अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा मुलगा हंटर बायडेन याला बेकायदेशीरपणे बंदुक खरेदी करण्यासाठी अंमली पदार्थांच्या वापराबद्दल खोटी माहिती दिल्याप्रकरणी ज्युरींनी दोषी ठरवले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षपाती न्याय व्यवस्थेच्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी डेमोक्रॅट्सद्वारे या निर्णयाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
विल्मिंग्टन, डेलावेर येथील फेडरल न्यायालयातील 12 सदस्यीय ज्युरींनी हंटर बायडेनला तिन्ही प्रकरणांमध्ये दोषी ठरवले. यामुळे एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेला अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलाचा समावेश असणारे हे पहिलेच प्रकरण आहे. 54 वर्षीय हंटर बायडेनने निकाल वाचल्यानंतर थोडीशी मान डोलावली आणि नंतर त्याचे वकील ॲबे लोवेल यांच्या पाठीवर थाप मारली. त्याने त्याच्या कायदेशीर पथकाच्या आणखी एका सदस्यालाही मिठी मारली.
न्यायाधीशांनी अद्याप शिक्षेची तारीख निश्चित केलेली नाही. मात्र ती सहसा 120 दिवसांच्या आत सुनावली जाते. याचा अर्थ 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सुमारे एक महिना आधी शिक्षेबाबतची सुनावणी होऊ शकते. बंदुकीच्या आरोपांसाठी असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिक्षेचा कालावधी 15 ते 21 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र कायदेशीर तज्ज्ञांच्या मते बहुतांश वेळा अशा प्रकरणांमध्ये आरोपींना अनेकदा कमी कालावधीची शिक्षा मिळते आणि जर त्यांनी त्यांच्या खटल्यापूर्वीच सुटकेच्या अटींचे पालन केले तर ते तुरुंगात जाण्याची शक्यता कमी असते.
ट्रम्प यांच्या अडचणी
या खटल्याच्या सुनावणीसाठी 30 मे रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ज्या फौजदारी खटल्यात दोषी ठरवण्यात आले होते त्याचा संदर्भ लक्षात घेतला गेला.
आगामी निवडणुकीत जो बायडेन यांना रिपब्लिकन पक्षाकडून आव्हान देणारे ट्रम्प यांना एक घोटाळा लपवण्यासाठी खोट्या व्यावसायिक नोंदी केल्याच्या 34 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्या राजकीय पुनरागमनात अडथळा आणण्यासाठी डेमोक्रॅट्स त्यांच्या विरोधात न्यायव्यवस्थेचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मात्र अध्यक्ष बायडेन राजकीय फायद्यासाठी न्यायव्यवस्थेचा गैरवापर करत नाहीत असा युक्तिवाद करण्यासाठी कॉंग्रेसच्या डेमोक्रॅट्सनी हंटर बायडेनच्या खटल्यावर जोर दिला आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जाहीर केले की, जर त्यांच्या मुलाला दोषी ठरवले तर ते त्याला माफ करणार नाहीत.
हंटर बायडेन यांच्याविरुद्धचा खटला अमेरिकेच्या न्यायखात्याचे विशेष वकील डेव्हिड वेइस यांनी दाखल केला होता, ज्यांची नियुक्ती ट्रम्प यांनी केली होती. वेसने हंटर बायडेनवर कॅलिफोर्नियामध्ये तीन गुन्हे आणि करचुकवेगिरीशी संबंधित सहा गुन्ह्यांसाठी आरोपत्र दाखल केले आहे.
इतर आरोप
इतर आरोपांनुसार हंटर बायडेन 2016 ते 2019 दरम्यान अमली पदार्थ, एस्कॉर्ट्स, विदेशी कार आणि इतर लक्झरी वस्तूंवर लाखोंचा खर्च करताना 14 लाख डॉलर्स कर भरण्यात अपयशी ठरले. हंटर बायडेनने या आरोपांसाठी आपण दोषी नसल्याची सांगितले आहे. लॉस एंजेलिसमध्ये 5 सप्टेंबर रोजी यासंदर्भातील खटला सुरू होणार आहे.
डेलावेर खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी हंटर बायडेनची माजी पत्नी, माजी प्रेयसी आणि मेहुणी यांना साक्ष देण्यास बोलावले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये बंदूक खरेदीच्या वेळी त्यांनी त्यांच्या गंभीर व्यसनाधीनतेची माहिती लपवून ठेवली होती. सरकारी वकिलांनी टेक्स मेसेजेस, छायाचित्रे आणि बँक नोंदी देखील सादर केल्या ज्यामुळे असे दिसून आले की बायडेन हे अत्यंत व्यसनी होते. तरीही ते अंमली पदार्थांचा वापर करत नसल्याचे सांगत सरकारी तपासणी अर्जावर जाणूनबुजून खोटे बोलले होते.
हंटर बायडेनकडून बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की त्याने बंदूक खरेदी केली तेव्हा तो अंमली पदार्थांचा वापर करत नव्हता. शिवाय फसवणूक करण्याचा त्याचा हेतू नव्हता. कारण त्यावेळी तो स्वतःला अंमली पदार्थांचा वापर करणारा मानत नव्हता. बचाव पक्षाने हंटर बायडेनची मुलगी नाओमी बायडेन हिला देखील साक्ष देण्यासाठी बोलावले होते. बंदूक खरेदीच्या थोड्या वेळापूर्वी आणि नंतर जेव्हा तिने आपल्या वडिलांना बघितले होते तेव्हा ते व्यवस्थित दिसत होते असे तिने आपल्या साक्षीत सांगितले.
रेशम
(रॉयटर्स)