गोदरेज एअरोस्पेस विभागाचा, प्रॅट अँड व्हिटनीसोबत महत्वपूर्ण उत्पादन करार

0

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या- गोदरेज एअरोस्पेस विभागाने, RTX समूहाचा भाग असलेल्या जागतिक एअरोस्पेस क्षेत्रातील दिग्गज कंपन्या प्रॅट अँड व्हिटनीसोबत एक महत्त्वपूर्ण उत्पादन करार केला आहे. या कराराअंतर्गत, गोदरेज एअरोस्पेस विमान इंजिनांसाठी अत्याधुनिक घटकांचे उत्पादन करणार आहे, जे भारताच्या एअरोस्पेस उत्पादन क्षेत्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.

ही घडामोड, जागतिक एअरोस्पेस पुरवठा साखळीतील गोदरेजच्या वाढत्या भूमिकेचे प्रतीक असून, एव्हिएशन क्षेत्रातील मूळ उपकरण उत्पादक (OEMs) यांच्यात, एक महत्त्वाचा भागीदार होण्याच्या कंपनीच्या रणनीतीला बळकटी देणारी आहे. या करारामुळे गोदरेज कंपनीच्या तंत्रज्ञान क्षमतेत वाढ होऊन, उच्च-नजाकतीचे एअरोस्पेस घटक अधिक प्रमाणात तयार होतील, अशी अपेक्षा आहे.

या विकासावर भाष्य करताना, गोदरेज एअरोस्पेसचे व्यवसायप्रमुख मानेक बेह्रमकंदिन म्हणाले की, “प्रॅट अँड व्हिटनी” या जगविख्यात कंपनीसोबतची ही भागीदारी केवळ गोदरेजसाठीच नाही, तर संपूर्ण भारताच्या एअरोस्पेस क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड आहे. ही भागीदारी आमची जटिल आणि उच्च-गुणवत्तेची उत्पादने वेळेत पुरवण्याची सिद्ध क्षमता दर्शवते आणि भारताच्या प्रगत उत्पादनातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनाला पूरक ठरते.”

त्यांनी सांगितले की, “गोदरेजची सक्षम पायाभूत सुविधा आणि उत्कृष्टतेवरील लक्ष, यामुळे कंपनी जागतिक एव्हिएशन उद्योगात ठोस योगदान देण्याच्या स्थितीत आहे.”

“ही भागीदारी आम्हाला जागतिक एअरोस्पेस इकोसिस्टममध्ये अधिक सखोल सहभागी होण्यास मदत करेल आणि उच्च-मूल्य उत्पादन क्षेत्रात भारताचा ठसा आणखी ठळकपणे उमटवेल,” असेही ते म्हणाले.

सुमारे 35,000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या समर्पित एअरोस्पेस उत्पादन सुविधा आणि विकसित होत असलेल्या 48,500 चौरस मीटरच्या अन्य सुविधेसह, गोदरेज एअरोस्पेस आपली औद्योगिक क्षमता झपाट्याने विस्तारत आहे. कंपनी दीर्घकाळापासून भारताच्या संरक्षण आणि अंतराळ कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असून, आता जागतिक व्यापारी आणि लष्करी एव्हिएशन कार्यक्रमांमध्येही आपली भूमिका अधिक सखोल करण्याचा निर्धार बाळगते.

प्रॅट अँड व्हिटनी, जे गेल्या जवळपास 100 वर्षांपासून अभियांत्रिकी नवोन्मेषासाठी ओळखले जातात, त्यांनी भारतीय हवाई दलाच्या महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मना सात दशके शक्ती पुरवली आहे. ही नवी भागीदारी दोन्ही कंपन्यांतील संबंध अधिक दृढ करेल आणि भारताच्या एअरोस्पेस क्षमतेला पुढे नेईल, अशी अपेक्षा आहे.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleUS Marine Corps Flags Gaps in Preparing for China-Led Economic Warfare
Next articleIndia-UK व्यापार कराराला उद्योग संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here