मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या 70हून अधिक वर्षांच्या इतिहासात प्रथमच सौदी अरेबियातील एक स्पर्धक सहभागी होणार आहे. 27 वर्षीय रूमी अल्काहतानीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर सौदी प्रतिनिधी म्हणून तिची निवड जाहीर केली आणि स्ट्रॅपलेस सिक्वेन्ड गाऊनमधील स्वतःचे फोटो शेअर केले.
रूमी प्रशिक्षित दंतवैद्य आहे. ती सोशल मीडिया इन्फ्युएन्झर असून तिचे प्रचंड संख्येने फॉलोअर्स आहेत, तिला अनेक भाषा अवगत असून तिच्या मातृभूमीतील अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली आहे. मिस सौदी अरेबिया, मिस मिडल ईस्ट अशा स्पर्धांची ती विजेती आहे आणि मलेशियात अलीकडेच झालेल्या जागतिक आशियाई स्पर्धेतही तिने भाग घेतला होता.
“जागतिक संस्कृतींबद्दल जाणून घेणे आणि आपली अस्सल सौदी संस्कृती आणि वारसा जगासमोर आणणे हे माझे योगदान आहे,” हे तिचे वक्तव्य अरब न्यूजने उद्धृत केले आहे.
रियाधमध्ये जन्मलेली आणि वाढलेली रूमी, ही पुराणमतवादी अरब राज्याची ओळख जगासमोर सादर करू इच्छिणाऱ्या नव्या चेहऱ्याचे प्रतिनिधित्व करते. अगदी अलिकडच्या काळापर्यंत महिलांवर सार्वजनिक जीवनात मोठ्या प्रमाणात प्रतिबंध घालण्यात आले होते, त्यांना कार चालवता येत नव्हती आणि त्यांना केवळ पुरुष नातेवाईकासोबतच प्रवास करावा लागत होता.
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्या नेतृत्वाखाली आपला पुराणमतवादी ही ओळख पुसणाऱ्या सौदी अरेबियासाठी हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी महिलांवरील अनेक निर्बंध शिथिल केले आहेत, पुराणमतवादी मुल्लांवर नियंत्रण ठेवले आहे आणि दारू सेवनास देखील परवानगी दिली आहे.
राजकीय फायद्यासाठी इस्लामचा वापर करण्याबाबत त्यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली असून त्यांच्या राज्यात मुस्लिम ब्रदरहुडला जागा नाही. अतिरेकी इस्लामिक गट आणि भावना भडकविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत त्यांच्या कोणत्याही निर्णयांना फारसा विरोध झालेला नाही कारण देश ज्या हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे तिथे त्यांना आव्हान देण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये आहे.
इथे राजकीय मतभेदांना परवानगी नाही. राजेशाहीविरोधात कोणतीही गोष्ट करण्याची परवानगी नाही आणि निश्चितच राजपुत्र सलमानवर अस्पष्टपणे टीका करणारी कोणतीही गोष्ट नाही . त्यामुळे ही लोकशाही नाही आणि ती लोकशाहीच्या दिशेने ती वाटचालही करत नाही. योगायोगाने इराणही पहिल्यांदाच आपली स्पर्धक उतरवत आहे. मात्र त्याबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही.
सूर्या गंगाधरन