रशियन लष्करातील आठ भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची पुष्टी

0
आठ
प्रातिनिधिक फोटो

रशियन सशस्त्र दलांनी भरती केलेल्या आठ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचे, सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात, परराष्ट्र व्यवहारराज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून असे सूचित होते की 12 भारतीय नागरिकांनी आधीच रशियन सशस्त्र दल सोडले आहे, तर 63 नागरिकांनी लवकर सुटका व्हावी अशी मागणी केली आहे.

सिंह यांनी नमूद केले की, “मृत्यू झालेल्यांपैकी आठ जणांचे नागरिकत्व भारतीय असल्याचे पडताळणी स्पष्ट झाले आहे.” संदिग्ध परिस्थितीत रशियन सशस्त्र दलात भरती झालेल्या काही भारतीय नागरिकांची लवकर सुटका व्हावी यासाठी भारत सरकारने मदत करावी अशी विनंती आमच्यापर्यंत पोहोचली आहे.” मात्र असे किती भारतीय नागरिक आहेत त्यांची नेमकी संख्या माहीत नसल्याचे ते म्हणाले.

“सध्या उपलब्ध माहितीवरून असे दिसून येते की 12 भारतीय नागरिकांनी आधीच रशियन सशस्त्र दल सोडले आहे, तर आणखी 63 नागरिकांनी लवकर सुटका व्हावी अशी मागणी केली आहे,” अशी माहिती सिंह यांनी दिली. चार नागरिकांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी सरकारने आर्थिक सहाय्य पुरवले असून आवश्यकता असेल तर  इतर प्रकरणांमध्ये सुद्धा अशी मदत सरकारकडून केली जाईल, असे राज्यमंत्री म्हणाले.

“याव्यतिरिक्त, रशियन फेडरेशन सरकारने दिलेल्या माहितीनुसार युद्धात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना त्यांनी केलेल्या करारानुसार नुकसान भरपाई दिली जाईल,” असेही सिंह म्हणाले.

सरकारने भारतीय नागरिकांना रशियन सशस्त्र दलातून लवकर सोडण्याचा तसेच त्यांची सुरक्षा आणि कल्याण यांचा मुद्दा विविध स्तरांवरील संबंधित रशियन अधिकाऱ्यांकडे जोरकसपणे उपस्थित केला आहे.

जुलैमध्ये रशियाच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन सशस्त्र दलातील सर्व भारतीय नागरिकांची त्वरित सुटका करण्याच्या गरजेचा जोरदार पुनरुच्चार केला,” असे ते म्हणाले.

जूनमध्ये, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) रशियन सेनेत कार्यरत असलेल्या भारतीय नागरिकांच्या सहभागाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती आणि याबाबत त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे रशियाला आवाहनही केले होते. मात्र 11 जून रोजी रशियन सैन्यात भरती करण्यात आलेल्या दोन भारतीय नागरिकांचा रशिया-युक्रेन संघर्षात मृत्यू झाल्याचे भारताने जाहीर केले होते.

या दोन भारतीयांच्या मृत्यूनंतर परराष्ट्र मंत्रालयाने रशियन सैन्यात होणारी भारतीय नागरिकांची पुढील भरती त्वरित थांबवण्याची मागणी केली होती. कठोर शब्दात दिलेल्या निवेदनात, भारताने रशियन सैन्याकडून नंतरच्या काळात होणारी भारतीय नागरिकांची कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया थांबवण्याची गरज आहे यावर भर दिला होता. याशिवाय हे उपक्रम दोन्ही देशांमधील भागीदारीशी सुसंगत नसतील असेही म्हटले होते.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleUS Recognizes Maduro’s Opponent As Winner In Venezuela Election
Next articleजागतिक घडामोडींना आकार देण्यात राष्ट्रवादाची भूमिका ओळखण्याची गरजः जयशंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here