जनरल बिपीन रावत, जे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) होते, त्यांचा 8 डिसेंबर 2021 रोजी Mi-17 हेलिकॉप्टर अपघातात दुर्देवी अंत झाला. हा अपघात ‘मानवी त्रुटी’ मुळे (एअर क्रू मुळे) झाला असल्याची पुष्टी, भारतीय हवाई दलाने (IAF) केली आहे. हा खुलासा संरक्षणविषयक स्थायी समितीने, मंगळवारी संसदेत सादर केलेल्या अहवालाचा एक भाग होता. यामध्ये 13 व्या संरक्षण योजनेच्या अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या विमान क्रॅशचा तपशीलवार डेटा देखील समाविष्ट होता.
जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि सशस्त्र दलाच्या १२ जवानांसोबत, तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ प्रवास करत असताना, त्यांच्या लष्करी हेलिकॉप्टरला अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
या प्रकरणी सादर झालेल्या अहवालामध्ये, विविध विमान अपघातांविषयी, तारखांविषयी आणि सदर घटनांमधील क्रॅशची कारणे स्पष्ट करणारा, तपशीलवार डेटा समाविष्ट आहे. 2021-22 मध्ये नऊ तर 2018-19 मध्ये 11 अपघातांसह, एकूण 34 IAF विमानांचे अपघात झाल्याचं डेटा सांगतो.
जनरल रावत यांना घेऊन जाणाऱ्या ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टरचा अपघात हा, ३३ वा अपघात म्हणून नोंदवण्यात आला आहे. या नोंदीमध्ये ‘08.12.2021’ या तारखेचा आणि ‘HE(A)’ किंवा ‘मानवी त्रुटी (Aircrew)’ या अपघातामागील कारणाचा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे.
सोबतच २०१९ पासून आजपर्यंतच्या कालावधीत घडलेल्या सर्व ३४ अपघातांची, सखोल चौकशी करण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने (MoD) अहवाल समितीला दिली.
“चौकशी समित्यांच्या शिफारसीमध्ये, भविष्यात अशा अपघातांना रोखण्याच्या उद्देशाने- निर्मिती प्रक्रिया, कार्यपद्धती, प्रशिक्षण, उपकरणे, ऑपरेशनल कल्चर, देखभाल आणि प्रशासन अशा सर्व मुद्द्यांचा तपशीलवार आढावा घेतला जातो”, असे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, अहवालातून उघडकीस आलेली ही माहिती, शस्त्र दलांमध्ये मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांना कमी करण्यासाठी, ऑपरेशनल सुरक्षा आणि प्रशिक्षण प्रक्रियेत सातत्याने सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करते.
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) – जनरल बिपिन रावत, हे अपघातावेळी ज्या ‘Mi-17V5’ हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, ते भारतीय लष्करातील एक VVIP दर्जाचे हेलिकॉप्टर आहे. यामध्ये 2 इंजिन प्रणाली कार्यरत असतात. या बनावटीची हेलिकॉप्टर्स ही विशेषत: दुर्गम डोंगराळ भागांमधील लष्कराच्या ऑपरेशन्ससाठी वापरली जातात.
जाणकार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘Mi-17V5’ हे जगातील सर्वात प्रगत वाहतूक हेलिकॉप्टर आहे. जे सैन्यदल आणि शस्त्रसाठ्यांच्या वाहतूकीसाठी सक्षम असतात. दुर्गम भागात गस्त घालण्यासाठी तसेच शोध आणि बचाव मोहिमांमध्ये या हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.