हाँगकाँगमधील भीषण आग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून 13 जणांना अटक

0
हाँगकाँगमधील

हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी, शहरात झालेल्या गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण आग दुर्घटनेप्रकरणी, संशयास्पद मनुष्यवधाच्या आरोपाखाली 13 जणांना अटक केली आहे, ज्यात किमान 151 लोकांचा बळी गेला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, निकृष्ट दर्जाच्या नूतनीकरण सामग्रीमुळे आग भडकली असण्याची शक्यता आहे. गेल्या बुधवारी वँग फुक कोर्ट इस्टेटमधील सात टॉवर्स आगीच्या ज्वाळांनी वेढले होते.

पोलिसांनी या दुर्घटनाग्रस्त इमारतींमध्ये अजूनही शोधमोहीम सुरू ठेवली आहे, जिथे अनेक पीडित जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जिन्यांमध्ये आणि छतावर अडकून पडल्याचे आढळून आले. अद्याप 40 हून अधिक लोक बेपत्ता आहेत, पोलीस अधिकारी सुंग शुक यिन यांनी सांगितले की, काही मृतदेहांची अक्षरश: राख झाली आहे, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे.

आग पसरण्यास असुरक्षित सामग्री जबाबदार

इमारतीच्या तूनीकरणादरम्यान, बांबूच्या परातीला गुंडाळण्यासाठी वापरल्या गेलेल्या हिरव्या जाळीच्या नमुन्यांची तपासणी केली असता असे निदर्शनास आले की, ती सामग्री अग्निरोधक मानकांवर खरी उतरली नव्हती. मुख्य सचिव एरिक चॅन म्हणाले की, कंत्राटदारांनी ही असुरक्षित सामग्री पोहोचण्यास कठीण असलेल्या भागांमध्ये लपवून ठेवली होती, ज्यामुळे तपासणी करणाऱ्यांना हा धोका तात्काळ ओळखता आला नाही.

निरीक्षकांना असेही आढळून आले की, “फोम इन्सुलेशनमुळे आग अधिक वेगाने पसरली, तर संकुलातील फायर अलार्म देखील व्यवस्थित काम करत नव्हते, त्यामुळे अधिक नुकसान झाले. दरम्यान, हजारो रहिवाशांना विस्थापित करण्यात आले असून, 1,100 हून अधिक लोकांना तात्पुरत्या निवासस्थानात हलवण्यात आले आहे, तसेच अन्य 680 लोक युथ हॉस्टेल आणि हॉटेल्समध्ये थांबले आहेत.

अधिकाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला HK$10,000 (1,284 डॉलर्स) इतका आपत्कालीन निधी जाहीर केला आहे, तसेच आपत्तीदरम्यान गमावलेली ओळखपत्रे, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे पुनर्प्राप्त करण्यासाठी सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.

सार्वजनिक शोक आणि वाढता रोष

पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो लोक एकत्र जमले होते. पीडितांमध्ये किमान नऊ इंडोनेशियन घरगुती कामगार आणि एका फिलीपिन्सच्या नागरिकाचा समावेश होता. शहर एकत्र येऊन शोक व्यक्त करत असताना, जवळच्या कालव्यालगत शोककर्त्यांची एक किलोमीटरहून मोठी रांग पाहायला मिळाली. टोकियो, लंडन आणि तैपेई येथेही श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

नूतनीकरणाच्या कामाशी संबंधित आगीच्या धोक्यांबद्दल रहिवाशांनी यापूर्वीच अधिकाऱ्यांना सावध केले होते, असे अहवाल समोर आल्यामुळे जनाक्रोष अधिक वाढला आहे. रहिवाशांनी ज्वलनशील कामचलाऊ बांधकाम सामग्रीबद्दल तक्रार केली असूनही, अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी रहिवाशांना ग्वाही दिली होती, की इमारतींना ‘आगीचा धोका तुलनेने कमी’ आहे.

राजकीय तणाव आणि कठोर कारवाईचा इशारा

हाँगकाँगमधील विधानपरिषद निवडणुकीपूर्वी, घडलेल्या या शोकांतिकेने नवीन राजकीय तणाव निर्माण केला आहे. संभाव्य भ्रष्टाचार आणि बांधकाम देखरेखीतील अपयशांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत सामील असलेल्या किमान एका व्यक्तीला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.

‘विद्रोही हेतू’ प्रकरणी आणखी दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा कार्यालयाने या आपत्तीचा वापर अशांतता भडकावण्यासाठी करु नये, असा इशारा दिला आहे, आणि ‘आपत्तीच्या घटनेचा फायदा करून घेत, हाँगकाँगमध्ये अराजकता पसरवू नये, असा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शासन केले जाईल,’ अशी घोषणाही केली आहे.

ही आग दुर्घना, 1948 मध्ये एका गोदामात लागलेल्या आगीनंतरची, सर्वात मोठी दुर्घटना आहे, ज्यात त्यावेळी 176 लोक दगावले होते. नुकत्याच झालेल्या या प्रकरणामुळे शहर हादरले आहे आणि लोक सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndian Army Executes Long-Range Combat Mission of BrahMos Missile
Next articleलष्कराद्वारे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लांब पल्ल्याची लढाऊ चाचणी यशस्वीरित्या पूर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here