भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार जनरल द्विवेदी यांनी ‘बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-जमान यांच्याशी व्हिडिओ टेलिकॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ‘एक्स’ वरील अधिकृत पोस्टमध्ये लष्कराने म्हटले आहे की, या संवादादरम्यान, दोन्ही लष्करप्रमुखांनी ‘द्विपक्षीय संरक्षण सहकार्यासह परस्पर हिताच्या बाबींवर चर्चा केली.
#DefenceCooperation #GeneralUpendraDwivedi, #COAS interacted with General Waker-Uz-Zaman, Chief of Army Staff, #BangladeshArmy, on Video tele call and exchanged views on issues of mutual interest including bilateral #DefenceCooperation.#IndiaBangladeshFriendship#IndianArmy… pic.twitter.com/DdY5Ole98e
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) November 6, 2024
सध्याच्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीन बांगलादेशात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात असे अंदाज वर्तवले जात असताना अशाप्रकारची चर्चा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यात घनिष्ट संबंध होते. याशिवाय संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सहकार्य मजबूत झाले होते, ढाका येथील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये हे संबंध कायम राखण्यासाठी भारताची वचनबद्धता कायम होती.
बांगलादेशच्या मुक्ती संग्रामादरम्यान भारतीय सैन्याने दिलेल्या पाठिंब्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या सशस्त्र दलांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या संबंध प्रस्थापित केले गेले. मात्र, हसीना सरकारच्या काळात दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध आणखी मजबूत झाले आहेत. अलिकडच्या वर्षांमध्ये, धोरणात्मक सहकार्य लक्षणीयरीत्या विस्तारले आहे. त्यामुळे नियमित उच्चस्तरीय भेटी, संयुक्त प्रशिक्षण सराव आणि बांगलादेशला भारतीय लष्करी साधनसामग्रीचा पुरवठा करण्यात येत आहे. या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील परस्पर संरक्षण क्षमता आणि विश्वास वाढला आहे.
झमान यांचे स्वतः भारतातील लष्करी नेतृत्वाशी चांगले संबंध असल्याचे म्हटले जाते. मुत्सद्दी मार्ग खुले ठेवण्याव्यतिरिक्त बांगलादेश सैन्याशी लष्करी संपर्क कायम ठेवणे देखील महत्त्वाचे आहे कारण देश राजकीय संक्रमणाच्या काळातून जात आहे जिथे सैन्य केवळ देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यातच नव्हे तर सत्तेच्या सुरळीत हस्तांतरणासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
बांगलादेशातील हिंदू समुदायावर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरही ही बैठक पार पडली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारताला आश्वासन दिले आहे की ते अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करत आहेत. या संदर्भात, बांगलादेशच्या सैन्याने सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे अपेक्षित आहे.
भारत आणि बांगलादेशमध्ये असणारी 4 हजार कि. मी. ची सीमा अंमली पदार्थ, गुरेढोरे, शस्त्रे आणि बेकायदेशीर स्थलांतराच्या तस्करीमुळे अत्यंत असुरक्षित आहे.
बांगलादेशात अशांतता निर्माण झाल्यास, सीमेवर या प्रकारच्या हालचाली वाढू शकतात अशी भारताला चिंता आहे. या महिन्यात नियोजित असलेली दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमधील द्विवार्षिक बैठक आधीच पुढे ढकलण्यात आली आहे. समान समस्या दूर करण्यासाठी आणि सीमापार गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
टीम भारतशक्ती