अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी, जनरल अॅटॉमिक्सची उपकंपनी असलेल्या जनरल अॅटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्स, (GA-ASI) यांनी मानवविरहीत विमानांची जोडणी, मुख्य लँडिंग गियर घटक, उपजोडणी आणि उत्पादन करण्यासाठी भारत फोर्ज लिमिटेड या आघाडीच्या भारतीय संरक्षण कंपनीसोबत आपली धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. या भागीदारीमुळे दोन्ही कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होईल आणि भारतीय मानवरहित विमान उद्योगाला मोठी चालना मिळेल; तसेच हाय-एंड ड्रोनसाठी उत्पादन परिसंस्था (इकोसिस्टीम) विकसित होईल अशी अपेक्षा आहे.
“जीए-एएसआय भारत फोर्जसोबत एरोस्ट्रक्चरच्या उत्पादनासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात काम करण्यास उत्सुक आहे,” असे प्रतिपादन जनरल अॅटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी विवेक लाल यांनी केले.
उच्च-कार्यक्षमता, अतिशय महत्त्वाच्या सुरक्षा घटकांच्या विस्तृत श्रेणीच्या निर्मितीमध्ये पाच दशकांहून अधिक अनुभव असलेली भारत फोर्ज ही कंपनी उत्पादनाच्या संकल्पनेपासून, डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन, चाचणी आणि प्रमाणीकरणापर्यंतच्या पूर्ण-सेवा पुरवण्यास सक्षम आहे, असे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“भारत फोर्जचे फोर्जिंग क्षेत्रातील कौशल्य जागतिक स्तरावर ओळखले जाते आणि एरोस्पेस क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे आम्हाला जगातील सर्वात प्रगत मानवविरहित हवाई वाहनांची पुढील जनरेशन तयार करण्यासाठी एकत्र काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे,” असे विवेक लाल म्हणाले.
भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, “एरोस्पेस हे उच्च ‘तंत्रज्ञानयुक्त’ डोमेन आहे, जे उत्पादनाची समग्रता, विश्वासार्हता आणि त्रुटीविरहीतता या त्रिसूत्रीवर अवलंबून असते.”
ही स्वतःच एक प्रकारची विशिष्ट पद्धती आहे आणि जी लोकाभिमुख तसेच प्रक्रियाकेंद्रित असणे फार गरजेचे आहे. आमच्या एरोस्पेस ग्रोथ स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून आमचा जीए-एएसआय बरोबर झालेला करार हा भारत फोर्जमधील आमच्या वैशिष्ट्याचा एक भक्कम पुरावा आहे, जो भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आवश्यक आहे, असे बाबा कल्याणी यांनी स्पष्ट केले.
भारत फोर्ज लिमिटेडकडे एरोस्पेस घटक आणि प्रणालींसाठी अत्याधुनिक, डिजिटली इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, असेंबली आणि चाचणी सुविधा आहे. ही कंपनी नागरी आणि लष्करी अशा दोन्हीच्या वापरासाठी विमान आणि इंजिनसाठी स्ट्रक्चरल आणि इंजिन पार्ट्स तसेच उपप्रणाली तयार करते. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या प्रभावी पोर्टफोलिओमध्ये एअरक्राफ्ट टर्बाइन आणि कॉम्प्रेसर उत्पादने समाविष्ट आहेत. याशिवाय उच्च-गुणवत्तेचा दर्जा राखून नवीनतम तंत्रज्ञान आणि डिझाइन ट्रेंडच्या मदतीने हाय-एंड एरो इंजिन घटक – जसे की ब्लेड, डिस्क आणि शाफ्ट; आणि विमानाच्या लँडिंग गियरसह एअरफ्रेम घटक यांचाही त्यात समावेश आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)