उत्तर गाझामधील जबालिया येथील संघर्षात आपल्या लढाऊ सैनिकांनी इस्रायली सैनिकांना पकडल्याचा दावा हमासच्या सैन्य शाखेच्या प्रवक्त्याने रविवारी केला. इस्रायली सैन्याने मात्र हा दावा नाकारला आहे.
हमासच्या प्रवक्त्याने नेमके किती सैनिकांना पकडले याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याशिवाय या दाव्यासाठी कोणताही पुरावा सादर केलेला नाही.
अल जझीराने रविवारी पहाटे अल-कासम ब्रिगेडचा प्रवक्ता अबू उबैदाचा एक ध्वनिमुद्रित संदेश प्रसारित केला. “आमच्या लढाऊ सैनिकांनी झायोनिस्ट सैन्यावर बोगद्याच्या आत घुसून हल्ला केला. सैन्यातील सर्व मृत, जखमी सैनिकांना ताब्यात घेतल्यानंतर लढवय्यांनी माघार घेतली,” असे या संदेशात म्हटले आहे.
इस्रायली सैन्याने रविवारी हमासच्या सशस्त्र शाखेचा हा दावा फेटाळून लावला.
लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, “आयडीएफ (इस्रायली संरक्षण दल) हे स्पष्ट करते की एका सैनिकाचे अपहरण झाल्याची कोणतीही घटना घडलेली नाही.”
हमासने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये रक्ताने माखलेल्या व्यक्तीला बोगद्यात जमिनीवरून फरफटत घेऊन जात असल्याचे आणि आजूबाजूला रायफलचे फोटो दिसत होते. रॉयटर्सला मात्र या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या व्यक्तीची ओळख तसेच त्याच्या किंवा तिच्या सद्यस्थितीची पडताळणी करता आलेली नाही.
मध्यस्थीद्वारे गाझा युद्धबंदी संदर्भातील वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याच्या शक्यता शनिवारी वाढल्यानंतर अवघ्या काही तासांनी अबू उबैदाने हा दावा केला.
इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी सीआयएचे प्रमुख आणि कतारच्या पंतप्रधानांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर पुढील आठवड्यात चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
आपले नाव किंवा राष्ट्रीयत्व गुप्त ठेवण्याच्या अटीवर या सूत्राने सांगितले की, “येत्या आठवड्यात मध्यस्थ, इजिप्त आणि कतार यांच्या नेतृत्वाखालील नवीन प्रस्तावांच्या आधारे आणि अमेरिकेच्या सक्रिय सहभागासह वाटाघाटी सुरू होतील” असा निर्णय घेण्यात आला आहे.
कैरोमध्ये मंगळवारी चर्चा पुन्हा सुरू होईल, या इस्रायली माध्यमांच्या बातम्यांचे खंडन करत हमासचा एक अधिकारी म्हणाला की यासाठी अद्याप”कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही.”
गाझामध्ये सात महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर, मध्यस्थांनी युद्धबंदी व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांची सुटका करून युद्ध संपवण्याची मागणी इस्रायलने तर इस्रायलमधील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याची मागणी हमासने केली आहे.
आराधना जोशी
(रॉयटर्स)