आइसलँडमध्ये पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक; नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी

0

आइसलँडच्या नैऋत्य भागात बुधवारी पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची माहिती देशाच्या हवामान खात्याने दिली आहे. राजधानीच्या परिसराजवळ गेल्या काही वर्षांत घडलेल्या सततच्या उद्रेकांच्या मालिकेतील हा ताजाताजा प्रकार आहे.

उत्तर अटलांटिकमधील हे बेटांचे राष्ट्र, ज्यात अनेक हिमनद्या आणि ज्वालामुखी असल्यामुळे त्याला “हिम आणि अग्नीची भूमी” म्हणून ओळखले जाते. 2021 मध्ये, तिथे रेयक्यानेस द्वीपकल्पावरील भूवैज्ञानिक प्रणाली पुन्हा सक्रिय झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत हे बेट बारा ज्वालामुखी उद्रेकांचे साक्षीदार ठरले आहे.

रेयक्याविक शहराला अद्याप धोका नाही

हे उद्रेक “फिशर इरप्शन” म्हणून ओळखले जातात, ज्यात लावा केंद्रीकृत ज्वालामुखी क्रेटरमधून नव्हे तर, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील लांबट फटीतून वाहतो.

रेयक्यानेस परिसरातील हे उद्रेक, अजूनपर्यंत राजधानी शहर- रेयक्याविकसाठी थेट धोक्याचे ठरलेले नाहीत. उद्रेकातून तयार झालेल्या राखेचा हवेत मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला नसल्यामुळे, हवाई वाहतुकीवरही त्याचा परिणाम झालेला नाही.

2023 मध्ये, सुरक्षिततेच्या कारणास्तव रिकामे केलेले जवळचे मासेमारीचे गाव ग्रिंडाविक, जिथे सुमारे 4,000 रहिवासी होते, ते अजूनही ओस पडले आहे, कारण त्या भागात लावा प्रवाह व त्यासंबंधित भूकंप यांचा धोका कायम आहे.

पूर्वीच्या काही उद्रेकांमध्ये प्रसिद्ध ब्लू लॅगून लक्झरी स्पा आणि जवळचे स्वार्तसेन्गी थर्मल पॉवर स्टेशनही लाव्याच्या प्रवाहामुळे धोक्यात आले होते.

रहिवाशांना हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची सूचना

या उद्रेकातून निर्माण झालेले वायू प्रदूषण, वोगार आणि रेयक्यानेसब्रॉट शहरांकडे पसरत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना दारे-खिडक्या बंद ठेवण्यास आणि आइसलँड हवामान खात्याच्या वेबसाइटवर नियमितपणे हवेच्या गुणवत्तेची माहिती घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रदूषणविषयक अंदाजही त्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तज्ज्ञांच्या मते, उद्रेकामुळे तयार झालेली फट सुमारे 700 ते 1000 मीटर रुंद आहे, जी सध्या तरी विस्तारत असल्याचे दिसून येत नाहीये. लाव्याचा प्रवाह मुख्यतः दक्षिण-पूर्व दिशेकडे वाहतो आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “या परिसरात असे उद्रेक पुढील अनेक दशके, कदाचित शतकांपर्यंतही होत राहण्याची शक्यता आहे.”

ज्वालामुखी पर्यटनाचे आकर्षण

अमेरिकेतील केंटकी राज्याच्या क्षेत्रफळाइतका आणि 4 लाखांहून कमी लोकसंख्या असलेला ‘आइसलँड’, 30 हून अधिक सक्रिय ज्वालामुखी असलेले देश आहे.

यामुळे आइसलँड हे ज्वालामुखी पर्यटनासाठी एक प्रमुख ठिकाण बनले आहे. ‘वोल्कॅनो टूरिजम’ हे एक विशेष प्रकारचे पर्यटन आहे, जे दरवर्षी हजारो साहसी पर्यटकांना मेक्सिको, ग्वाटेमाला, सिसिली, इंडोनेशिया आणि न्यूझीलंडसारख्या ठिकाणी आकर्षित करते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleट्रम्प यांच्या निर्बंधांच्या धमकीचा भारतातील रशियन तेलाच्या निर्यातीवर परिणाम
Next articlePutin, Unfazed By Trump, Could Try To Take More Of Ukraine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here