भारत ‘एलिट क्लब’मध्ये: ‘एमआयआरव्ही’मुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा शक्य
दि. १२ मार्च: एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राची भारताने सोमवारी यशस्वी चाचणी घेतली. ‘दिव्यास्त्र’ या नावाने सुरु असलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून संरक्षण संशोधन व विकास संस्थेने देशांतर्गत विकसित केलेल्या ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल’ (एमआयआरव्ही) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटांवरून ही चाचणी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीमुळे असे तंत्रज्ञान विकसित केलेल्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल ‘डीआरडीओ’तील संशोधकांचे अभिनंदन केले. ही चाचणी यशस्वी होताच पंतप्रधानांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ‘डीआरडीओ’च्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या. ‘देशांतर्गत विकसित केलेल्या ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल’च्या (एमआयआरव्ही) माध्यमातून अग्नी-५ या ‘दिव्यास्त्रा’ची यशस्वी चाचणी घेतल्याबद्दल सर्व संशोधकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मला त्यांचा अभिमान वाटतो,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.
‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राचा पल्ला पाच हजार किलोमीटर इतका आहे. भारताने देशांतर्गत विकसित केलेल्या क्षेपणास्त्र मालिकेतील अग्नी-५ हे एकमेव आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे भारताची हवाई सुरक्षा क्षमता वाढणार आहे. ‘एमआयआरव्ही’ या क्षेपणास्त्राच्या अंतर्गतच विकसित करण्यात आले आहे. प्रत्येक ‘एमआयआरव्ही’ स्वतंत्रपणे दोन ते दहा अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यामुळे एकाच वेळी शेकडो किलोमीटर पसरलेल्या विविध लक्ष्यांवर मारा करण्याची किंवा एकाच ठिकाणी सर्व मारा केंद्रित करण्याची क्षमता प्राप्त होते.
‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान काय आहे?
‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान वापरून बाह्यवातावरणातून क्षेपणास्त्राच्या सहायाने एकाच वेळी शेकडो किलोमीटर पसरलेल्या विविध लक्ष्यांवर मारा करता येतो. प्रामुख्याने अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होत असला, तरी पारंपरिक अस्त्रेही हे तंत्रज्ञान वापरून डागता येतात. या मुळे सामरिक दलाची (स्ट्रॅटेजिक फोर्सेस) प्रथम मारा करण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर एकाच वेळी अनेक ठिकाणी मारा करता येत असल्यामुळे (क्लस्टर म्युनेशन) प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी मारा करण्यासाठी नव्याने क्षेपणास्त्र डागण्याची गरज उरत नाही. ‘एमआयआरव्ही’मुळे अनेक ठिकाणी मारा करणे क्ष्क्या होत असल्यामुळे क्षेपणास्त्र भेदी यंत्रणेचा प्रभावही प्रतिबंधित केला जातो.
भारत ‘एलिट क्लब’ मध्ये
‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल’च्या (एमआयआरव्ही) तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे असे तंत्रज्ञान असलेल्या अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, चीन व रशिया या पाच देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश झाला आहे. या देशांनी हे तंत्रज्ञान पूर्वीच त्यांच्या सैन्यदलांत तैनात केले आहे. अमेरिका व फ्रांसने त्यांच्या पाणबुड्यांवर हे तंत्रज्ञान असलेली क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. तर, रशियाने हे तंत्रज्ञान त्यांच्या दोन्ही प्रकारच्या, आंतरखंडीय व पाणबुडीवरून डागण्याच्या, क्षेपनास्त्रासाठी वापरले आहे. एका अमेरिकी ‘थिंकटॅंक’नुसार पाकिस्तानही २०१७ पासून हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
विनय चाटी