटन समारंभात, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले की, “भारताचा विकसीत राष्ट्र बनण्यापर्यंतचा प्रवास निश्चित आहे, परंतु या वाटचालीला मार्गदर्शन करणाऱ्या नेतृत्वाची गुणवत्ता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.”

उपस्थित तरूण वर्गाला उद्देशून डोवाल म्हणाले की, “काळ बदलला असला तरी एक वैशिष्ट्य पिढ्यानपिढ्या कायम राहिले आहे, आणि ते म्हणजे तुमची ‘निर्णय क्षमता’.”

“मी जेव्हा तरुण होतो तेव्हाही आणि आताही, मला हे जाणवते की, तुमची निर्णय घेण्याची क्षमता, ही नेहमीच तुमच्यासोबत असते” असे ते म्हणाले.

त्यांनी नमूद केले की, भारत गेल्या काही वर्षांत आखून दिलेल्या विकासपथावर वेगाने पुढे जात आहे. मात्र, सक्षम नेतृत्व असणे तितकेच आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताचा विकास निश्चीत आहे, जरी तो ऑटोपायलट मोडवर चालला तरीही.. मात्र, प्रश्न हा आहे की “या विकसित भारताचे नेतृत्व कोण करणार?”

डोवाल यांच्या मते, नेतृत्व म्हणजे केवळ पद किंवा सत्ता नाही, तर योग्यवेळी योग्य निर्णय घेणे आणि आत्मविश्वासाने त्यांची अंमलबजावणी करणे हे खरे नेतृत्व आहे.

“योग्य निर्णय घेणे आणि त्यानंतर विश्वास आणि दृढनिश्चयाने त्यांची अंमलबजावणी करणे, ही नेतृत्वाची सर्वात मोठी ताकद असते,” असे त्यांनी पुढे जोडले.

राष्ट्रीय इच्छाशक्तीच राष्ट्राचे सामर्थ्य निश्चित करते

राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष वेधताना डोवाल यांनी अधोरेखित केले की, युद्धे ही विनाशासाठी लढली जात नाहीत, तर आपली इच्छाशक्ती बिंबवण्यासाठी आणि शत्रूचे मनोधैर्य तोडण्यासाठी लढली जातात.

“हिंसा आवडते म्हणून युद्धे लढली जात नाहीत. ती शत्रू देशाचे मनोबल तोडण्यासाठी लढली जातात, जेणेकरून त्यांनी आपल्या अटी मान्य करून शरणागती पत्करावी,” असे ते म्हणाले.

‘राष्ट्रीय इच्छाशक्ती नसेल, तर शस्त्रास्त्र आणि संसाधनांना फारसे महत्व उरत नाही,’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

“तुमच्याकडे सर्व काही असेल पण मनोधैर्य नसेल, तर तुमची सर्व शक्ती व्यर्थ ठरते,” असे सांगत डोवाल यांनी खंबीर नेतृत्वाच्या गरजेवर भर दिला.

गेल्या दशकात, देशाला जलद प्रगतीकडे नेल्याबद्दल त्यांनी सध्याच्या नेतृत्वाचे कौतुक केले, तसेच देशाप्रती त्यांची वचनबद्धता आणि समर्पण प्रेरणादायी असल्याचे म्हटले.

इतिहास एक चेतावणी आहे, ओझे नाही

भारताच्या इतिहासाची आठवण करून देताना डोवाल यांनी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलेले बलिदान आणि शतकानुशतके परकीय वर्चस्वाखाली सोसलेल्या अपमानाबद्दल भाष्य केले.

“आमची गावे जाळली गेली, आमच्या संस्कृतीचे नुकसान झाले आणि आमची मंदिरे उद्ध्वस्त झाली. अनेकांना फासावर जावे लागले,” असे ते म्हणाले.

त्यांनी भारतीय तरुणांना इतिहासातील धड्यांमधून बोध घेण्याचे आणि राष्ट्रीय शक्तीची पुनर्बांधणी करण्याचे आवाहन केले.

“‘बदला किंवा प्रतिशोध’ हा शब्द कदाचित योग्य वाटणार नाही, पण ती एक शक्तिशाली प्रेरणा आहे,” असे डोवाल यांनी नमूद केले. ते म्हणाले की, याचा अर्थ भारताचे जगातील हक्काचे स्थान पुन्हा मिळवणे असा आहे.

त्यांनी आधीच्या पिढीच्या गंभीर चुकांकडेही लक्ष वेधले. “आपण एक अत्यंत विकसित संस्कृती होतो, परंतु आपण आपल्या सुरक्षेला असलेले धोके समजून घेण्यात अपयशी ठरलो,” असे ते म्हणाले.

‘इतिहासातील या धड्यांकडे दुर्लक्ष केल्यास, भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील,’ असे ते म्हणाले.

“जर भावी पिढ्यांनी यातून वेळीच बोध घेतला नाही, तर ते देशाचे सर्वात मोठे दुर्दैव असेल,” असा इशारा त्यांनी दिला.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleइराणमध्ये इंटरनेट सुरू करण्याबाबत ट्रम्प-मस्क यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
Next articleभारताला आकर्षित करण्यासाठी युरोपचा पुढाकार, भारत आपल्या अटींवर ठाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here