गाझामधील युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात येईल अशा कलमाचा समावेश नसलेल्या युद्धविराम करारावर कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी गट (हमास) सहमत होणार नाही असे शनिवारी हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याच वेळी, त्याने इस्रायलकडून युद्ध सुरू ठेवण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला.
नाव न छापण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने सांगितले की, गाझामधील युद्धकरारासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत तयार होणार नाही. युद्ध पूर्णपणे थांबवल्याशिवाय आणि गाझामधून इस्रायली सैन्य माघारी फिरल्याशिवाय कोणताही करार होणार नाही.”
जवळजवळ सात महिन्यांच्या युद्धातील प्रस्तावित विरामावर चर्चा करण्यासाठी हमासचे वाटाघाटी करणारे प्रतिनिधी शनिवारी इजिप्तला परतल्यानंतर ही प्रतिक्रिया देण्यात आली.
शनिवारी इस्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, युद्ध संपवण्याच्या मागणीवर हमास ठाम असल्याने या करारात अडथळा येत आहे. इस्रायली अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ओलिसांच्या सुटकेबद्दल हमासकडून सकारात्मक प्रयत्न होताना दिसले तरच इस्रायल आपले शिष्टमंडळ कैरोला पाठवेल. मात्र हमासकडून असे कोणतेही प्रयत्न अद्याप दिसलेले नाही.”
या ठरावात गाझामध्ये संपूर्ण युद्धबंदीची स्पष्ट तरतूद असावी यावर हमास ठाम आहे. मात्र, इस्रायल अजूनही यासाठी तयार नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दक्षिणेकडील गाझा शहरातील रफाह येथे सैन्य पाठवण्याचा आग्रह धरणे हा या ठरावातील मुख्य अडथळा असल्याचेही त्यात म्हटले आहे. खरेतर, या परिसरात विस्थापितांनी मोठ्या प्रमाणात आश्रय घेतला आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिने मध्यस्थांच्या मार्फत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनींच्या बदल्यात 105 ओलिसांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आठवडाभर युद्धविराम झाला होता. आता कोणत्याही देशाला नव्या युद्धविरामाबाबत दोन्ही गटांना राजी करणे शक्य झालेले नाही.
अमेरिकेने वारंवार हे स्पष्ट केले आहे की रफाहमध्ये आश्रय घेतलेल्या 12 लाख नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्याचा विरोध आहे.
“आम्हीही युद्धबंदीच्या करारासाठी उत्सुक आहोत, पण त्यासाठी कोणत्याही प्रकारची किंमत आम्हाला मोजायला लावू नका”, असे हमासच्या अधिकाऱ्याने सांगितले. “जर कोणत्याही प्रकारचा करार झाला नाही आणि इस्रायललाने आक्रमण थांबवण्याऐवजी जबरदस्तीने रफाहमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह धरला तर त्यानंतर होणाऱ्या विनाशासाठी फक्त तेच जबाबदार असतील”. नेतान्याहू “वैयक्तिक हितसंबंधांमुळे” गाझा युद्धविराम करारात “वैयक्तिकरित्या अडथळा आणत असल्याचा, आरोप सूत्रांनी केला आहे.
ब्रिटनने जारी केलेल्या वृत्तानुसार, 40 दिवसांच्या युद्धविरामाच्या ठरावाला हमासकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे अमेरिका, इजिप्त आणि कतार या़ंचे लक्ष लागलेले आहे. युद्धविरामाबरोबरच इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात ओलिसांची सुटका करणे याचाही समावेश आहे.
आराधना जोशी