टोरंटो विमानतळावर डेल्टा विमान उलटून 18 प्रवासी जखमी

0
विमान

 

बर्फाच्या वादळानंतर वादळी वाऱ्यांचा सामना करणारे डेल्टा एअर लाइन्सचे आंतर्देशीय विमान सोमवारी टोरंटो पियरसन विमानतळावर उतरताना उलटले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत विमानातील 80 प्रवाशांपैकी 18 जण जखमी झाले.

मिनियापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेल्या विमानातील तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यात एका मुलाचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमेरिकन  कंपनी डेल्टाने सांगितले की त्याच्या एन्डेव्हर एअर उपकंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या सीआरजे900 विमानात 76 प्रवासी आणि चार क्रू सदस्य प्रवास करत होते. कॅनडाच्या बॉम्बार्डियरने बनवलेल्या आणि जीई एरोस्पेस इंजिनद्वारे चालवल्या जाणाऱ्या या 16 वर्ष जुन्या सीआरजे900 मध्ये 90जण प्रवास करू शकतात.

अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून त्यासंदर्भातील तपास सुरू असल्याचे कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विमान उलटले आणि आग लागली

प्रवासी जॉन नेल्सन यांनी फेसबुकवर या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये बर्फाच्छादित टरमॅकवर उलटलेल्या  विमानावर अग्निशमन इंजिन पाण्याची फवारणी करताना दिसत आहे.

त्यांनी नंतर सीएनएनला सांगितले की लँडिंगपूर्वी काही विचित्र घडत असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.

नेल्सन यांनी दूरचित्रवाणी वाहिनीला सांगितले की, “आम्ही जमिनीवर आदळलो आणि नंतर बाजूला आपटलो. त्यानंतर खाली डोकं, वर पाय अशा स्थितीत होतो.

“मी पोटाला बांधलेला पट्टा सोडवू शकलो. त्यामुळे थोडासा खाली आलो आणि स्वतःला जमिनीवर ढकलू शकलो. नंतर बघितले तर काही लोक उलट्या अवस्थेत लटकत होते आणि त्यांना खाली उतरण्यासाठी कोणाच्यातरी मदतीची गरज होती, तर इतर काही स्वतःच खाली उतरण्यास सक्षम होते,” असे ते म्हणाले.

आठवड्याच्या शेवटी आलेल्या हिमवादळामुळे विमानतळावर 22 सें. मी. (8.6 इंच) पेक्षा जास्त बर्फ पडल्यानंतर विमान कंपन्यांनी रद्द कराव्या लागलेल्या उड्डाणांच्या वेळा जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते जोरदार वारे आणि थंड तापमानातही उड्डाणे करत असल्याचे पियरसन विमानतळाकडून सोमवारी सांगण्यात आले.

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटरॅडर 24 नुसार, डेल्टा विमान 86 मिनिटांच्या उड्डाण प्रवासानंतर दुपारी 2.13 वाजता (1913 जीएमटी) टोरंटोमध्ये उतरले. नंतर ते धावपट्टी 23 आणि धावपट्टी 15 च्या छेदनबिंदूजवळ थांबले.

liveatc.net वर पोस्ट केलेल्या घटनेच्या रेकॉर्डिंगनुसार, काही प्रवासी उलटलेल्या विमानाजवळून चालत असल्याचे एका नियंत्रकाने नोंदवल्यानंतर, आपत्कालीन कर्मचाऱ्याने हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरला सांगितले की, “विमान उलटले असून त्याला आग लागली आहे.”

अपघात ठरला वेगळा 

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही याचे श्रेय टोरंटो विमानतळाच्या अध्यक्षा डेबोरा फ्लिंट यांनी काही प्रमाणात विमानतळावरील प्रथम प्रतिसादकर्त्यांच्या कामाला दिले.

“कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि तुलनेने किरकोळ दुखापती पलिकडे कोणत्याही गंभीर जखमा झाल्या नाहीत याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत, असे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीमधील हवाई वाहतूक व्यवस्थापनाचे सहयोगी प्राध्यापक मायकेल जे. मॅककॉर्मिक म्हणाले की, विमान पूर्णपणे उलटल्याच्या स्थितीमुळे हा अपघात बऱ्यापैकी वेगळा ठरला.

“परंतु अशा प्रकारच्या घटनेतून 80 लोक बचावले ही वस्तुस्थिती आधुनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची साक्ष आहे. सध्या अशी प्रणाली तयार केली जात आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव खरोखरच वाचू शकतो.”

विमानतळ काही काळासाठी बंद

जखमी झालेल्या सर्व 18जणं हे प्रवासी होते आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे डेल्टाने एका निवेदनात म्हटले आहे.

जखमींपैकी दोघांना ट्रॉमा सेंटरमध्ये तर एका मुलाला लहान मुलांच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचे पील रिजनल पॅरामेडिक सर्व्हिसेसचे पर्यवेक्षक लॉरेन्स सैंडन यांनी सांगितले.

निर्गमन आणि आगमन पुन्हा सुरू होण्यापूर्वी टोरंटो विमानतळ दोन तासांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्यात आला होता. यामुळे इतर विमानांना विलंब झाला आणि मॉन्ट्रियल-ट्रुडो आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर विमानतळांकडे ही विमाने वळवण्यात आली.  मात्र या विमानतळाचे काम पूर्ववत व्हायला आणखी विलंब होऊ शकतो.

फ्लिंट यांनघ सोमवारी संध्याकाळी सांगितले की पुढील काही दिवसात टोरंटो विमानतळावर काही ऑपरेशनल कामकाजामुळे  आणखी विलंब होईल. याशिवाय तपासासाठी दोन धावपट्ट्या बंद राहतील.

कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने (टीएसबी) सांगितले की ते तपासकर्त्यांचे एक पथक तैनात करत असून अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने सांगितले की तपासकर्त्यांचे एक पथक कॅनडाच्या टीएसबीला मदत करेल.

2020 मध्ये बॉम्बार्डियरकडून सीआरजे विमान कार्यक्रम खरेदी करण्याचा करार बंद करणाऱ्या जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजने सांगितले की त्यांना या घटनेची माहिती मिळाली असून ते तपासात पूर्ण सहकार्य करतील.

उत्तर अमेरिकेत अलीकडे झालेल्या इतर अपघातांनंतर कॅनडातील अपघात झाला. वॉशिंग्टनमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरची सीआरजे-700 प्रवासी विमानाला धडक बसून 67 जणांचा मृत्यू झाला, तर फिलाडेल्फियामध्ये वैद्यकीय वाहतूक विमान कोसळून किमान सात जणांचा मृत्यू झाला. याशिवाय अलास्कामध्ये प्रवासी विमान अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)

 


Spread the love
Previous articleIsrael: बंधक जिवंत असल्याचे समजताच, कुटुंबियांनी घेतला मोकळा श्वास
Next articleUK Offers To Send Peacekeeping Troops To Ukraine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here