आता हुथी सैन्याचे इस्रायलवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले

0
आता
हौथी समर्थकांनी गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनी आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाहला पाठिंबा दर्शविण्यासाठी येमेनमधील सना येथे 27 सप्टेंबर 2024 रोजी निदर्शने केली. (खालिद अब्दुल्ला/रॉयटर्स

आता येमेनमधील इराण समर्थित हौथी अतिरेक्यांनी शुक्रवारपासून गाझा आणि लेबनॉनला पाठिंबा दर्शवण्यासाठी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे लाल समुद्रातील अमेरिकेच्या तीन विध्वंसकांसह तेल अवीव आणि एश्केलॉन या इस्रायली शहरांवर हल्ले करायला सुरूवात केली आहे.

इस्रायली सैन्याने मात्र येमेनमधून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र अडवले ज्यामुळे मध्य इस्रायलमध्ये सायरन वाजल्याचा दावा केला आहे.

गाझा आणि लेबनॉनमधील इस्रायलचे हल्ले थांबेपर्यंत आपले हल्लेही थांबणार नाहीत, असे हौथींच्या लष्करी प्रवक्त्याने स्पष्ट केले. या गटाने तेल अवीववर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला तर दक्षिण इस्रायलमधील एश्केलॉनच्या दिशेने ड्रोन उडवले, असे याह्या सारेया यांनी सांगितले.

“पॅलेस्टाईन आणि लेबनॉनमधील आपल्या भावांच्या सांडलेल्या रक्तासाठी आम्ही इस्रायली शत्रूविरुद्ध आणखी लष्करी कारवाई करू आणि विजय मिळवू,” असे त्यांनी टीव्हीवरील भाषणात म्हटले.

टीव्हीवरील आणखी एका भाषणात सारेयाने असेही म्हटले की, जहाजे इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी जात असताना या गटाने एकाच वेळी लाल समुद्रातील अमेरिकेच्या तीन विध्वंसकांना 23 बॅलिस्टिक आणि क्षेपणास्त्रे तसेच ड्रोनने लक्ष्य केले.

हौथींनी उडवलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसह अनेक प्रक्षेपके बाब अल-मंडब सामुद्रधुनीतून जाणाऱ्या अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांनी अडवल्याचे एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले.

आपली ओळख गुप्त ठेवणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, या भागातील तीन युद्धनौकांपैकी कोणत्याही युद्धनौकेचे नुकसान झाले नाही. अर्थात ही प्राथमिक माहिती असून यात आणखी माहितीची भर पडू शकते.

जुलैमध्ये, हौथींनी तेल अवीव येथे प्रथमच ड्रोनचा मारा केला, ज्यात एकजण ठार तर किमान 10 लोक जखमी झाले. त्याला इस्रायली हवाई दलाने येमेनच्या होदेइदाह बंदर शहरावर हल्ला करून प्रत्युत्तर दिले, ज्यात मोठ्या प्रमाणात प्रचंड हानी झाली आणि सहा जणांचा मृत्यू झाला.

सोमवारपासून सुरू असणाऱ्या इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये 600 हून अधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायल आणि इराण समर्थित हिजबुल्ला यांच्यात गेल्या 18 वर्षांहून अधिक काळ सुरू असणारा संघर्ष यावेळी सर्वात तीव्र झाला आहे. गाझामधील पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ या प्रदेशातील जहाजांवर हल्ला करण्यास सुरुवात करणाऱ्या हौथींनी आता इस्रायलने लेबनॉनवरील हल्ला थांबवावा अशी मागणीही केली आहे.

गाझामध्ये इस्रायलशी लढत असलेल्या सहयोगी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या समर्थनार्थ हिजबुल्लाह जवळजवळ एक वर्षापासून इस्रायलवर रॉकेट हल्ले करत  आहे. तेथील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गाझावरील इस्रायली हल्ल्यात 41 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

इस्रायली आकडेवारीनुसार हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे हे युद्ध सुरू झाले. या हल्ल्यात 1 हजार 200 लोक मारले गेले आणि 250 हून अधिक नागरिकांचे ओलिस म्हणून अपहरण करण्यात आले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleDroupadi Murmu Becomes First Women President To Visit Siachen
Next articleIndian Army Prioritizes Modernization of Rocket Artillery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here