संशोधन संस्था, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राला एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न
दि. २९ मे: संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी संरक्षण सामग्रीच्या देशांतर्गत संशोधन व विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी-कानपूर) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सहकार्याने विशेष गुणवत्ता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्राच्या माध्यमातून संशोधन संस्था, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राला एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयआयटी कानपूरकडून ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या ‘मायक्रोब्लॉगिंग’ संकेतस्थळावर दिली आहे.
#IITKanpur, in collaboration with #DRDO, inaugurated the DRDO-Industry-Academia Centre of Excellence (DIA CoE) on its campus for interdisciplinary research in next-generation defense technologies.#defensetechnology #iitk #collaboration pic.twitter.com/kDBYNt08pg
— IIT Kanpur (@IITKanpur) May 28, 2024
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने देशातील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांना एकत्र आणून संशोधन संस्था, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राला एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने गुणवत्ता केंद्राची (डीआयए-सीओई) स्थापना केली होती. त्याच धर्तीवर आयआयटी-कानपूरच्या ‘कॅम्पस’मध्ये या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून ‘डीआरडीओ’च्या देशभरातील प्रयोगशालांमधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक परिसरात तज्ज्ञ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने संरक्षण विषयक संशोधनाबाबत परिसंस्था उभी करण्याचा ‘डीआरडीओ’चा प्रयत्न आहे. अधिकृत माहितीनुसार या केंद्रात विशिष्ट प्रकारच्या सामरिक उपयोगाच्या संशोधनावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर नॅनो मटेरियल डेव्हलपमेंट, उच्च उर्जा स्फोटके, जैव अभियांत्रिकी आदी विषयातील संशोधन या केंद्रात प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहे. विविध प्रकारची शस्त्रे आणि स्फोटांच्या उत्पादनासाठी हे संशोधन कामी येणार आहे. त्याचबरोबर युद्धक्षेत्रात होणाऱ्या जखमांवर प्रभावी उपचार करण्यासाठीही या केंद्राच्या माध्यमातून संशोधन होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. मसुरी येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटचे माजी संचालक संजय टंडन आयआयटी-कानपूरमधील या गुणवत्ता केंद्राचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत. या केंद्रासाठी आवश्यक सामरिक बाबी आणि परस्पर सहकार्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार टंडन यांना देण्यात आले आहेत. तर, या गुणवत्ता केंद्राला आर्थिक सहाय्य, महत्त्वाच्या तांत्रिक सुविधा आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा ‘डीआरडीओ’च्या माध्यमातून पुरविल्या जाणार आहेत. आयआयटी कानपूरमध्ये या प्रकारचे गुणवत्ता केंद्र उभारण्याबाबत २०२२ मध्ये गांधीनगरमधील ‘डिफेन्स एक्स्पो’मध्ये आयआयटी कानपूर आणि ‘डीआरडीओ’दरम्यान परस्पर सहयोगाचा करार झाला होता. त्याची परिणीती या केंद्राच्या स्थापनेत होणार आहे.
आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. महेंद्र अग्रवाल यांनी अशा प्रकारच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक केले. ‘बदलत्या परिस्थितीत संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती अत्यावश्यक गरज बनली आहे. आपल्याला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर असे प्रयोग सातत्याने होण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधन संस्था, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राला एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न म्हणजे त्यादृष्टीने उचललेले योग्य पाऊल आहे,’ असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
विनय चाटी