हेलिकॉप्टर्ससाठी नवे तंत्रज्ञान आणि सह-विकासाबाबत HAL चा महत्वपूर्ण करार

0

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि जर्मन संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रमुख कंपनी Hensoldt यांनी, दुबई एअर शो 2025 मध्ये, भारतीय लष्करी हेलिकॉप्टर्ससाठी पुढील पिढीची अडथळा निवारण प्रणाली (Obstacle Avoidance System – OAS) संयुक्तपणे विकसित करण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनासाठी एका संयुक्त करारावर स्वाक्षरी केली. ही प्रणाली कमी दृश्यमानता आणि कमी उंचीवरील उड्डाण कार्यांदरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये, अशाच एका घटनेत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला होता.

या करारामध्ये, तंत्रज्ञानाचे सर्वसमावेशक हस्तांतरण, डिझाईन, उत्पादनच्या बौद्धिक संपदेवरील (IP) संयुक्त मालकी हक्क, तसेच HAL साठी संपूर्ण निर्यात अधिकार यांचा समावेश आहे. यामुळे भारत सार्वभौम LiDAR-आधारित हेलिकॉप्टर सुरक्षा प्रणाली विकसित करू शकणाऱ्या निवडक राष्ट्रांच्या गटात सामील झाला आहे. हा करार, 2023 मध्ये प्रणालीच्या डिझाईन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारावर (MoU) आधारित आहे.

भारतातील हेलिकॉप्टर ऑपरेशन्स, ही जगातील काही सर्वात आव्हानात्मक प्रदेशात नियमितपणे होतात असतात, जसे की हिमालय आणि ईशान्येकडील प्रदेशांपासून ते दाट लोकवस्ती असलेले शहरी भाग, वाळवंटी प्रदेश आणि किनारी पट्ट्यांपर्यंत. या परिस्थितीत अनेकदा खराब दृश्यमानता, अस्थिर हवामान आणि लँडिंगसाठी मर्यादित जागा यांचा समावेश असतो, ज्यामुळे ‘कंट्रोल्ड फ्लाईट इनटू टेरेन’ (CFIT) हा कार्यात्मक धोका कायम असतो.

Hensoldt ने म्हटले आहे की, “उड्डाण मार्गातील किंवा मार्गाजवळील अडथळे, जसे की- केबल्स, खांब आणि टॉवर्स, हेलिकॉप्टर्ससाठी अनेकदा मोठा धोका निर्माण करतात. आमची प्रणाली पायलटचा कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि विशेषतः प्रतिकूल दृश्य परिस्थितीत मिशनची सुरक्षितता वाढवण्यासाठी स्मार्ट व्हिज्युअल संकेत प्रदान करते.”

जिथे पायलटची दृश्यमानता अपुरी असते, तिथे ही प्रणाली OAS सेन्सर्स आणि ऑनबोर्ड डेटाबेसकडून रिअल-टाईम डेटा गोळा करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी प्रगत सॉफ्टवेअरचा वापर करते. हे सॉफ्टवेअर सुधारित परिस्थितीविषयक जागरूकता देणाऱ्या व्हिज्युअल इंटरफेसमध्ये माहिती सादर करते.

रिअल-टाईम भूभागाच्या जागरूकतेसाठी LiDAR-आधारित तंत्रज्ञान

Hensoldt कंपनीची प्रणाली, तिचे SferiSense फायबर-स्कॅनर LiDAR, उच्च-गतीचा Degraded Visual Environment (DVE) प्रोसेसर आणि सिंथेटिक-व्हिजन अल्गोरिदम्स यांना एकत्र करून, कार्यरत वातावरणाचे स्थिर त्रि-आयामी चित्र तयार करते. ही प्रणाली, धुक्यात, बर्फाळ प्रदेशात, वाळूच्या वादळात आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या मोहिमांमध्ये उच्च-धोक्याच्या कार्यांसाठी महत्वाची आहे, जी एका सेकंदापेक्षाही कमी वेळेतील अलर्टसह, एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील केबल्स, डोंगरकड्याची रेषा आणि इतर सूक्ष्म-अडथळे शोधू शकते.

LiDAR तंत्रज्ञान पारंपरिक रडार प्रणालींपेक्षा खूप जास्त अचूकता प्रदान करते, विशेषत: अशा धोक्यांच्या बाबतीत जिथे, रडारलाही अडचणी उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, उड्डाण मार्गाला समांतर असलेल्या केबल्स. ही प्रणाली जॅमिंगला रोखण्यासाठी आणि उत्कृष्ट कोनीय ट्रॅकिंग क्षमता दर्शवण्यासाठी डिझाईन केली आहे.

या प्रणालीची रचना, मॉड्यूलर, स्केलेबल आणि सेन्सर-निरपेक्ष आहे, जी FACE आणि JCA मानकांचे पालन करते आणि सध्याच्या आणि भविष्यातील भारतीय लष्करी हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्ममध्ये, मानवयुक्त आणि मानवरहित, एकत्रीकरण करण्यास सक्षम करते.

सखोल तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सार्वभौम क्षमता

पारंपरिक खरेदीदार-पुरवठादार व्यवस्थेच्या विपरीत, HAL–Hensoldt करारामध्ये सखोल तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट आहे. यामुळे HAL ला देशांतर्गत स्तरावर OAS चे उत्पादन, एकत्रीकरण आणि समर्थन करणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, HAL कडे OAS-सुसज्ज प्रणालींसाठी निर्यात अधिकार कायम राहतील, ज्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्म अधिक स्पर्धात्मक बनविण्यात मदत होईल.

ही भागीदारी, महत्त्वाच्या सुरक्षा प्रणालींसाठी परदेशी पुरवठादारांवरील दीर्घकालीन अवलंबित्व कमी करते, लष्करी एव्हिओनिक्समध्ये सार्वभौम क्षमतेकडे संरचनात्मक बदल दर्शवते आणि भारताची एरोस्पेस संशोधन आणि उत्पादन परिसंस्था मजबूत करते.

भारतासाठी निर्यातीची संधी

कठोर तैनाती वातावरण, वाढलेली लष्करी विमान वाहतूक आणि CFIT घटनांना प्रतिबंध करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्यामुळे, प्रगत हेलिकॉप्टर सुरक्षा संचांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती मागणी प्राप्त झाली आहे, आणि याचवेळी ही योजना पुढे आली आहे. या प्रणालीमुळे भारताच्या संरक्षण निर्यातीच्या महत्त्वाकांक्षेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, ज्याद्वारे 2029 पर्यंत 50,000 कोटी रुपयांचे लक्ष्य साधण्याचे उद्दिष्ट आहे.

एकदा प्रमाणित झाल्यावर, नवीन OAS (अडथळा निवारण प्रणाली) हळूहळू भारताच्या स्वदेशी हेलिकॉप्टर ताफ्यामध्ये समाकलित केली जाईल. HAL अभियंत्यांनी सांगितले की, “या प्रणालीची लवचिक रचना भविष्यात अतिरिक्त सेन्सर्स, अपग्रेड केलेली संगणकीय क्षमता आणि विकसित होणारे मिशन पॅकेजेस समाविष्ट करण्याची परवानगी देईल, ज्यामुळे भारतीय हेलिकॉप्टर जागतिक विमान वाहतूक सुरक्षा अपेक्षांशी सुसंगत राहतील.”

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleRussia Courts India with Su-57 Co-Production Pitch at Dubai Airshow 2025
Next articleतालिबानचे व्यापार मंत्री दिल्ली दौऱ्यावर; व्यापार आणि कनेक्टिव्हिटीवर भर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here