गाझातील मुलांचा मृत्यू हा क्षेपणास्त्र बिघाडामुळे : IDF चा दावा

0
IDF
13 जुलै 2025 रोजी गाझा शहरातील एका घरावर इस्रायलने रात्रभर केलेल्या हल्ल्याच्या जागेची तपासणी करताना एक पॅलेस्टिनी (रॉयटर्स/महमूद इस्सा) 
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्य गाझामध्ये किमान आठ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये मुलांची संख्या जास्त होती, तर एक डझनपेक्षा जास्तजण जखमी झाले. इस्रायली क्षेपणास्त्राने ज्यावेळी या भागात हल्ला केला तेव्हा मृत्यूमुखी पडलेली मुले पाणी भरत होती, असे IDF ने सांगितले. याशिवाय क्षेपणास्त्रातील बिघाडामुळे ते या भागात पडले असा दावाही केला आहे.

इस्रायली सैन्याने म्हटले आहे की क्षेपणास्त्राचा उद्देश त्या भागातील इस्लामिक जिहाद दहशतवाद्याला मारण्याचा होता परंतु खराबीमुळे ते “लक्ष्यापासून डझनभर मीटर” आधीच खाली कोसळले.

“IDF ला नागरिकांना झालेल्या कोणत्याही नुकसानाबद्दल खेद वाटत आहे,” असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे, तसेच या घटनेचा आढावा घेतला जात असल्याचेही सांगितले.

अल-अवदा रुग्णालयातील आपत्कालीन डॉक्टर अहमद अबू सैफान यांनी सांगितले की, नुसेरात निर्वासित छावणीतील पाणी वितरण केंद्रावर झालेल्या हल्ल्यात सहा मुले ठार झाली तर 17 जण जखमी झाले.

गेल्या काही आठवड्यांपासून गाझामध्ये पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे, इंधनाच्या कमतरतेमुळे डिसॅलिनेशन आणि स्वच्छता सुविधा बंद पडल्या आहेत, ज्यामुळे लोक त्यांचे पाण्याचे प्लास्टिक कंटेनर भरण्यासाठी वितरण केंद्रांवर अवलंबून आहेत.

काही तासांनंतर, गाझा शहरातील एका बाजारपेठेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला, ज्यात एक प्रमुख रुग्णालय सल्लागार अहमद कंदील यांचा समावेश आहे, असे पॅलेस्टिनी माध्यमांनी वृत्त दिले. इस्रायली लष्कराने या हल्ल्यावर त्वरित भाष्य केले नाही.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून 58 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत, गेल्या 24 तासांत मृतांच्या संख्येत 139 लोकांची भर पडली आहे.

मंत्रालयाच्या मते ते नागरिक आणि सैनिक यांच्यात फरक करत नाही, परंतु मृतांपैकी अर्ध्याहून अधिक महिला आणि मुले असल्याचे त्यांनी सांगितले.

युद्धबंदी वाटाघाटी ‘आशावादी’ टप्प्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्य पूर्वेतील राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रविवारी सांगितले की ते कतारमध्ये सुरू असलेल्या गाझा युद्धबंदी वाटाघाटींबद्दल “आशावादी” आहेत.

त्यांनी न्यू जर्सीतील टेटरबोरो येथे पत्रकारांना सांगितले की, फिफा क्लब वर्ल्ड कप फायनलच्या निमित्ताने  कतारी अधिकाऱ्यांना भेटण्याची त्यांची योजना आहे.

तर दुसरीकडे, युद्धबंदी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू असणाऱ्या वाटाघाटी सध्या तरी रखडल्या आहेत, दोन्ही बाजू पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमधून इस्रायली माघार घेण्याच्या अटीबाबत विभाजित आहेत, असे पॅलेस्टिनी आणि इस्रायली सूत्रांनी आठवड्याच्या शेवटी सांगितले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू रविवारी उशिरा चर्चेतील नवीन घडामोडींवर विचारविनिमय करण्यासाठी मंत्र्यांची बैठक घेणार होते, असे एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिकेच्या 60 दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावावर दोहा येथे अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे, परंतु करार होणार अशी शक्यता जी गेल्या आठवड्यात दिसून  येत होती ती आता बराचशी कमी झाली आहे. कारण दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हट्टीपणाचा आरोप केला आहे.

