अवामी लीगला निवडणुकीतून वगळल्यानंतर, हसीना यांचा बहिष्काराचा इशारा

0

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना, यांनी नवी दिल्लीत दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “अवामी लीग पक्षाला निवडणुकीत भाग घेण्यास मनाई केल्यामुळे, पुढील वर्षी होणाऱ्या बांगलादेशच्या राष्ट्रीय निवडणुकीत लाखो समर्थक मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकतील.”

हसीना (78) म्हणाल्या की, “त्यांच्या पक्षाला वगळून झालेल्या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या कोणत्याही सरकारच्या अंतर्गत त्या बांगलादेशात परतणार नाहीत.” त्या भारतातच राहण्याची योजना आखत आहेत, जिथे ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एका प्राणघातक उठावानंतर, त्यांनी पलायन केले होते.

हसीना यांच्या हकालपट्टीनंतर, नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने. बांगलादेशातील राज्यकारभार सांभाळला असून, पुढील फेब्रुवारीमध्ये निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे.

हसीना यांनी रॉयटर्सला ईमेलद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “अवामी लीगवर घालण्यात आलेली बंदी केवळ अन्यायकारक नाही, तर त्यांना पराभूत करणारी आहे. बांगलादेशी राजकारणात सलग 15 वर्षांच्या कारकिर्दीनंतर आणि सत्तेवरून नाट्यमयरित्या पदच्युत झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमात निवेदन दिले आहे.

त्या म्हणाल्या की, “पुढील सरकारने निवडणूक वैधता लक्षात घेतली पाहिजे. बांगलादेशातील लाखो लोक अवामी लीगला पाठिंबा देतात, म्हणून सद्य परिस्थितीत ते मतदान करणार नाहीत. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने कार्यक्षम सरकार हवे असेल, तर तुम्ही लाखो लोकांना मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही.”

अवामी लीगला निवडणूक लढवण्याची परवानगी मिळेल, हसीना यांना आशा

बांगलादेशात 126 मिलियनहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. अवामी लीग  आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांनी दीर्घकाळ देशाच्या राजकारणात वर्चस्व गाजवले असून, आगामी निवडणुकीत बीएनपी जिंकेल अशी व्यापक अपेक्षा आहे.

निवडणूक आयोगाने, मे महिन्यात अवामी लीगची नोंदणी रद्द केली. यापूर्वी, युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि अवामी लीगच्या वरिष्ठ नेत्यांविरुद्ध, युद्ध गुन्हेगारी चौकशीचे कारण देत पक्षाच्या सर्व कारवायांवर बंदी घातली होती.

“आम्ही अवामी लीगच्या मतदारांना इतर पक्षांना पाठिंबा देण्यास सांगत नाहीयोत, कारण आम्हाला अजूनही आशा आहे की, अखेर सत्याचा विजय होईल आणि आम्हाला स्वतःला निवडणूक लढवण्याची परवानगी मिळेल,” असे हसीना म्हणाल्या. 

अवामी लीगला निवडणुकीत सहभागी होण्याची परवानगी मिळावी, यासाठी त्या स्वतः किंवा त्यांच्या वतीने इतर कोणी बांगलादेशी अधिकाऱ्यांशी ‘बॅक-चॅनेल’ (गुप्त) चर्चा करत आहेत की नाही, याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही.

युनूस यांच्या प्रवक्त्यांनी, प्रतिक्रियेसाठी केलेल्या विनंत्यांना त्वरित प्रतिसाद दिला नाही.

बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवण्याचे श्रेय मिळालेल्या, मात्र मानवाधिकार उल्लंघनाचे आणि असंतोष दडपल्याचे आरोप असलेल्या हसीना यांनी, 2024 मध्ये सलग चौथी टर्म जिंकली होती. ही निवडणूकीची फेरी, मुख्य विरोधी पक्षांनी बहिष्कृत केली होती, ज्यांचे शीर्ष नेते एकतर तुरुंगात होते किंवा देशातून पलायन केलेले होते.

हसीना यांच्यावर युद्ध गुन्हेगारीचे आरोप

इंटरनॅशनल क्राइम्स ट्रायब्युनल, जे बांगलादेशचे देशांतर्गत युद्ध गुन्हेगारी न्यायालय आहे, त्यांनी हसीना यांच्यावरील खटल्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. 2024 च्या मध्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर हिंसक कारवाई केल्याबद्दल, त्यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान झालेल्या आंदोलनात, सुमारे 1,400 लोक मारले गेल्याचा आणि हजारो लोक जखमी झाल्याचा अंदाज आहे, ज्यातील बहुतेकजण सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले होते, 1971 च्या स्वातंत्र्य युद्धानंतर बांगलादेशमधील . हा सर्वात मोठा हिंसाचार होता.

