
बांगलादेशातील धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांना भेडसावणारा व्यापक भेदभाव आणि हिंसाचार याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनने (व्हीआयएफ) “The Never-Ending Persecution of Minorities in Bangladesh,” या शीर्षकाखाली एक प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केले होते.
नवी दिल्लीतील व्हीआयएफ सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात, सध्या सुरू असलेल्या मानवाधिकार संकटावर चर्चा करण्यासाठी प्रमुख मुत्सद्दी, पत्रकार आणि विद्वान एकत्र आले. या समितीत माजी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि व्हीआयएफचे उपाध्यक्ष आणि राजदूत सतीश चंद्र, बांगलादेशच्या माजी उच्चायुक्त वीणा सिक्री, पत्रकार फ्रँकोइस गौटियर आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विश्वस्त डॉ. अनिर्बन गांगुली उपस्थित होते. या सत्राचे संचालन व्हीआयएफचे संचालक डॉ. अरविंद गुप्ता यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यानचा एक महत्त्वाचा क्षण म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची उपस्थिती. डोवाल यांनी प्रदर्शनाला भेट दिली तसेच चर्चेत भागही घेतला. त्यांच्या उपस्थितीने बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीबाबत भारताची चिंता अधोरेखित केली. हा मुद्दा प्रदीर्घ काळापासून प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेत राहिला आहे.
फाऊंडेशन अगेन्स्ट कंटीन्यूइंग टेररिझमने (एफएसीटी) आयोजित केलेल्या या प्रदर्शनात बांगलादेशातील मानवाधिकारांचे उल्लंघन, जबरदस्तीने करविण्यात आलेले विस्थापन तसेच हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि अहमदिया मुस्लिम समुदायांवर लक्ष्यित हल्ल्यांचे ठोस पुरावे सादर करण्यात आले. त्यात छायाचित्रे, प्रकरणांचा अभ्यास आणि ऐतिहासिक दस्तऐवजीकरण यांचा समावेश होता. ज्याचा उद्देश जागरूकता वाढवणे आणि या विषयावर तातडीच्या संवादाला प्रोत्साहन देणे हा होता.
बांगलादेशातील अल्पसंख्याकांचा छळ हा एक कायमच चर्चेचा मुद्दा आहे, मानवाधिकार संघटनांच्या अहवालांमध्ये हिंसाचार, बेकायदेशीरपणे जमीन जप्ती आणि संस्थात्मक भेदभावाच्या घटना अधोरेखित केल्या आहेत.
विशेषतः पंतप्रधान शेख हसीना यांना 5 ऑगस्ट रोजी भारतात आश्रय घेण्यास भाग पाडल्यानंतर, अलीकडील अशांततेनंतर बांगलादेशची परिस्थिती आणखी चिघळली आहे. अतिरेकी आणि परदेशी घटकांच्या कथित पाठिंब्याने विद्यार्थी गटांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व्यापक हिंसाचारानंतर हसीना यांना देश सोडून जावा लागला.
हसीना देशाबाहेर पडल्यापासून, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारला, निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल आणि अतिरेकी गटांना शिक्षेशिवाय काम करण्याची परवानगी दिल्याबद्दल बऱ्याच मोठ्या टीकेचा सामना करावा लागला आहे. यामुळे देशभरातील अल्पसंख्याक समुदायांना भेडसावणारी असुरक्षितता आणखी वाढली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन करून, भारतातील आघाडीच्या विचारवंतांपैकी एक असलेल्या व्हीआयएफने मानवाधिकारांचे समर्थन करण्यासाठी, प्रादेशिक सुरक्षा आणि दक्षिण आशियातील असुरक्षित समुदायांच्या संरक्षणावर माहितीपूर्ण चर्चेला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
रामानंद सेनगुप्ता