अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, सध्या ते आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग प्रतिनिधींमार्फत एकमेकांशी संवाद साधत आहेत. यामुळे दोघांमधील संबंध दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प कंझर्वेटिव्ह टॉक शो होस्ट- ह्यू हेविट यांच्यासोबत सुरु असलेल्या एका मुलाखतीत बोलत होते.
येत्या 20 जानेवारीला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारे ट्रम्प यांनी कार्यक्रमादरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे एक शक्तिशाली आणि धोरणात्मक नेता म्हणून कौतुक केले. शी यांना चीनमध्ये अत्यंत आदर दिला जातो, असेही ते यावेळी म्हणाले. ‘मला वाटते की, आमच्यामध्ये सुरु असलेला हा संवाद, चीन व अमेरिका या दोन्ही देशांतील तसेच आमच्यांतील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी फायदेशीर ठरु शकतील’, असे ट्रम्प यावेळी म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले की, “परंतु असे असले तरीही ते इतके सोपे नाही. हे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होणे आवश्यक आहे”. “चीन अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या ‘कमकुवत’ करण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या टिप्पणीला “महत्वाची बाब” म्हणत, चीनने त्याला मान्यता दिली, असे त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
“चीन-अमेरिका आर्थिक आणि व्यापार संबंधांच्या स्थिर, निरोगी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यास चीन इच्छुक आहे”, असे त्यांचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी, दोन्ही देशातील परस्पर आदर आणि विजय सहकार्याचा हवाला देत म्हटले.
गुओ यांनी त्यांच्या प्रतिनिधींमार्फत होणाऱ्या कोणत्याही संवादाची पुष्टी केली नाही, मात्र असे आवर्जून सांगितले की, चीन आणि अमेरिका विविध मार्गांनी संवाद साधत आहेत.
ट्रम्प यांचे शी जिनपिंग यांना निमंत्रण
ट्रम्प यांनी शी जिनपिंग आणि इतर परदेशी नेत्यांना, या महिन्याच्या शेवटी वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. परंतु यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘चीनी नेते या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.’
ट्रम्प यांनी त्यांच्या नव्या सरकरामधील प्रमुख पदांवर, चीनविरोधी धोरण असलेल्या अनेक सदस्यांची नियुक्ती केली आहे, ज्यात सेनेटर मार्को रुबिओ राज्य सचिव असणार आहेत.
ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, ‘जर बीजिंगने अत्यंत व्यसनाधीन असा अंमली पदार्थ- फेंटॅनाइलची तस्करी रोखण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न केले नाहीत, तर ते चीनवर अतिरिक्त १०% शुल्क लागू करतील.’
प्रचार मोहिमेदरम्यान, ट्रम्प चीनवर ६०% पेक्षा अधिक शुल्क लागू करण्याची धमकी दिली होती.
नोव्हेंबरच्या उत्तरार्धात, चीनच्या राज्य माध्यमांनी ट्रम्प यांना चेतावी दिली की, फेंटॅनाइलच्या व्यापारावर अतिरिक्त शुल्क लावण्याच्या त्यांच्या हट्टामुळे, विनाकारण दोन महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये टॅरिफ युद्धात ओढवू शकते.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)