सरकारी अभियोक्त्यांचा असाही आरोप आहे की, सुरक्षा यंत्रणांद्वारे चालवल्या जाणाऱ्या गुप्त अटक केंद्रांमध्ये, विरोधी कार्यकर्त्यांना सक्तीने गायब करणे आणि त्यांचा छळ करणे, यावर त्यांनी देखरेख ठेवली होती.

या प्रकरणाचा निकाल 13 नोव्हेंबर रोजी येणे अपेक्षित आहे.

हसीना यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, त्या म्हणाल्या की: “प्राणघातक बळाचा वापर करणे किंवा इतर कथित गुन्ह्यांमध्ये त्यांचा वैयक्तिक सहभाग नव्हता.”

“ही कार्यवाही राजकीय हेतूने प्रेरित केलेले एक नाटक आहे,” असे त्या म्हणाल्या. “ते कंगारू कोर्टांनी (नियमांशिवाय चालणारे न्यायालय) हे आरोप लावले आहेत, ज्यात मला दोषी करार देण्याचे आधीच निश्चित केले आहे. मला बहुतेकदा पूर्वसूचना याबाबत देण्यात आलेली नाही, आणि स्वतःचा बचाव करण्याची संधी नाकारण्यात आली आहे.”

मायदेशी परतण्याची विचार नाही

राजकीय मतभेद असूनही, हसीना म्हणाल्या की: अखेरीस अवामी लीग बांगलादेशच्या भविष्यात आपले स्थान पक्के करेल, मग ते सरकारमध्ये राहून असेल किंवा विरोधी पक्षात राहून, त्यांच्या कुटुंबाला त्याचे नेतृत्व करण्याची गरज नाही.

त्यांचे पुत्र आणि सल्लागार साजीब वाजेद, जे वॉशिंग्टनमध्ये राहतात, त्यांनी रॉयटर्सला गेल्यावर्षी सांगितले होते की, “विचारणा झाल्यास ते पक्षाचे नेतृत्व करण्याचा विचार करू शकतात.”

“हे खरे तर माझ्याबद्दल किंवा माझ्या कुटुंबाबद्दल नाही,” असे हसीना म्हणाल्या. “आपल्या सर्वांना हवे असलेले भविष्य साध्य करण्यासाठी, बांगलादेशला संवैधानिक शासन आणि राजकीय स्थिरता परत आणणे गरजेचे पाहिजे. कोणताही एक व्यक्ती किंवा कुटुंब आपल्या देशाचे भविष्य निश्चित करत नाही.”

हसीना म्हणाल्या की, “ज्यांच्या वडिलांना आणि तीन भावांना 1975 मध्ये झालेल्या लष्करी बंडादरम्यान ठार मारण्यात आले होते, जेव्हा त्या आणि त्यांच्या बहिणी परदेशात होत्या, त्या दिल्लीत मुक्तपणे राहत आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबाच्या हिंसक इतिहासामुळे त्या आजही सावधगिरी बाळगतात.”

काही महिन्यांपूर्वी, रॉयटर्सच्या एका बातमीदाराने हसीना यांना दिल्लीतील ऐतिहासिक लोधी गार्डनमधून शांतपणे फिरताना पाहिले होते, त्यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असल्याचे दिसत होते. काही लोकांनी त्यांना ओळखले, तेव्हा त्यांनीही मान हलवून त्यांना प्रतिसाद दिला.

“मला नक्कीच मायदेशी परत जायला आवडेल, पण जर तेथील सरकार वैध असेल, तिथे घटनेचे पालन होत असेल आणि तिथे कायदा व सुव्यवस्था खरोखरच प्रस्थापित असेल तर मी जाईन,” असे त्या म्हणाल्या.

हसीना यांच्या निर्गमनामुळे, बांगलादेशात अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून हिंसाचार सूरू झाला, जो कालांतराने शांत झाला. तथापि, तथापि, या महिन्याच्या सुरुवातीला राज्य सुधारणांच्या सनदेवर स्वाक्षरी करताना पुन्हा संघर्ष उसळला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनचा ‘डिजिटल सिल्क रोड’ आपली जागतिक पकड मजबूत करत आहे
Next articleम्यानमारमधून थायलंडला पळून गेलेले 500 भारतीय लवकरच मायदेशी येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here