फुजियान चीनच्या तैवान धोरणाला कसा आकार देतो; वाचा तज्ज्ञांचे विश्लेषण

0
फुजियान

द्विपक्षीय आर्थिक सहकार्य आणि नागरी संपर्क मजबूत करण्यासाठी कल्पना सुचवण्यामध्ये, इतर देशांच्या सीमेवर असलेल्या चीनी प्रांतांची महत्वाची भूमिका आहे, हे बहुधा सर्वांना ठाऊक नसेल. तैवानपासून सुमारे 100 किमी सागरी अंतरावर असलेला फुजियान प्रांत, बीजिंगच्या क्रॉस-स्ट्रेट (दोन्ही किनाऱ्यांमधील) रणनीतीसाठी एक अग्रभागी प्रयोगशाळा म्हणून उदयास आला आहे. प्रत्यक्षात फुजियान हे तैवान धोरणासाठीचे एक चाचणी क्षेत्र आहे, असे म्हणता येईल.

चीनच्या तैवान धोरणातील प्रांतीय भूमिका

दोन वर्षांपूर्वी, बीजिंगने फुजियानला ‘क्रॉस-स्ट्रेट इंटिग्रेशन अँड डेव्हलपमेंट डेमॉन्स्ट्रेशन झोन’ म्हणून घोषित केले आणि तैवानसोबत आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, 21 विविध उपाययोजना जाहीर केल्या. त्यानंतर याच वर्षी, प्रांताने प्रत्येक काउंटी (जिल्हा) आणि विभागात तैवानची व्यवहार कार्यालये स्थापन केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील, सेंटर फॉर ईस्ट एशियन स्टडीजमधील पीएचडी स्कॉलर- स्वयंसिद्धा सामल, ज्या चीनच्या तैवान धोरणातील फुजियानच्या भूमिकेवर संशोधन करत आहेत, त्यांचा असा युक्तिवाद आहे की: “हा प्रांत निष्क्रीय अंमलबजावणी करणारा प्रांतही नाही, आणि एक स्वतंत्र धोरणकर्ता देखील नाही.” त्यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलशी बोलताना सांगितले की, “बीजिंग धोरणात्मक दिशा ठरवते, तर फुजियानसारख्या प्रांतांनी या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवर अनुरूप धोरणे आखणे अपेक्षित असते.”

त्याचवेळी, बीजिंग तीन प्रमुख मार्गांनी फुजियानच्या स्वायत्ततेवर कठोर मर्यादा घालते. स्थानिक उपक्रम कितीही नाविन्यपूर्ण असला तरी, मध्यवर्ती मंजुरीशिवाय त्याचे एका धोरणात रूपांतर होऊ शकत नाही. प्रांत हे एखादी कल्पना सुचवू शकतात, परंतु कोणत्या कल्पनांवर अंमलबजावणी करायची, हे अखेर केंद्रच ठरवते. परिणामी, फुजियानची भूमिका प्रायोगिक स्वरूपाची राहते आणि त्याच्या धोरणात्मक सीमा या केंद्रातूनच (बीजिंगकडून) निश्चित केल्या जातात.

स्वयंसिद्धा यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले की, “शी जिनपिंग यांनी वैयक्तिकरित्या फुजियानला, एकात्मिक विकासासाठी नवीन मार्ग शोधण्याचे आणि आर्थिक प्रोत्साहनांद्वारे तैवानच्या लोकांचे जीवनमान सुधारण्याचे आवाहन केले आहे, परंतु हे राजकीयदृष्ट्या परिभाषित मर्यादांमध्येच असणे अपेक्षित आहे. नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन दिले जाते, परंतु विचलनाला नाही.”

प्रांतीय प्रयोगांपासून ते राष्ट्रीय धोरणापर्यंत

तरीसुद्धा, फुजियानमध्ये उगम पावलेले काही प्रस्ताव हे राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात आले आहेत. याचे एक प्रमुख उदाहरण म्हणजे- ‘वेस्टर्न तैवान स्ट्रेट्स इकॉनॉमिक झोन’, जो प्रथम 2004 मध्ये फुजियानने प्रस्तावित केला होता आणि 2009 मध्ये मंजूर झाला. कालांतराने, त्याचे रूपांतर फुजियानला तैवानशी अधिक जवळून जोडणाऱ्या मुक्त व्यापार क्षेत्रात झाले, ज्याचा उद्देश तैवानचे उद्योग, व्यावसायिक आणि तरुण उद्योजकांना आकर्षित करणे हा होता.

