ग्रीस आणि बाल्कनमध्ये उष्णतेची लाट; कामकाज, पर्यटन विस्कळीत

0
मंगळवारी ग्रीस आणि बाल्कनच्या बऱ्याच भागात उष्णतेची तिसरी लाट आली, ज्यामुळे अधिकाऱ्यांना बाहेरील कामकाज थांबवावे लागले, पर्यटकांचा पर्यटनस्थळांवरील प्रवेश प्रतिबंधित करावा लागला. याशिवाय कोरड्या भूप्रदेशात पसरत चाललेल्या वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक दलाला तैनात करावे लागले.

कामगार मंत्रालयाने सांगितले की, अथेन्स आणि इतर प्रदेशांमधील कुरियर, फूड डिलिव्हरी रायडर्स आणि बांधकाम व्यावसायिकांना दुपारपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते, कारण तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत (109.4 फॅरनहाइट) वाढण्याची शक्यता होती.

दक्षिण ग्रीसमधील करिंथमधील फेनेओ परिसरात, 185 अग्निशमन कर्मचारी 50 वाहनांसह 15 विमाने आणि 11 हेलिकॉप्टरच्या मदतीने जंगलातील भीषण आग विझवत होते.

आग भडकताच सावधगिरीचा उपाय म्हणून तेथील दोन गावे रिकामी करण्यात आली आहेत. पेलोपोनीज प्रदेशाचे गव्हर्नर दिमित्रीस प्टोचोस यांच्या मते, एकूण परिस्थिती कठीण असल्याचे स्थानिक वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

ग्रीस दीर्घकाळापासून उष्ण, स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी पर्यटकांना ग्रीसचे आकर्षण वाटते. परंतु हवामान बदलामुळे उष्णतेच्या लांब आणि अधिक तीव्र लाटा, तसेच विनाशकारी पूर तसेच जंगलांमध्ये वणवे लागणे असे प्रकार बघायला मिळत आहेत.

अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे की मंगळवारी आणि बुधवारी दुपारपासून पाच तासांसाठी अथेन्सच्या वरच्या एका खडकाळ टेकडीवर ग्रीसमधील सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटन स्थळ, प्राचीन ॲक्रोपोलिसचे अवशेष असणारे ठिकाण बंद करणार आहेत.

न्यू ऑर्लिन्समधील 18 वर्षीय पर्यटक मॅथ्यू एनोस म्हणाला की तो राजधानीत आला तेव्हा अशा उष्णतेच्या लाटेच्या माऱ्यासाठी आपली अजिबात तयारी नव्हती.

“आतापर्यंत हा सगळा प्रकार कठीण आहे असे अजिबात नाही. ही आतापर्यंतची सर्वात मोठी समस्या देखील नाही “, असे तो म्हणाला. “म्हणून मी भरपूर पाणी पित आहे जेणेकरून परिस्थितीशी जुळवून घेता येईल.”

कोरड्या तलावाच्या तळाशी असलेल्या गवतावर गायी चरतात

पर्यटकांनी युरोपमधील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या राजधान्यांपैकी एक असलेल्या अथेन्समध्ये वातानुकूलित उपहारगृहे आणि दुकाने शोधली आहेत, जी डोंगरांनी वेढलेल्या मैदानी भागात तयार केली जातात. उष्णतेची लाट रविवारपर्यंत कायम राहील, असे ग्रीक हवामानशास्त्र सेवेने सांगितले.

शेजारच्या बल्गेरियामध्येही उष्णतेची लाट उसळली आहे. अधिकाऱ्यांनी व्यवसायिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उष्णतेच्या लाटेमध्ये पाणी देण्याचे आणि शारीरिक कष्ट कमी करवून घेण्याचे आवाहन केले.

कोसोवो आणि अल्बेनियाच्या सीमेवर, अनेक आठवडे पाऊस न पडल्याने आणि वीजेच्या वाढत्या उत्पादनामुळे फिएर्झा सरोवर जवळजवळ रिकामे झाले. पूर्वी पाणी असलेल्या आणि आता कोरड्या पडलेल्या या तलावाच्या तळाशी असलेले गवत गायींनी खायला सुरुवात केली आहे.

कोसोवोमध्ये, मंगळवारी दुब्रावा परिसरातील एका गावातील तुरुंग आणि लष्करी तळाजवळील घरांकडे ज्वाला आणि दाट धुराचे लोट दिसले. झुडुपे आणि गवताळ परिसर असलेल्या या भागात जोरदार वाऱ्यामुळे आग नियंत्रणाबाहेर गेली.

कोसोवोमध्ये इतरत्र, प्रिझ्रेन येथील 62 वर्षीय शेतकरी मिलाझिम दुराक यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात विक्रीसाठी पिवळी मिरची खुडताना तरुण कामगारांना आश्रय मागितल्याबद्दल फटकारले.

“त्या तरुणांना उष्णता जराही सहन होत नाही. ते संध्याकाळी किंवा सकाळी फक्त काही मिनिटे काम करतात,” असे ते म्हणाले.

अल्बेनियामध्ये, इटली आणि ग्रीसच्या चार विमानांच्या मदतीने अग्निशमन दलाने उत्तरेकडील आणि नैऋत्येकडील डुकाट गावाजवळील राष्ट्रीय उद्यानात दोन वणवे विझवण्यात यश मिळवले.

पश्चिम युरोपमधील परिस्थिती गंभीर

गेल्या महिन्यात, पश्चिम युरोपच्या मोठ्या भागात आणखी एक तीव्र उष्णतेची लाट आली ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला, जंगलात वणवे पेटले आणि संपूर्ण प्रदेशात आरोग्यविषयक सूचना जारी करण्यात आल्या.

इटलीमध्ये गेल्या महिन्यात उष्णतेच्या लाटेमुळे फ्लोरेन्स आणि मिलानसह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. उच्च तापमानामुळे जूनमध्ये वीजेच्या वर्षानुवर्षे असणाऱ्या मागणीत 7.4 टक्क्यांची  वाढ झाली, असे राष्ट्रीय पॉवर ग्रिड ऑपरेटर टेर्ना यांनी मंगळवारी सांगितले.

जगभरात, 2024 हे सर्वात उष्ण वर्ष होते, ज्यामध्ये पहिल्यांदाच औद्योगिक-पूर्व युगापेक्षा 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होते.

गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की जुलै 2024 पासून आगीमुळे झाडेझुडपे नष्ट झाल्यामुळे अथेन्सच्या आसपासच्या मातीच्या पृष्ठभागाचे तापमान काही ठिकाणी 10 अंश सेल्सिअसने वाढले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपाच आठवड्यांनतर अखेर British F-35B जेटचे केरळमधून उड्डाण
Next articleबांगलादेश विमान अपघात: मृतांची संख्या 31 वर, विद्यार्थ्यांकडून निदर्शने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here