गाझामधील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामावर अजूनही तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे हुती बंडखोरांचा लाल समुद्रातील धुमाकूळ तिथून प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. अलिकडेच हुती बंडखोरांनी तेलाच्या टँकरचे नुकसान केल्याचा आणि लाल समुद्रात अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय दैनिकांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
ब्रिटिश तेल टँकर अँड्रोमेटा स्टारवर क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी हुती बंडखोरांनी स्वीकारली असल्याचे त्याचा लष्करी प्रवक्ता याह्या सारी याने सांगितले आहे. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जहाजाचे किरकोळ नुकसान झाले असले तरी त्याचा प्रवास सुरू आहे.
सारीने अमेरिकन लष्कराचे एमक्यू-9 रीपर ड्रोन पाडल्याचेही सांगितले आहे. तो म्हणाला की येमेनच्या हवाई हद्दीतून हे ड्रोन पाडण्यात आले. अमेरिकेच्या लष्कराकडून अद्याप या घटनेची पुष्टी करण्यात आलेली नसली तरी सीबीएस न्यूजने येमेनमध्ये ड्रोन कोसळल्याचे वृत्त खरे असल्याचे म्हटले आहे.
सध्याचे समुद्री हल्ल्यांचे प्रकार हे यापूर्वीच्या चाचेगिरीसारखे नसून त्यास इस्रायल-हमास युद्धाचा संदर्भ आहे. गाझामध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून हुतींनी अमेरिकन ड्रोन पाडल्याचा दावा करण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये अशाच घटना घडल्या होत्या.
हुती हल्ल्यांमुळे केवळ जागतिक व्यापारच नाही तर इस्रायलच्या इलियट बंदरातील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पॅलेस्टिनींच्या एकजुटीसाठी हुती बंडखोर इस्रायल आणि त्याच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांना लक्ष्य करत आले आहेत. त्यांनी सुरुवातीला बाब-अल-मांडेझ सामुद्रधुनीतील इस्रायलशी संबंधित जहाजांना लक्ष्य केले होते.
अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्यानं डिसेंबरमध्ये हुती बंडखोरांच्या तब्बल 12 ठिकाणांवर जोरदार हल्ला केला होता. या संयुक्त मोहिमेत हुती बंडखोरांचे प्रचंड नुकसानही झाले होते. या मोहिमेत हुतींच्या 12 ठिकाणांवर टॉमहॉक क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानांमधून हल्ला केल्याची माहिती त्यावेळी अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली होती. त्यावेळी हुती बंडखोरांच्या शस्त्र साठ्यांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले होते.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)