रविवारी टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये नेतान्याहू म्हणाले की, इस्रायल त्याच्या मुख्य मागण्यांपासून मागे हटणार नाही.  गाझामध्ये अजूनही असलेल्या सर्व ओलिसांना सोडणे, हमासचा नाश करणे आणि गाझा पुन्हा कधीही इस्रायलसाठी धोका बनणार नाही याची खात्री करणे, या त्या मागण्या आहेत.

7 ऑक्टोबर 2023 रोजी युद्ध सुरू झाले, जेव्हा हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून सुमारे बाराशे  लोकांचा बळी घेतला आणि 251 जणांना गाझामध्ये ओलिस ठेवले. उर्वरित 50 ओलिसांपैकी किमान 20 जण अजूनही जिवंत असल्याचे मानले जाते.

युद्ध संपावे यासाठी करार?

जेरुसलेममधील नेतान्याहू यांच्या कार्यालयाबाहेर कराराची मागणी करण्यासाठी ओलिसांचे कुटुंबिय जमले.

“इस्रायलच्या बहुसंख्य लोकांनी मोठ्याने आणि स्पष्टपणे सांगितले आहे.  हे युद्ध संपवण्याच्या किंमतीवर आम्हाला करार करायचा आहे, आणि आम्ही ते आता करू इच्छितो,” असे जॉन पोलिन म्हणाले, त्यांचा मुलगा हर्श गोल्डबर्ग-पोलिनला हमासने गाझा बोगद्यात ओलिस ठेवले होते आणि ऑगस्ट 2024 मध्ये त्याच्या अपहरणकर्त्यांनी मारले होते.

नेतान्याहू आणि त्यांचे मंत्री रविवारी लाखो नागरिकांना  गाझातील रफाहच दक्षिणेकडील भागात हलवण्याच्या योजनेवर चर्चा करणार होते, ज्याचे वर्णन इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एक नवीन “मानवतावादी शहर” म्हणून केले आहे. मात्र जबरदस्तीने हे विस्थापन केल्याबद्दल त्यावर आंतरराष्ट्रीय टीका होण्याची शक्यता आहे.

इस्रायलमधील चर्चेची माहिती देणाऱ्या एका इस्रायली सूत्राने सांगितले की, जर युद्धबंदी झाली तर युद्धबंदी दरम्यान रफाहमध्ये कॉम्प्लेक्स स्थापन करण्याची योजना होती.

युद्धबंदीच्या चर्चेशी परिचित असलेल्या एका पॅलेस्टिनी सूत्राने शनिवारी सांगितले की, हमासने इस्रायलकडून आलेले प्रस्तावित माघारीचे नकाशे नाकारले आहेत, कारण त्यात संपूर्ण रफाहसह सुमारे 40 टक्के भूभाग इस्रायलच्या नियंत्रणाखाली येईल.

हमासविरुद्ध इस्रायलच्या युद्धामुळे २० लाखांहून अधिक लोकसंख्येपैकी जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या विस्थापित झाली आहे. गाझावासीयांच्या म्हणण्यानुसार किनारपट्टीवरील परिसरात कुठेही सुरक्षितता शिल्लक राहिलेली नाही.

रविवारी पहाटे, गाझा शहरातील ज्या एका घरावर क्षेपणास्त्र कोसळले त्यातील कुटुंबाला स्थलांतराचा आदेश मिळाल्यामुळे ते स्थलांतरित झाले होते.

“माझी काकू, तिचा नवरा आणि मुले निघून गेली आहेत. मात्र पहाटेच्या वेळी झालेल्या कुरूप रक्तरंजित हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा काय दोष?” असा प्रश्न इमारतीच्या ढिगाऱ्यात उभ्या असलेल्या अनस मतर यांनी विचारले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleChina Says Dalai Lama Succession Issue A ‘Thorn’ In Relations With India
Next articleIs a China-Taiwan War Imminent? Rising Tensions, U.S. Pressure, and Australia’s Defiance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here