फ्रान्समध्ये दशकांमधील सर्वात मोठा वणवा; आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

0

दक्षिण फ्रान्समधील जंगल आणि गावांमध्ये, तब्बल 16,000 हेक्टर (39,537 एकर) क्षेत्रात पसरलेल्या भयानक वणव्यावर, अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारपासून भडकलेला हा वणवा, फ्रान्समधील सुमारे गेल्या 80 वर्षातील सर्वात मोठा वणवा असल्याचे म्हटले जात आहे.

आग पुन्हा भडकू नये यासाठी खबरदारी म्हणून आणि एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने, पुढील काही दिवस अग्निशामक दल या परिसरात तैनात राहील, असे अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले.

या आगीमुळे प्रभावित झालेल्या रहिवाशांना, अजूनही अधिकृत परवानगीशिवाय घरी परतण्यास मनाई केली आहे, कारण अनेक रस्ते अजूनही बंद आहेत आणि तुटलेल्या विजेच्या तारा किंवा झाडे पडल्यामुळे हे रस्ते अद्याप धोकादायक अवस्थेत आहेत.

एकाचा मृत्यू , 18 जखमी

या भीषण वणव्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून, तिने स्थलांतराचे आदेश न पाळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय आगीत 18 जण जखमी झाले असून, त्यापैकी 16 जण अग्निशामक दलाचे कर्मचारी आहेत.

वणव्यामुळे परिसरातील 36 घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत, तर अन्य 20 घरे नुकसानग्रस्त झाली. आतापर्यंत सुमारे 2,000 रहिवासी आणि पर्यटकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे.

मंगळवारी लागेलेल्या आगीमुळे अंदाजे 5,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, ज्यापैकी 1,500 घरांमध्ये गुरुवार संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु झाला नसल्याचे, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘हा तर महाप्रलय आहे’

“आमच्याकडे आता पाणी नाही, इंटरनेट नाही, वीजही नाही. आमचे जनजीवन विस्कळीत करणारा हा तर महाप्रलय आहे,” अशी प्रतिक्रिया सेंट-लॉरेंट-दे-ला-कॅब्रेरिस या गावात राहणारे शेतकरी अॅलेन रेनेओ, यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हे गाव वणव्यामुळे सर्वाधित बाधित झाले आहे.

“आम्ही आमचे घर कसेबसे वाचवले, पण आम्हाला दोन दिवस आगीशी झुंजावे लागले,” असे रेनेओ म्हणाले.

ऑड प्रदेशातील जंगलाच्या भागातून, धुराचे लोट उठताना दिसत होते. ड्रोन फुटेजमध्ये आग लागलेल्या ठिकाणी – पॅरिस देशाच्या आकाराच्या दीडपट क्षेत्रफळाइतकी जमीन जळून गेलेली दिसून आली.

वेगाने पसरलेली आग

स्पेनच्या सीमेपासून आणि भूमध्य समुद्रापासून जवळ लागलेली ही आग, वाऱ्याच्या जोरामुळे आणि परिसरातील अतिशय कोरड्या वनस्पतींमुळे अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पसरत गेली. या भागात मागील काही महिन्यांपासून दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे, वाळलेल्या झाडांना आग पकडत गेली.

“आग आता हळूहळू मंदावते आहे, पण अजूनही ती पूर्णपणे विझलेली नाही,” असे या भागाचे उप-प्रशासक रेमी रेकिओ यांनी पत्रकारांना सांगितले.

“कालच्या तुलनेत आज आग जास्त न पसरल्याचे दिसून आले, कारण हवामानात बदल झाला आहे. विशेषतः वाऱ्याची दिशा बदलली आहे,” असे ले मोंडे या वृत्तपत्राने रेकिओ यांचे विधान उद्धृत करताना सांगितले.

गुरुवारी संध्याकाळी, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग सुमारे 16,000 हेक्टर क्षेत्रात पसरली आहे, तर काही फ्रेंच माध्यमांनी 17,000 हेक्टर (सुमारे 40,000 एकर) क्षेत्र बाधित झाल्याचे सांगितले आहे. मंगळवारपासून, सुमारे 2,000 अग्निशामक कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत.

“लढाई अजून संपलेली नाही – ही आग पुन्हा आणखी मोठ्या ताकदीने भडकू शकते,” असे प्रिफेक्ट क्रिस्टिअन पुगेट यांनी सांगितले.

‘हवामान बदलाचे परिणाम’

पर्यावरण मंत्री- अॅग्नेस पॅनियर-रुनाचर यांनी, France Info रेडिओवरील मुलाखतीत सांगितले की, “ही आग 1949 नंतरची सर्वात मोठी आग आहे. हा हवामान बदलाचा आणि या भागातील दुष्काळाचा एकत्रित परिणाम आहे.”

तरी, या आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास अजूनी सुरू आहे.

“माझ्या आयुष्यात कधीही मी अशी आग पाहिलेली नव्हती,” असे 77 वर्षीय निवृत्त सायमन गोमेझ यांनी सांगितले.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, “भूमध्यसागराच्या प्रदेशात उन्हाळा अधिक तीव्र आणि वातावरण अधिक कोरडे होत असल्यामुळे या भागात वणवा लागण्याची जोखीम मोठी आहे.”

फ्रान्सच्या हवामान खात्याने, दक्षिण फ्रान्सच्या इतर भागांमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

‘आपण युद्धात आहोत’

स्थानिक महापौर आणि द्राक्ष उत्पादक यांचे म्हणणे आहे की, “द्राक्षमळ्यांची नासधूस देखील ही आग झपाट्याने पसरण्याचे एक कारण आहे.”

“आपण एकप्रकारच्या युद्धात आहोत – पण आपण हे युद्ध आपण जिंकू,” असे झेवियर गुईल, या स्थानिक द्राक्षमळा मालकाने सांगितले.

या आगीत त्यांच्या जंगलाचे क्षेत्र जळून गेले, पण त्यांचा द्राक्षमळा वाचला. “माझ्या सासऱ्यांचे घर Saint-Laurent-de-la-Cabrerisse मध्ये होते, जे जळून खाक झाले,” असेही त्यांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारताशी संबंध ‘नव्या, धोरणात्मक युगात’ प्रवेश करणारे: इक्वेडोरचे राजदूत
Next articleZen Technologies Wins Patent Dispute, Competing Claim Revoked

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here