सध्या बांगलादेश आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध फारसे चांगले नसून, त्याची होत असलेली विडंबना धक्कादायक आहे. 1971 मध्ये, भारताने बांगलादेशला पूर्व पाकिस्तानपासून मुक्त करण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. बंगाली भाषिक लोकांचा नरसंहार रोखण्यासाठी भारताने त्यावेळी ठोस पाऊल उचलली आणि लष्करी तसेच मानवतावादी धोरणांना समर्थन दिले ज्यामुळे नवीन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.
त्याकाळी भारत हा बांगलादेशच्या निर्मितीमधील उत्प्रेरक होता. 1971 मध्ये आश्रित असलेल्या अंदाजे एक कोटी बंगाली लोकांना परत आणण्यासाठी, भारताला युद्धात उतरावे लागले होते. त्यावेळी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सर्चलाइट’ (Operation Searchlight) मुळे, पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकांना पळून जावे लागले होते. त्यावेळी झालेल्या अंधाधुंद सामूहिक हत्याकांडामध्ये सुमारे तीस लाख लोक मारले गेले होते. याशिवाय अंदाजे दोन ते चार लाख महिलांवर पाकिस्तान्यांनी केलेले सामूहिक बलात्कार हे तितकेच घृणास्पद होते. या घाऊक हिंसाचारातून स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी झालेले एक कोटीहून अधिक (पूर्व) बंगाली लोक, निर्वासित म्हणून त्यावेळी भारतात आले होते.
1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. ज्यामध्ये ‘बांगलादेश’ या नवीन देशाची निर्मिती झाली. या संघर्षात तब्बल 3 हजार 857 भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. तर पाकिस्तानने या संघर्षात तब्बल 9,000 सैनिक गमावले.
त्यावेळी मोठ्या आर्थिक आणि भू-राजकीय किंमतीवर, भारताने बांगलादेशच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचे समर्थन केले आणि दडपशाहीविरूद्ध तारणहार उभे राहिले.
मात्र आज, दोन्ही देशांचे महत्त्वाच्या क्षेत्रांमधील परस्पर संबंध बिघडल्याचे चित्र आहे. 1971 चा सामायिक इतिहास असूनही, बांगलादेशची काही धोरणे- जसे की ‘व्यापार करारासाठी भारताला मागे टाकणे, पाकिस्तान समोर वेळोवेळी झुकणे आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचाराविरुद्ध पुरेसा प्रतिकार न करणे’ यासारखी धोरणे म्हणजे, दोन्ही देशांतील युतीच्या मूलभूत बंधनांचा विश्वासघात आहे. त्यांची ही धोरणे, भारताचे बांगलादेशसाठीचे ऐतिहासिक बलिदान आणि द्विपक्षीय संबंधांमधील सध्याची आव्हाने यांच्यातील वेदनादायक फरक अधोरेखित करतो.
ऐतिहासिक विडंबन: 1971 मध्ये भारताने बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तिथल्या लष्करी आणि मानवतावादी धोरणांना पाठिंबा दिला होता. तरीही, बांगलादेशची सध्याची राजकीय आणि सामाजिक गतिशीलता त्यांच्या बदललेल्या धोरणांना अधोरेखित करते. ज्यामध्ये काही विशिष्ट क्षेत्रांतर्गत पाकिस्तानकडे झुकण्याचे त्यांचे धोरण प्रामुख्याने समाविष्ट आहे. ज्यामुळे नवी दिल्लीमध्ये दोन्ही देशांत धोरणात्मक अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
व्यापार आणि आर्थिक मतभेद: आपल्या शेजारील राष्ट्र असलेल्या भारताकडून खरेदी व्यवहारामध्ये तार्किक आणि आर्थिक फायदे असूनही, बांगलादेशने अलीकडेच भारताला बाजूला सारत ब्राझीलमधून साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश पाकिस्तानमधून साखर आयातीचे पर्याय शोधत असल्याच्या अफवा पसरत असताना, त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. या पुढे जाऊन बांगलादेशने अनेक प्रकारच्या भारतीय निर्यांतीवर, विशेषत: कृषी मालावर अतिरिक्त शुल्क लादल्यामुळे भारताच्या व्यापार हितांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.
अल्पसंख्यांकांना टार्गेट: सध्या बांगलादेशातील हिंदू समुदायांना वाढत्या हिंसाचाराचा सामना करावा लागतो आहे. तेथील हिंदू मंदिरांवरही हल्ले होत आहे. याबाबतचे विशेष अहवाल तिथल्या राजकीय गोंधळावर, अल्पसंख्यांवरील हल्ल्यांवर आणि त्यांच्या व त्यांच्या धर्मस्थळांच्या अपवित्रीकरणावर प्रकाश टाकतात. या सर्व घटना 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धाची आठवण करून देतात. त्यावेळेसारखी भितीदायक आणि विदारक परिस्थीती आज बांगलादेशात पुन्हा निर्माण झाली आहे, जिथे अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जात असून त्यांचा अतोनात छळ केला जात आहे.
पाकिस्तानातील राजकीय बदलाचे प्रभाव: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि जमात-ए-इस्लामीसह तेथील विरोधकांच्या उदयामुळे, भारताच्या धोरणात्मक हितसंबंधांवर परिणाम होतो आहे. हे गट ऐतिहासिकदृष्ट्या पाकिस्तानशी संलग्न आहेत आणि त्यांनी अनेकदा त्यांच्या भारतविरोधी भावना व्यक्त देखील केल्या आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताचे योगदान पाहता, आज तिथे भारताच्याच विरोधात तयार होत असलेली ही परिस्थीती अत्यंत चिंताजनक आहे.
या आठवड्याच्या संरक्षण मंत्रामध्ये, भारतशक्तीचे प्रमुख संपादक- नितीन ए. गोखले असे सांगतात की, ‘दोन्ही देशातील संबंध सुधारायला वेळ लागेल, परंतु शेवटी बांगलादेशला भारताच्या दिशेने मैत्रीचा आणि मदतीचा हात पुढे करावाच लागेल. कारण पाकिस्तानशी हातमिळवणी करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते.’
निलांजना बॅनर्जी | अनुवाद- वेद बर्वे