सियाचीन ग्लेशिअरमधील सुरक्षा परिस्थितीचा संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा

0
Defence Minister

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  सोमवारी 22 एप्रिल 2024 रोजी जगातील सर्वात उंचीवर असलेली युद्धभूमी सियाचेनला भेट  दिली आणि तेथील सुरक्षा स्थितीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करून आढावा  घेतला. अतिशय प्रतिकूल  हवामान आणि कठीण प्रदेशात तैनात असलेल्या जवानांशी त्यांनी संवाद साधला. या भागाची हवाई पाहणी केल्यानंतर संरक्षणमंत्री 15,100 फूट उंचीवर आघाडीच्या पोस्टवर उतरले. संरक्षणमंत्र्यांच्यासमवेत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे; जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, नॉर्दन कमांड लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार आणि जनरल ऑफिसर कमांडिंग, 14 कॉर्प्स लेफ्टनंट जनरल रशीम बाली देखील होते.

आघाडीच्या पोस्टवर त्यांना सियाचीन ग्लेशिअरवरील परिचालन सज्जता आणि सध्याच्या सुरक्षा स्थितीबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष स्थळी तैनात असलेल्या कमांडर्ससोबत परिचालन आव्हानांशी संबंधित पैलूंवर चर्चा केली.

अत्यंत कठीण परिस्थितीत दुर्दम्य साहस आणि दृढनिश्चयाच्या जोरावर आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी मार्गक्रमण करणाऱ्या जवानांचे त्यांनी कौतुक केले. सियाचीन ही काही साधीसुधी भूमी नसून भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे, अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी वर्णन केले. ज्याप्रमाणे दिल्ली ही भारताची राष्ट्रीय राजधानी आहे, मुंबई ही आर्थिक राजधानी आणि आणि बंगळुरू ही तंत्रज्ञानाची राजधानी आहे, त्याचप्रमाणे सियाचेन ही शौर्य, जिद्द आणि दृढनिश्चयाची राजधानी आहे, असे ते म्हणाले.

अलीकडेच ऑपरेशन मेघदूतच्या यशाचा 40 वा वर्धापन दिन देशात नुकताच साजरा करण्यात आला. भारतीय सैन्याने 13 एप्रिल 1984 रोजी पार पाडलेले हे ऑपरेशन लष्कराच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे, असे ते म्हणाले. ऑपरेशन मेघदूतचे यश हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून संरक्षण मंत्र्यांनी सियाचीन युद्ध स्मारक येथे जाऊन  पुष्पचक्र अर्पण केले.

राजनाथ सिंह यांनी 24 मार्च 2024 रोजी लेह येथे भेट दिली होती आणि तेथील जवानांबरोबर होळी साजरी केली होती. त्याचवेळी ते सियाचीनलाही भेट देणार होते. मात्र खराब हवामानामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. लेह येथून संरक्षणमंत्र्यांनी दूरध्वनीवरून सियाचीनमधील जवानांशी संवाद साधून आपण जगातील सर्वात उंचीवर असलेल्या युद्धभूमीला लवकर भेट देणार असल्याचे तसेच त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार असल्याचे सांगितले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सियाचीनला भेट दिली.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleDefence Minister Reviews Security Situation At Siachen Glacier
Next articleजागतिक स्तरावर 2023 मध्ये लष्करी खर्चात 7 टक्क्यांची वाढ – सिप्रीचा अहवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here