स्वयंसिद्धा सामल यांच्या आगामी संशोधनपत्रानुसार, जे येत्या काही महिन्यांत प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे; त्यानुसार फुजियानमध्ये चाचणी घेतलेल्या या काही उपक्रमांनी नंतर व्यापक राष्ट्रीय धोरणांना दिशा दिली आहे.

सामल यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला सांगितले की, तैवानी नागरिकांच्या व्यावसायिक पात्रतेची मान्यता, वित्तपुरवठा आणि सरकारी खरेदी प्रक्रियेत तैवानच्या उपक्रमांना समान वागणूक, विस्तारित रोजगार आणि विस्तृत शैक्षणिक लाभ, तसेच तैवानच्या तरुणांसाठी स्टार्टअप प्रोत्साहन यांसारख्या सर्व उपाययोजना या प्रांतीय प्रयोगातूनच सुरू झाल्या आहेत.

सामल यांनी असे निरीक्षण नोंदवले की, 2001 मध्ये, शी जिनपिंग फुजियानचे गव्हर्नर असताना, तैवानच्या किनमेन आणि मात्सू बेटांसोबत “थ्री मिनी लिंक्स” उपक्रमांतर्गत थेट टपाल सेवा, तसेच व्यावसायिक आणि वाहतूक संपर्क सुरू करण्यात आले होते.

सामल यांनी सांगितले की, “या सर्व प्रकरणांकडे एकत्रितपणे पाहिल्यास, ती हेच दर्शवतात की, फुजियान केवळ बीजिंगमधील निर्देशांची अंमलबजावणी करण्यापलीकडेही बरेच काही करतो. हा प्रांत नवनवीन प्रयोग करतो, त्यांची व्यवहार्यता तपासतो आणि परिणाम दर्शवतो, ज्याचा नंतर केंद्रीय देखरेखीखाली राष्ट्रीय स्तरावर विस्तारही केला जातो.”

प्रतिकात्मकता आणि धोरणात्मक मर्यादा

बीजिंगच्या दृष्टिकोनातून, ‘पुर्न-एकत्रीकरणाच्या’ दिशेने प्रगती होणे देखील महत्त्वाचे आहे. या प्रगतीचे मूल्यांकन केवळ आर्थिक कामगिरी आणि एकत्रीकरणाच्या मानकांद्वारे केले जात नाही, तर तैवानच्या अंतर्गत राजकारणातील घडामोडी, कोणते राजकीय पक्ष प्रबळ होत आहेत आणि त्या निकालांवरून चीनबद्दलच्या जनमताचा कल काय आहे, या मुद्द्यांकडे बारकाईने लक्ष देऊन केले जाते.

परंतु चिनी व्यवस्था ज्या पद्धतीने कार्य करते, त्यामध्ये स्वयंसिद्धा सामल यांच्या वर्णनानुसार, प्रामुख्याने ‘प्रक्रिया-केंद्रित’ मानकांवर भर दिला जातो. यशाचे मोजमाप होते, ते जारी केलेल्या धोरणांवर, आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर आणि खर्च केलेल्या निधीवर; तैवानमध्ये खरोखरच दृष्टिकोन बदलतो आहे का, यावर तितका भर नसतो.

त्यामुळे आपल्यासमोर अशी परिस्थिती आहे की, जिथे तैवानची स्वतःची ओळख अधिक मजबूत होत आहे, पुर्न-एकत्रीकरणाला असलेला पाठिंबा कमी झाला आहे आणि 2023 मध्ये फुजियानमधील तैवानची गुंतवणूक, ही वार्षिक 80 टक्क्यांनी घटल्याची नोंद आहे. त्याचवेळी, तैवानसमोर बीजिंगने केलेले लष्करी बळकटीकरण त्यांच्या “हृदय आणि मन जिंकण्याच्या” रणनीतीला तडे देत आहे, ज्यामुळे तैवानच्या समाजात सद्भावनेऐवजी संशय अधिक बळावला आहे.

परंतु चिनी व्यवस्था ही कायमच क्रियाशीलता, शिस्त आणि दृश्य प्रयत्नांना प्राधान्य देऊन, आपले काम पुढे नेत राहते, मग त्या धोरणांमुळे तैवानमधील जनमत खरोखर बदलत असो वा नसो, किंवा कोणत्याही अर्थपूर्ण मार्गाने पुर्न-एकत्रीकरण पुढे सरकत असो किंवा नसो.

मूळ संकलन- रेशम

+ posts
Previous articleIAF Hosts AviaIndra-2025 Joint Air Exercise with Russia
Next articleतीन अपाचे हेलिकॉप्टरची अंतिम तुकडी भारतीय लष्कराकडे सुपूर्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here