नवीन इंजिन MRO सुविधेसह, भारताच्या एअरोस्पेस क्षेत्रात फ्रान्सचा विस्तार

0

फ्रेंच एरोस्पेस समूह सफ्रानने भारतात विस्ताराचा एका नवीन टप्पा गाठला आहे. नागरी आणि लष्करी विमान वाहतुकीसाठी मोठ्या सुविधांचे अनावरण करत, भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी असलेली आपली दीर्घकालीन बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. सफ्रान कंपनीने नुकतेच हैदराबादमध्ये, CFM इंटरनॅशनल LEAP इंजिनसाठी जगातील सर्वात मोठ्या ‘MRO सुविधेचे‘ (देखभाल, दुरुस्ती आणि इतर सुविधा) उद्घाटन केले, तसेच राफेल कार्यक्रमाशी जोडलेल्या नव्या संरक्षण-केंद्रित गुंतवणुकीची घोषणाही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सफ्रान बोर्डचे अध्यक्ष रॉस मॅकइनेस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हियर अँड्रीस यांच्या उपस्थितीत झालेला हा उद्घाटन समारंभ, भारतीय बाजारपेठेतील कंपनीच्या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या वचनबद्धतांपैकी एक आहे.

€200 दशलक्षांची LEAP इंजिन MRO सुविधा, सफ्रानच्या नागरी एरोस्पेस प्रयत्नांना आधार

45,000 चौरस मीटरचे हे नवीन LEAP इंजिन MRO केंद्र, ज्यात €200 दशलक्ष युरोची गुंतवणूक करण्यात आली असून, ही सुविधा 2026 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी 300 इंजिनांच्या सेवा क्षमतेपर्यंत ती वाढवली जाणार आहे. अत्याधुनिक टेस्ट बेंच आणि विशेष कौशल्य केंद्राद्वारे दरवर्षी 100 हून अधिक भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले जाईल.

LEAP इंजिनसाठी भारत हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे, जिथे भारतीय वाहक LEAP द्वारे चालणाऱ्या 400 हून अधिक विमानांचे संचालन करत आहेत आणि त्यांच्याकडे 2,000 अतिरिक्त इंजिन्सची ऑर्डर आहे. या सुविधेतील रोजगार सुरूवातीला 250 असले, जी पूर्ण क्षमतेच्या वेळी 1,100 पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

नवीन M88 इंजिनासाठी MRO सुविधा: राफेल सपोर्ट इकोसिस्टम आणखी मजबूत

सफ्रानने, दासॉल्ट राफेलची ताकद वाढवणाऱ्या M88 इंजिनसाठीही MRO सुविधा स्थापन करणार असल्याची पुष्टी केली. LEAP केंद्राच्या शेजारी असलेल्या, हैदराबादमधील या सुविधेत €40 दशलक्ष युरोची गुंतवणूक होणार असून, दरवर्षी येथे 600 इंजिन मॉड्यूल्सच्या ओव्हरहॉलला समर्थन दिले जाईल. याठिकाणी एकूण 150 तज्ज्ञ कार्यरत असतील.

या केंद्रामध्ये, भारतीय हवाई दलाच्या वाढत्या राफेल ताफ्याला प्राधान्य दिले जाईल, ज्यात नुकतेच ऑर्डर केलेल्या 26 राफेल M नौदल प्रकारांचाही समावेश आहे, याशिवाय निर्यात ग्राहकांनाही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.

‘हॅमर’ शस्त्र प्रणालीसाठी, BEL–सफ्रान संयुक्त उपक्रम

24 नोव्हेंबर रोजी, नवी दिल्ली येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत, संयुक्त उपक्रम आणि सहकार्य करार करून, या विस्ताराला अधिक चालना मिळाली आहे. ही भागीदारी सफ्रानच्या ‘हॅमर’ (Hammer) या हवेतून जमिनीवर अचूक मारा करणाऱ्या शस्त्राचे उत्पादन करेल, जे राफेल आणि भारताच्या HAL तेजसमध्ये समाकलित केले जाऊ शकते.

एव्हिएओनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकीसाठी बंगळुरूमध्ये अतिरिक्त गुंतवणूक

सफ्रानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, यापूर्वी घोषित केलेल्या €30 दशलक्ष युरोपेक्षा अधिक किमतीच्या दोन प्रकल्पांचा पुनरुच्चार केला: एरोनिक्स आणि ॲक्च्युएटर्सवर लक्ष केंद्रित करणारे बंगळूरू येथील एक इंजिनिअरिंग केंद्र, ज्यात 250 अभियंते काम करतील.

