DRDO ने पूर्ण केल्या आकाश-एनजी क्षेपणास्त्र वापरकर्ता चाचण्या

0

DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने मंगळवारी पुढील पिढीच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या (आकाश-एनजी) वापरकर्ता मूल्यांकन चाचण्या पूर्ण केल्या. या महत्त्वाच्या टप्प्यामुळे ही प्रगत हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सशस्त्र दलांमध्ये लवकरच सहभागी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

DRDO च्या मते, चाचण्यांदरम्यान आकाश-एनजी प्रणालीने वेगवान लक्ष्ये, सीमेजवळ कमी उंचीवरील धोके आणि लांब पल्ल्याची, जास्त उंचीवरील लक्ष्ये यांसारख्या विविध हवाई धोक्यांविरुद्ध उच्च अचूकता आणि परिणामकारकता प्रदर्शित केली. “आकाश-एनजी क्षेपणास्त्राच्या वापरकर्ता मूल्यांकन चाचण्या आज यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून, सर्व Preliminary Staff Qualitative Requirements (PSQR) पूर्ण केल्या आहेत,” असे DRDO ने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. या चाचण्यांमध्ये विविध श्रेणी आणि उंचीवरील हवाई लक्ष्यांचा यशस्वीपणे वेध घेण्यात आला, ज्यामुळे वेगवेगळ्या युद्ध परिस्थितींमध्ये क्षेपणास्त्राची कार्यक्षमता तपासून बघता आली, असे संस्थेने सांगितले.

आकाश-एनजी हे स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) सीकरने सुसज्ज असून ते सॉलिड रॉकेट मोटरद्वारे चालवले जाते, ज्यामुळे त्याची अचूकता, प्रतिसाद वेळ आणि लक्ष्य भेदण्याची क्षमता वाढते. ही प्रणाली लढाऊ विमाने, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसह विविध प्रकारच्या हवाई धोक्यांविरुद्ध मजबूत हवाई संरक्षण प्रदान करण्यासाठी डिझाइन केली आहे.

संरक्षण मंत्रालयानेही चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची पुष्टी केली असून, या कामगिरीमुळे “आकाश-एनजी प्रणालीचा भारतीय सशस्त्र दलांमध्ये समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला,” असे म्हटले आहे.

“स्वदेशी आरएफ सीकर, ड्युअल-पल्स सॉलिड रॉकेट मोटर तसेच पूर्णपणे देशात विकसित केलेले रडार आणि कमांड-अँड-कंट्रोल प्रणालीने सुसज्ज असलेली आकाश-एनजी प्रणाली भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेला मोठे बळ देते,” असे मंत्रालयाने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आकाश-एनजीच्या वापरकर्ता मूल्यांकन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल DRDO, भारतीय हवाई दल आणि उद्योगाचे कौतुक करत सांगितले की, ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय हवाई दलाच्या हवाई संरक्षण क्षमतांना आणखी मजबूत करेल.
आकाश-एनजी कार्यक्रम हा ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेसाठी भारताच्या सुरू असणाऱ्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये स्वदेशी सेन्सर्स, प्रणोदन (propulsion) आणि नियंत्रण प्रणालींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleHow India Quietly Offset China’s ‘String of Pearls’ With a Network of Overseas Military Access
Next articleचीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ धोरणाला भारताचे शांतपणे प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here