दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या भारताच्या संरक्षण प्रदर्शनाला मंगळवारी (18 ऑक्टोबर) गांधीनगरमध्ये सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे यंदा 12वे वर्ष आहे. डेफएक्स्पो 2022ची सुरुवात भारतीय हवाई दलाच्या सारंग टीमने समुद्रात उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या हवाई प्रात्यक्षिकांच्या आकर्षक प्रदर्शनाने झाली. भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाच्या कमांडोनीही आपले कौशल्य दाखवले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन म्हणून वर्णन केलेल्या डेफएक्स्पो 2022चे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
संरक्षण मंत्रालयाने (MoD) दिलेल्या माहितीनुसार, विविध देशांच्या 33 संरक्षणमंत्र्यांसह 75 देशांतील सहभागी प्रतिनिधी या प्रदर्शनासाठी उपस्थित आहेत. याशिवाय, 1340 कंपन्या, 10 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रदर्शनाच्या ठिकाणी त्यांचे स्टॉल उभारले आहेत.
संरक्षणमंत्री म्हणाले, “आम्ही जागतिक स्तरावर डिझाइन, विकास आणि उत्पादन क्षेत्रात अग्रेसर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. सर्वात मोठा संरक्षण आयातदार ते निव्वळ निर्यातदार असा परिवर्तनाचा प्रवास आम्ही पाहत आहोत. डेफएक्स्पोमुळे या प्रवासाचा वेग आणखी वाढायला मदत होईल.”
एक लाख चौरस मीटरमध्ये पसरलेले आणि 1,340 कंपन्यांच्या विक्रमी नोंदणीमुळे, डेफएक्स्पो 2022 हे आजपर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन ठरले आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या डेफएक्स्पोसाठी निर्यात हे प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या प्रदर्शनाबरोबरच भारत-आफ्रिका संरक्षण संवाद (IADD) आणि इंडियन ओशन रीजन प्लस (IOR+) या दोन स्वतंत्र कॉन्क्लेव्हचेही आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘भारत-आफ्रिका संरक्षण संवाद’साठी 53हून अधिक आफ्रिकन देशांना आणि इंडियन ओशन रीजन प्लस कॉन्क्लेव्हसाठी 44हून अधिक आफ्रिकन देशांना आमंत्रित करण्यात आले होते.
संपूर्ण प्रदेशात शांतता, सुरक्षा, समृद्धी आणि संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या क्षेत्रात नवीन संरक्षण आणि औद्योगिक संबंध व क्षमता स्थापित करण्याच्या दृष्टीने भारत-आफ्रिका संरक्षण संवाद आणि इंडियन ओशन रीजन प्लस हे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतील.
निर्यातीला चालना
या आर्थिक वर्षात भारताकडून आपली सर्वोच्च संरक्षण निर्यात झाली आहे आणि पहिल्या सहा महिन्यांत 8,000 कोटी रुपयांची विक्री झाली आहे, कारण सरकार गंभीरपणे या क्षेत्रातील आयात अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
“आम्ही या वर्षी 8,000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात करण्यात यशस्वी झालो आहोत आणि लवकरच गेल्या वर्षीच्या निर्यातीला मागे टाकू,” असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी डेफएक्स्पो 2022निमित्ताने व्यक्त केला.
सन 2021-2022 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात 13,000 कोटी रुपयांवर पोहोचली होती, जी 2014 साली झालेल्या निर्यातीहून जास्त होती. 2020मध्ये, सरकारने एरोस्पेस, संरक्षण वस्तू आणि सेवा या क्षेत्रांसाठी पुढील पाच वर्षांसाठी 35,000 कोटी रुपये ($5 अब्ज) निर्यातीचे लक्ष्य ठेवले. 2025पर्यंत संरक्षण उत्पादनात 1.75 लाख कोटी रुपयांच्या ($ 25 अब्ज) उलाढालीचा हा एक भाग आहे, जे साध्य करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
“संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा आयातदार ते आता निर्यातदार होण्यापर्यंतचा हा एक परिवर्तनकारी प्रवास आहे. भारत आता जगातील पहिल्या 25 संरक्षण निर्यातदारांपैकी एक आहे,” असे सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, डेफएक्स्पो 2022मध्ये सामंजस्य करार, तंत्रज्ञान करारांचे हस्तांतरण आणि उत्पादन लॉन्चच्या संदर्भात 450 हून अधिक भागीदाऱ्या अपेक्षित आहेत, ज्या याआधीच्या प्रदर्शनापेक्षा जवळपास दुप्पट असतील.
(अनुवाद : आराधना जोशी)