भारतीय लष्करात गेल्या काही वर्षांपासून महिलांचा सहभाग वाढल्याचे चित्र आहे. मात्र भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमीवर म्हणजेच सियाचीन येथे महिला सैन्याधिकारी तैनात करण्यात आली आहे. या महिला अधिकारी आहेत, भारतीय लष्कराच्या फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्सच्या कॅप्टन शिवा चौहान. कुमार पोस्ट येथे 3 जानेवारी 2023पासून चौहान यांची नियुक्ती झाली असून तिथे त्या तीन महिन्यांसाठी आपले कर्तव्य बजावणार आहेत.
काराकोरम रेंजमध्ये सुमारे 20 हजार फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशिअर हे जगातील सर्वोच्च उंचीवरील युद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते. जोरदार हिमवृष्टी आणि बोचरे वारे यांचा सामना तिथल्या सैनिकांना करावा लागतो. याआधी 9 हजार फूटांवर असणाऱ्या सियाचीन बेस कॅम्पवर महिला अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.
फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्सकडून शिवा चौहान यांच्या नियुक्तीबद्दल ट्वीट करण्यात आले आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “ब्रेकिंग द ग्लास सीलिंग… फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्सच्या कॅप्टन शिवा चौहान जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमधून खडतर प्रशिक्षण पूर्ण करून कुमार पोस्टवर रुजू झाल्या आहेत.” या ट्वीटसोबतच कॅप्टन चौहान आणि इतर काही जवानांची राष्ट्रध्वजासह घेतलेली काही छायाचित्रेही दिली आहेत.
सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कॅप्टन शिवा चौहान यांना कठोर प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामध्ये बर्फाची भिंत चढणे, हिमस्खलन आणि हिमस्खलन बचाव सरावांचा समावेश होता. कॅप्टन शिवा चौहान यांच्या नेतृत्वाखालील सैपर्सच्या टीमला अनेक अभियांत्रिकी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 जानेवारी 2023 रोजी शिवा चौहान यांच्या पोस्टिंगचे कौतुक केले होते. त्यांनी ट्वीट केले होते की, “भारताच्या महिला शक्तीच्या स्पिरीटचे एक उत्तम उदाहरण आहे आणि त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.”
कॅप्टन शिवा चौहान या राजस्थानच्या रहिवासी आहेत. त्या बंगाल सॅपर अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण उदयपूरमधून झाले. त्यांनी उदयपूरच्या एनजेआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. लष्कराने म्हटले होते की, “लहानपणापासूनच शिवा चौहान यांना भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी अतुलनीय साहस दाखवले आणि मे 2021मध्ये त्यांना अभियंता रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले.”