संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (डीआरडीओ) ओदिशापासून जवळ समुद्रात असलेल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून ‘फेज 2 बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स (बीएमडी) इंटरसेप्टर’ (एडी – 1) क्षेपणास्त्राची पहिली प्रत्यक्ष चाचणी बुधवारी घेण्यात आली. फेज-II बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स (BMD) इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी विविध भौगोलिक स्थानांवरील सर्व बीएमडी शस्त्र प्रणाली घटकांच्या सहभागाने घेण्यात आली, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
एडी – 1 हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून, लो एक्झोअॅटमॉस्फिअरिक (वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या भागात) आणि एण्डो – अॅटमॉस्फिअरिक (पृथ्वीपासून 100 किलोमीटर अंतरावर) असलेले लक्ष्य टिपण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. क्षेपणास्त्र किंवा विमान अशा दोन्ही लक्ष्यांचा हवेत वेध घेण्याची त्याची क्षमता असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. एक्झोअॅटमॉस्फिअरिक टप्पा समुद्र सपाटीपासून 130 किलोमीटर आहे. ही लांब पल्ल्याची आण्विक क्षेपणास्त्रे हवेत 200 किमीपेक्षा जास्त उंचीवर जाऊन लक्ष्याचा भेद करू शकतात. हे दोन टप्प्यात सॉलिड मोटरद्वारे चालविले जाते आणि वाहनाला लक्ष्यापर्यंत अचूकपणे मार्गदर्शन करण्यासाठी स्वदेशात विकसित झालेल्या प्रगत नियंत्रण प्रणाली, नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन अल्गोरिदमसह सुसज्ज आहे.
यावेळी सर्व यंत्रणांनी अपेक्षेप्रमाणे कार्य केले. या प्रक्षेपणाबाबत विविध संवेदकांच्या जसे की रडार, उड्डाण डेटा कॅप्चर करण्यासाठी टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग स्टेशन अशा माध्यमातून जमवण्यात आलेल्या माहितीची योग्य पडताळणी करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.
बीएमडीचा वापर शत्रूच्या आण्विक क्षेपणास्त्रांना मध्य-हवेत रोखण्यासाठी केला जातो. एडी – 1ची रेंज अशी आहे की, ती भारतापासून दूर असलेल्या शत्रूच्या क्षेपणास्त्रालाही रोखू शकते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या क्षेपणास्त्राचे वर्णन “अद्वितीय प्रकारचे इंटरसेप्टर” म्हणून केले आहे, जे केवळ काही देशांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यामुळे देशाची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण आतील क्षमता आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डीआरडीओचे प्रमुख समीर व्ही. कामत म्हणाले की, या क्षेपणास्त्रामुळे त्याच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्यांचा वेध घेणे आता शक्य होणार आहे.
भारत आपला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित कार्यक्रम दोन टप्प्यांत राबवत आहे – पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, तर दुसरा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिक उंचीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)