2026 पासून, सुमारे 400 लोकांना रोजगार देणारी एक नवीन इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्च्युएशन उत्पादन सुविधा स्थापन केली जाईल.

सफ्रान सध्या भारतात 18 सुविधा केंद्रे चालवत आहे, जिथे सुमारे 3,000 कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यामुळे भारतीय सशस्त्र दलांसोबत 70 वर्षांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. HAL सोबतची तिची दीर्घकाळची भागीदारी, हेलिकॉप्टर इंजिनवरील काम आणि भविष्यातील हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टरसाठी अरावली इंजिनच्या सह-विकासाचा समावेश करते.

भारत-फ्रान्स संरक्षण विज्ञान सहकार्याचा नवा टप्प

सफ्रान भारतातील आपला औद्योगिक विस्तार वाढवत असताना, DRDO आणि फ्रान्सच्या DGA यांच्यात एका तांत्रिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्याद्वारे भारत आणि फ्रान्सने संरक्षण विज्ञान सहकार्यातील एका नवीन टप्प्याची सुरूवात झाली.

या करारावर, डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत आणि फ्रान्सचे राष्ट्रीय आयुध संचालक लेफ्टनंट जनरल गाएल दियाझ डी ट्युस्टा यांनी अंतिम स्वाक्षरी केली. दोन्ही देश सार्वभौम क्षमतांच्या विकासाला प्राधान्य देत असताना झालेला हा करार, द्विपक्षीय संरक्षण नवकल्पनांना बळकटी देतो.

पुढील पिढीच्या इंजिन आणि प्लॅटफॉर्मच्या सह-विकासाला गती

विकसनशील भागीदारीच्या केंद्रस्थानी AMCA (ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट) साठी, 120 kN इंजिन डिझाइन करण्यासाठी भारत आणि फ्रान्सचा हा संयुक्त प्रयत्न आहे. या कार्यक्रमात सिंगल-क्रिस्टल ब्लेड्स आणि उच्च-तापमान टर्बाइन धातू-विज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचे हस्तांतरण समाविष्ट आहे, जिथे भारताला परंपरेने बाह्य तज्ज्ञतेची गरज भासली आहे.

हेलिकॉप्टर प्रणोदन विभागात HAL आणि सफ्रान एकत्रितपणे, इंडियन मल्टी-रोल हेलिकॉप्टर (IMRH) साठी, अरावली इंजिनवर काम करत आहेत, ज्यामुळे रोटरी-विंग प्रणोदनमध्ये सह-अभियांत्रिकीचा एक नवीन टप्पा सुरू झाला आहे.

इंडो-फ्रेंच एरोस्पेस कॉरिडॉरमध्ये भारत उत्पादन केंद्र म्हणून उदयास

परस्पर औद्योगिक सहकार्य, इंजिन आणि संरक्षण प्लॅटफॉर्मच्या पलीकडे विस्तारत आहे. गोदरेज एरोस्पेसला नुकताच LEAP इंजिनसाठी टायटॅनियम वायुवीजन असेंब्ली पुरवण्याबाबत पाच वर्षांचे कंत्राट मिळाले आहे, ज्यामुळे जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळ्यांमध्ये भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.

हैदराबादमधील आगामी M88 इंजिन देखभाल सुविधा, सफ्रानची फ्रान्सबाहेरील पहिली सुविधा आहे, जी आणखी एक उच्च-मूल्य क्षमता जोडते आणि पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर जवळपास 1,000 तज्ज्ञांना रोजगार देऊ शकते.

धोरणात्मक गती असलेली भागीदारी

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, हे फेब्रुवारी 2026 मध्ये ग्लोबल AI समिटसाठी भारतात येणे अपेक्षित असताना, दोन्ही देश संरक्षण, AI प्रशासन, स्वायत्त प्रणाली आणि सुरक्षित सायबर-AI संरचनेतील त्यांचे सहकार्य संरेखित करत आहेत.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleव्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात, नॅशनल गार्डचे दोन सैनिक जखमी
Next articleथायलंड, मलेशिया, इंडोनेशियामध्ये पूराचा तडाखा, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here