LCA तेजस जेटसाठीचा इंजिन करार पूर्ण, मात्र वितरणाचा तिढा अद्याप कायम

0

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने, अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (GE) सोबत एक नवीन करार केला आहे, ज्याअंतर्गत 97 अतिरिक्त लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस Mk1A फायटरसाठी, 113 ‘F404-GE-IN20’ इंजिन्सचा आणि संबंधित सपोर्ट पॅकेजेसचा पुरवठा सुनिश्चित केला जाईल.

शुक्रवारी अंतिम करण्यात आलेला हा करार, भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जरी उत्पादन विलंबामुळे भारतीय हवाई दल (IAF) आणि संभाव्य निर्यात ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

या नव्या कराराअंतर्गत GE Aerospace कंपनी, 2027 ते 2032 दरम्यान ही इंजिन्स वितरित करेल, जे संरक्षण मंत्रालयाने सप्टेंबर 2025 मध्ये मंजूर केलेल्या, तेजस Mk1A च्या विस्तारित ऑर्डरसाठीच्या HAL च्या उत्पादन योजनेशी सुसंगत असेल.

या अतिरिक्त ऑर्डरची किंमत 62,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, यामुळे IAF च्या नियोजीत तेजस ताफ्याची संख्या 352 पर्यंत पौहचेल.

हा नवीन करार, HAL च्या 2021 मध्ये झालेल्या 99 F404 इंजिनांच्या करारावर आधारित आहे, ज्याची किंमत अंदाजे $716 दशलक्ष आहे. GE Aerospace ने आतापर्यंत त्यापैकी चार इंजिने पुरवली आहेत. परंतु, दक्षिण कोरियातील एका प्रमुख घटक पुरवठादाराचा पुरवठा बंद पडल्याने, जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे, विमानांच्या मूळ वितरण वेळापत्रकात विलंब झाला आहे.

उत्पादनात प्रगती, मात्र सततच्या विलंबामुळे हवाई दल त्रस्त

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या म्हणण्यानुसार, त्यांच्या बंगळुरू येथील युनिटमध्ये उत्पादनाचा वेग वाढला असून, 2026-27 पर्यंत दरवर्षी 30 विमाने तयार करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

मात्र, इंजिनाचा पुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी, विमानाची जोडणी (Assembly), त्याच्या चाचण्या आणि प्रमाणन प्रक्रिया, यामध्ये झालेल्या विलंबांमुळे पहिल्या विमानाची हवाई दलाकडे सुपुर्द करण्याची अंतिम मुदत, आता मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, ज्याविषयी भारतीय हवाई दल साशंक आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, तेजस Mk1A च्या वितरण वेळापत्रकातील वारंवार बदलांमुळे नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातीला, ऑक्टोबर 2025 मध्ये दोन विमानांच्या वितरणाचे आश्वासन देण्यात आले होते, जे आता पुढील वर्षाच्या सुरूवातीला मिळण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनुसार, विमानांमध्ये मिशन प्रणाली एकत्रित करण्याला आणि CEMILAC (Centre for Military Airworthiness and Certification) द्वारे होणारी लांबलचक प्रमाणन प्रक्रिया पूर्ण व्हायला, अजून सहा महिने लागू शकतात, ज्यामुळे वितरणात पुन्हा विलंब होण्याचा धोका आहे.

IAF च्या एका प्रकल्पाशी परिचित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, “इंजिन्स उपलब्ध आहेत, मात्र विमाने पूर्णपणे तयार झालेली नाहीत. फायटर स्क्वाड्रनची (विमानांची) संख्या आधीच 29 वर आलेली असल्याने, प्रत्येक विलंबामुळे आमच्या ऑपरेशनल तयारीवर परिणाम होतो आहे.”

निर्यातीच्या अपेक्षांवर ताण

तेजस विमानांच्या वितरणातील सततच्या विलंबामुळे, भारताच्या निर्यात प्रयत्नांना देखील मोठा फटका बसत आहे. फिलिपाईन्स, इजिप्त आणि आफ्रिकेतील अनेक देशांनी तेजस विमानांच्या खरेदीमध्ये रुची दाखवली आहे. मात्र, यापैकी अनेक संभाव्य ग्राहक खरेदीचा करार करण्यापूर्वी, भारतीय हवाई दलात तेजसच्या पूर्णपणे रुजू होण्याची वाट पाहत आहेत.

संरक्षण क्षेत्रातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार: “करार करण्यापूर्वी परदेशी हवाई दलांना उत्पादनाचे सातत्य आणि वेळेवर होणारे वितरण पाहायचे आहे. आणखी कुठल्याही प्रकारचा विलंब झाल्यास, हे ग्राहक दक्षिण कोरियाच्या FA-50 किंवा स्वीडनच्या Gripen C सारख्या पर्यायांकडे वळू शकतात.”

“भारत सरकार ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत, तेजसला एक ‘सक्षम निर्यात मंच’ म्हणून सादर करण्याचा जोरदार प्रयत्न करत असताना, वितरण वेळापत्रकाचे पालन न झाल्यास, विश्वासार्ह संरक्षण पुरवठादार म्हणून भारताच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो,” असा इशारा एका विश्लेषकांनी दिला आहे.

HAL चा दृढ आत्मविश्वास

HAL चा दावा आहे की, सुधारित वेळापत्रकानुसार विमानांचे वितरण करण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत. कंपनीने आपले पुरवठादार जाळे वाढवले आहे, अनेक उड्डाण चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि त्यांच्या उत्पादन सुविधा पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. HAL च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तेजस Mk1A विमानांची पहिली तुकडी 2026 मध्ये बाहेर पडण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर उत्पादनात हळूहळू वाढ होत जाईल.

तेजस Mk1A मध्ये, मूळ Mk1 विमानापेक्षा अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यात प्रगत AESA रडार, आधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि सुधारित देखभाल क्षमता यांचा समावेश आहे. मात्र, उद्योग निरीक्षकांच्या मते, भारताच्या या स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवायचे असेल, तर उत्कृष्ट तंत्रज्ञासोबतच, वेळेवर अंमलबजावणी करणेही महत्वाचे आहे, जो त्याचे अंतिम यश सुनिश्चित करेल.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleचीनच्या नौदलात ‘फुजियान’ या प्रगत विमानवाहू युद्धनौकेचा समावेश
Next articleनवी दिल्लीतील अफगाण दूतावासाचे प्रमुख असणार तालिबानी अधिकारी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here