सैन्याच्या हेलिकॉप्टर्सना आतापर्यंत आपण वेगवेगळ्या भूमिका बजावताना बघितले आहे. 1 जूनचा सूर्य मावळत असताना आणि शेवटचे मतदार मतदान करून घरी परतत असताना, भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) हेलिकॉप्टरच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांनी मतदान साहित्य आणि दुर्गम ठिकाणी कर्तव्यावर असणारे निवडणूक कर्मचारी परत आणण्याचे त्यांचे काम सुरू केले. 1 जूनला झालेल्या अंतिम टप्प्यातील मतदानाने जागतिक स्तरावर आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या निवडणुकांचा शेवट झाला. जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांमध्ये अनेक सहाय्यकांपैकी एक असलेल्या पण अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडत लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) हेलिकॉप्टर ताफ्यातील पुरुष आणि महिला वैमानिकांनी आणखी एक मानाचा तुरा खोवला.
कुठल्याही ठिकाणी पोहोचण्याची या हेलिकॉप्टर्सची क्षमता अद्वितीय आहे. विशेषतः जिथे इतरांनी जाण्याचे धाडसही केले नसेल आणि जिथे इतर कोणतेही वाहन पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणी अत्यंत वेगाने या हेलिकॉप्टर्सनी आपली सेवा बजावली.
या संपूर्ण मोहीमेला काटेकोर कालमर्यादा होती, कारण मतदान अधिकाऱ्यांना दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान तारखेच्या दोन दिवस आधी पोहचवणे आणि मतदानाच्या दिवशी संपूर्ण प्रक्रिया संपल्यावर लगेचच त्यांना तिथून पुन्हा निश्चित वेळेत माघारी आणणे बंधनकारक होते.
या निवडणुकांच्या हंगामात हवाई दल, लष्कर आणि बीएसएफच्या हेलिकॉप्टर्सनी 1 हजार तासांपेक्षा अधिक काळासाठी एकंदर 1 हजार 750 उड्डाणे करत मतदान अधिकारी तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देशाच्या काही अत्यंत दुर्गम भागांमध्ये पोहोचवली. यासाठी आपल्या हवाई दलाच्या मध्यम उंचीवर उड्डाण करणारी रशियन बनावटीची एमआय – 17 व्हेरिएंट हेलिकॉप्टर्स, हलक्या वजनाच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी चेतकसारखी हेलिकॉप्टर्स आणि स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक हलक्या वजनाच्या वाहतुकीसाठीची ध्रुव हेलिकॉप्टर्स (Advanced Light Helicopters – ALH) यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला.
अनेकदा लोक केवळ मतदार संख्येच्या दृष्टीने निवडणुकांचा विचार करतात, पण निवडणूक यशस्वीपणे पार पडण्यासाठी पडद्यामागून ज्या अनेक उपक्रमांची अंमलबजावणी होते त्याची जाणीव फारच कमी लोकांना असते. कायद्यानुसार, कोणताही मतदार मतदान केंद्रापासून 2 किमीपेक्षा जास्त अंतरावर नसावा. म्हणजे चालत तो केवळ 15 मिनिटांमध्ये मतदान केंद्रावर पोहोचला पाहिजे. मात्र भारतात अशी अनेक मतदान केंद्रे आहेत जिथे केवळ हेलिकॉप्टरद्वारेच प्रभावीपणे पोहोचता येते. याशिवाय अशीही मतदान केंद्रे आहेत ज्यांच्या यादीत केवळ एकच मतदार आहे.
केवळ भारतातच नव्हे तर परदेशात देखील आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्यांसाठी ही हेलिकॉप्टर्स म्हणजे मोठा दिलासा असतात. उंच हिमालयातील आजारी सैनिक असो किंवा कन्याकुमारीमध्ये पुरामुळे अडकलेले लोक, रोटरचा आवाजच त्यांच्यात दिलासा आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. सर्वात वाईट आपत्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या या हेलिकॉप्टर्सचा वापर याआधीच्याही निवडणुकांमध्ये करण्यात आला आहे. ही हेलिकॉप्टर्स आता निवडणूक प्रक्रियेचा एक अतूट भाग बनली आहेत. निवडणूक ही एक अशी प्रक्रिया असते जिथे प्रत्येक मतदाराला सेवा पुरवणे बंधनकारक असते.
भारतीय हवाई दलाच्या या हेलिकॉप्टर युनिटचे ब्रीदवाक्य या मशीन्सवर काम करणाऱ्या पुरुष आणि स्त्री वैमानिकांच्या समर्पणाचा सारांश म्हणता येईल : “आम्ही नित्यक्रमानुसार कठीण कामगिऱ्या पार पाडतो, अशक्य काम शक्य होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो.” आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळेच आतापर्यंतच्या अनेक कामगिऱ्या पार पडल्या आहेत हे मात्र नक्की!
ध्रुव यादव
(पीआयबीच्या इनपुट्ससह)