रविवारपासून बाली बेट प्रांतात इंडोनेशियन नौदलाचा बहुपक्षीय सराव कोमोडो 2025 सुरू झाला आहे. या सरावात भारतासह 38 देशांचा सहभाग असून, सागरी आंतरसंचालनीयता आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्य वाढवणे हा या सरावाचा उद्देश आहे.
“शांतता आणि स्थिरतेसाठी सागरी भागीदारी” या संकल्पनेवर आधारित या द्विवार्षिक सरावाच्या पाचव्या आवृत्तीची सुरुवात फ्लीट रिव्ह्यूसह झाली, ज्यात सहभागी राष्ट्रांनी युद्धनौका, हेलिकॉप्टर्स आणि विमानांसह त्यांच्या नौदल क्षमतांचे प्रदर्शन केले.
भारताचे प्रतिनिधित्व करणारे आयएनएस शार्दुल आणि पी-8आय हे लांब पल्ल्याचे सागरी पाळत ठेवणारे विमान 15 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या कोमोडो सराव आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू (आयएफआर) 2025 या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी बाली येथे पोहोचले आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याद्वारे आयएफआरचा आढावा घेतला जाईल, ज्यात अनेक देशांच्या नौदलाच्या तुकड्या उपस्थित असतील.
भारतीय नौदलाचे कर्मचारी सुरक्षा चर्चा, सामरिक सराव आणि सागरी सहकार्य उपक्रमांमध्ये सहभागी होतील. इंडो-पॅसिफिकमधील सागरी सहकार्यावर भर देत, भारतीय नौदलाने सांगितले की त्याचा सहभाग भारताच्या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (सागर) या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
“जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशियातील एलए पेरूझ सरावात आयएनएस मुंबई आणि पी-8आय विमानांनी सहभाग घेतला होता. याशिवाय इंडोनेशियन नौदलाचे चीफ ऑफ स्टाफ ॲडमिरल मुहम्मद अली यांच्या भारत दौऱ्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिन परेड 2025 मधील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा ॲडमिरल मुहम्मद अली हे एक महत्त्वाचा भाग होते.
या वर्षीच्या कोमोडो सरावामध्ये सामरिक नौदल कवायती, अधिकाऱ्यांची देवाणघेवाण कार्यक्रम, द्विपक्षीय बैठका, आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा परिसंवाद, संरक्षण प्रदर्शन आणि सांस्कृतिक संचलन यांचा समावेश आहे.
2014 मध्ये पहिल्यांदा सुरू झालेला ‘ एक्सरराइज कोमोडो’ हा इंडोनेशियन नौदलाने मित्र राष्ट्रांमधील सागरी सहकार्य बळकट करण्यासाठी आयोजित केलेला बिगर लढाऊ लष्करी सराव आहे.
टीम भारतशक्ती